Saturday, 8 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.08.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 08 August 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ ऑगस्ट २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

भारतीय शिक्षण व्यवस्था वेळेवर आणि प्रभावीपणे मजबूत करण्यासाठी कार्यक्रम राबविण्यास सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज म्हटलं आहे. तेराव्या ब्रिक्स देशांच्या शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर ते मायदेशी परतले, यानंतर शिक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची काल दिल्ली इथं रात्री बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रालयाच्या सध्याच्या कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला आणि हे कार्यक्रम वेळेवर तसंच प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठीच्या प्राधान्यक्रमांवर चर्चा करण्यात आली. देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये लक्ष देण्याची गरज असलेल्या क्षेत्रांवर आणि भविष्यात आवश्यक असलेल्या कृतींवरही बैठकीत चर्चा झाली असल्याचंही जोशी यांनी सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घघाटन करणार आहेत. यावेळी ते राज्यातील शहरी सहकारी बँक महासंघ तसंच जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतील. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास प्राधिकरण आणि राष्ट्रीय न्यायवैज्ञानिक विज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार होणार आहे. त्यानंतर सहकारी बँकांची सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलेल्या सुरक्षा संचालन केंद्राचं उद्घघाटनही शहा यांच्या हस्ते होईल.

****

ग्राहकांसाठी युपीआय सेवा मोफतच राहील असं पीसीआय अर्थात 'पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया'नं  म्हंटलं आहे. प्रत्येक भारतीय नागरिक कोणत्याही शुल्काशिवाय तात्काळ ऑनलाईन आर्थिक व्यवहार सुरू ठेवू शकतो, तसंच, डिजिटल पेमेंट स्वीकारणाऱ्या लहान व्यापाऱ्यांवरही कोणतंही शुल्क आकारलं जाणार नसल्याचं एका निवेदनात पीसीआय नं स्पष्ट केलं आहे. युपीआयची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी तंत्रज्ञान, सायबर-सुरक्षा, फसवणूक रोखणं आणि नवनवीन उपाययोजना यांमध्ये बँका, फिन-टेक कंपन्या, एनपीसीआय आणि रिझर्व बँक गुंतवणूक करत असल्याचंही पीसीआय नं सांगितलं.

****

नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी ३४ हजार ७३२ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला गती देत, संबंधित विभागांनी सर्व कामं वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सिंहस्थ कुंभमेळयाच्या अनुषंगानं मुंबईत काल एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. कुंभमेळ्यातली सध्याच्या कामांची परिस्थिती समाधानकारक नाही; प्रत्येक विभागाने अधिक वेगानं आणि समन्वयानं काम करण्याची गरज आहे, या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. तसंच मार्च २०२७ पर्यंत साधुग्राम, रिंग रोड आणि सर्व पायाभूत सुविधा पूर्ण करून एप्रिल २०२७ पर्यंत प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

****

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, राज्य परिवहन महामंडळ -एसटी तर्फे सात ते २५ सप्टेंबर दरम्यान पाच हजार २२० अतिरिक्त बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल ही माहिती दिली. या गाड्यांसाठी, प्रवाशांना बसस्थानकांसह  "MSRTC Bus Reservation" या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे आरक्षण करता येणार आहे.

****

मराठा आरक्षणाशी संबंधित निर्णयांमध्ये तातडीने दुरुस्ती करावी; अन्यथा निवडणुकीत उत्तर देऊ असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी दिला आहे. ते काल बीड इथं पत्रकारांशी बोलत होते. या संदर्भातील निर्णय आणि भूमिका सरकारने तातडीने दुरुस्त करावी, अशी मागणी जरांगे यांनी केली. 

****

शेतकऱ्यांना दिवसा आणि कायमस्वरूपी वीजपुरवठा सक्षम करुन देण्यासाठी 'एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक' म्हणजेच एआयआयबीच्या प्रतिनिधी मंडळानं, अकोला जिल्ह्यातील विद्युत प्रणालीच्या विविध विकास कामांची गुणवत्ता पाहणी केली. बीजिंग इथं मुख्यालय असलेल्या आणि बँकेकडून निधीपुरवठा होत असलेल्या प्रकल्पांची थेट पाहणी केल्यानंतर, प्रतिनिधी मंडळाने कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलं. एआयआयबीच्या निधीतून ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी अकोला मंडळात ४६ नवीन उपकेंद्रे, ४१ ठिकाणी अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर, २१ ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढ आणि उच्च दाब नलिका टाकण्याचे काम वेगानं सुरू आहे. तसंच, या पथकानं अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात बाबुलगाव उपकेंद्र आणि वाशिम जिल्ह्यातील पांडव उमरा उपकेंद्रातील कामाचीही पाहणी केली.

****

गुन्ह्यांचा तपास वेळेत पूर्ण करा आणि न्यायालयीन दोषसिद्धीचा दर वाढवा असा स्पष्ट आदेश पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी बीड जिल्हा पोलिस दलाला दिला आहे. त्यांच्या उपस्थितीत काल बीडमध्ये गुन्हे आढावा बैठक झाली. यावेळी गंभीर गुन्ह्यांचा तपास, दोषसिद्धी, नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि तंत्रज्ञानाचा वापर यावर सविस्तर चर्चा झाली.

****

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त उद्यापासून १७ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानात प्रत्येक नागरिकाने सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. या कालावधीत जिल्हा, शहर, तालुका आणि गाव पातळीवर तिरंगा बाईक रॅली, सायकल रॅली, पदयात्रा, ‘सेल्फी विथ तिरंगा’ इत्यादी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...