Tuesday, 11 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.08.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 11 August 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ११ ऑगस्ट २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      बेपत्ता व्यक्तीचं वय किंवा लिंगाचा विचार न करता तातडीने एफआयआर नोंदवण्याचे निर्देश सर्वांना लागू असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

·      न्यायाधिकरण सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी

·      भूसंपादन मोबदल्यास विलंब झाल्यास वाढीव दराने व्याज देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

आणि

·      महामार्ग सुरक्षा बळकटीकरणासाठी छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा कृती दलाची स्थापना

****

बेपत्ता व्यक्तीचं वय किंवा लिंगाचा विचार न करता तातडीने प्राथमिक माहिती अहवाल-एफआयआर नोंदवण्याचे निर्देश सर्वांना लागू असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सूचित केलं आहे. न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि आर. महादेवन यांच्या पीठाने, या निर्देशांचं पालन न करणारे राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांना न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करू नये, याचं स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. सर्व बेपत्ता व्यक्तींच्या प्रकरणांमध्ये प्राथमिक चौकशीशिवाय तत्काळ एफआयआर नोंदवण्याचे निर्देश न्यायालयाने यापूर्वी दिले होते. बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांचं संरक्षण करण्याबाबतच्या उपाययोजनाही न्यायालयाने जारी केल्या होत्या, या बालकांना लवकरात लवकर कुटुंबाकडे परत आणण्याचाही यात समावेश होता.

****

‘न्यायाधिकरण सुधारणा विधेयक’ संसदेत मंजूर झालं आहे. लोकसभेत मंजूर झालेल्या या विधेयकाला आज राज्यसभेनेही मंजुरी दिली. केंद्रीय विधी आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक सदनासमोर मांडलं. विविध न्यायाधिकरणांचे अध्यक्ष आणि सदस्य यांची पात्रता तसंच नियुक्ती, प्रशासन आणि कामकाज याबाबत एकसूत्रता सुनिश्चित करणे हा या विधेयकाचा उद्देश आहे. ‘राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोगा’च्या स्थापनेबाबतही या विधेयकात तरतूद आहे.

दरम्यान, लोकसभेत आज राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक आणि केरळचं नाव बदलून केरलम् करण्यासाठीचं विधेयक मंजूर झालं.

दोन्ही सदनात सुरू असलेला विरोधकांचा गदारोळ आजही कायम होता, जंतरमंतरवरच्या आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई आणि इतर मुद्द्यांवरून विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी दुपारी २ वाजेपर्यंत, नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाजही दुपारपर्यंत दोन वेळा बाधित झालं.

****

सार्वजनिक प्रकल्पांसाठी भूसंपादन झाल्यावर मोबदला मिळण्यात विलंब झाल्यास भूधारकाला वाढीव दराने व्याज मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत हा निर्णय घेतला. नवीकरणीय उर्जा प्रकल्पांसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या कंपनी समूहातल्या अंतर्गत जमीन देवघेवीवर मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्याला तसंच जमीन खरेदीवरच्या मुद्रांक शुल्कात २५ टक्के सूट देण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

 

राज्यातल्या महाविद्यालयांमधे समाजकार्य अशी वेगळी विद्याशाखा, नवीन अभ्यासक्रम आणि अतिरिक्त तुकडी विना अनुदान तत्वावर सुरु करणं, कृषीविभागात संचालक आणि सहसंचालक मिळून ४ नवीन पदनिर्मिती तसंच, नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय तसंच सरकारी वकीलांचं कार्यालय सुरु करणं, तसंच लातूर जिल्ह्यातल्या नीळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास भांडवली खर्च तसंच खेळत्या भांडवलासाठी कर्ज घेण्यास मंजुरी देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला.

****

एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून विकास करताना त्या ठिकाणी उभारण्यात येणारी नवीन बसस्थानके आणि इतर वास्तू केवळ आधुनिक सुविधांनी युक्त न राहता ‘आयकॉनिक’ आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असाव्यात असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आज मुंबईत याबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. प्रवाशांना अत्याधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा देतानाच एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या मालमत्तांचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करावा, असंही शिंदे यांनी सांगितलं.

दरम्यान, एस. टी. आगार आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचं नियोजन राज्य सरकार करत आहे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. मुंबईतल्या ताडदेव इथल्या परिवहन कार्यालयात टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक ट्रक्सना हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ते बोलत होते. ‘सार्वजनिक-खाजगी भागीदारी’ तत्त्वावर असलेल्या उड्डाणपुलांखालीही चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. यासंदर्भातला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठवला असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं.

****

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील विद्यापीठांनी एकसमान शैक्षणिक वेळापत्रक राबवण्याचे आदेश उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. पाटील यांनी आज मंत्रालयात सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंची दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू आणि प्र-कुलगुरूंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांचा अहवाल शासनाकडे सादर करावा, परीक्षांमधील पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर मार्गदर्शक नियमावली तयार करून प्रसिद्ध करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महामार्ग सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी याबाबतचे आदेश जारी केले. या कृती दलामार्फत महामार्गांवरील अतिक्रमणे हटवणे, अनधिकृत पार्किंगला आळा घालणे, धोकादायक रस्त्यांवर आवश्यक उपाययोजना, रस्ते आणि पथदिव्यांची सुधारणा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा सक्षम करणे तसेच महामार्ग सुरक्षेबाबत शून्य सहिष्णुता धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

****

‘हर घर तिरंगा’ मोहिमेत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. येत्या १७ तारखेपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमांमध्ये विद्यार्थी तसंच नागरिकांनी सक्रीय सहभाग घेण्याचं आवाहन राष्ट्रीय छात्र सेना एनसीसीचे छत्रपती संभाजीनगर इथले अधिकारी कॅप्टन गजानन सानप यांनी केलं आहे.

बाईट - कॅप्ट्न गजानन सानप

 

परभणी इथं ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा दुचाकी फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी या फेरीत वाहने चालवून सहभागी होत देशभक्तीचा संदेश दिला. जिल्हा क्रीडा संकुल इथं ‘वंदे मातरम्’च्या समूहगायनानंतर या फेरीला सुरूवात झाली.

****

नांदेड जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीतील ४४ उमेदवारांना तीन वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आलं आहे. या उमेदवारांनी निवडणूकीत केलेल्या खर्चाचा हिशोब विहीत मुदतीत संबंधित कार्यालयाकडे सादर न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. यात हिमायतनगर नगरपरिषदेतील १४, किनवट ७, उमरी तसंच धर्माबाद प्रत्येकी ६, कंधार पाच, मुखेड ३, भोकर २, आणि लोहा नगरपरिषदेतील एका उमेदवाराचा समावेश आहे.

****

संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त आज छत्रपती संभाजीनगर इथं मिरवणूक काढण्यात आली. दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्यासह पारंपारिक वेश परिधान करून तसंच टाळ-मृदंगाच्या गजरात नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले.

****

छत्रपती संभाजीनगर इथं विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या २६ पोलिस अधिकारी तसंच अंमलदारांवर दंडात्मक कारवाई करत २६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी सर्व पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना दुचाकी वापरताना सक्तीने हेल्मेट वापरण्याचे आदेश दिले आहेत.

****

नशामुक्त भारत अभियानाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त परभणी जिल्ह्यात सगळी शाळा-महाविद्यालयं तसंच शासकीय आणि अनुदानित वसतिगृहांतल्या विद्यार्थ्यांनी येत्या १८ तारखेला व्यसनमुक्तीची शपथ घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केलं आहे. अधिकारी, कर्मचारी तसंच नागरिकांनी नशामुक्ती मित्र म्हणून नोंदणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

****

लातूर इथल्या नवीन अद्ययावत आधार सेवा केंद्राचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्तेवाड यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं. नागरिकांना जलद, सोयीस्कर आणि पारदर्शक आधार सेवा मिळावी यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये नवीन नोंदणी, ५ ते १७ वयोगटातील मुलांसाठी मोफत बायोमेट्रिक अपडेट, डेमोग्राफिक दुरुस्ती आणि घटनास्थळीच तक्रार निवारणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

****

हवामान

राज्यात आज मुंबई, ठाणे आणि रायगडसह कोकणातल्या काही भागाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे तसंच सातारा जिल्ह्यातल्या घाटमाथा परिसराला आज यलो अलर्ट तर उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात उद्या जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणाचे दरवाजे रात्री बंद करण्यात आले. आता धरणाच्या उजव्या तसंच डाव्या कालव्यातून प्रत्येकी तेराशे घनफूट असे एकूण दोन हजार सहाशे घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...