Friday, 7 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.08.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 07 August 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      'गोबर-धन' या राष्ट्रीय चक्रीय जैव-ऊर्जा प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

·      विनियोजन विधेयक २०२६ ला संसदेची मान्यता; लोकसभेत कररचना आणि इतर कायदेसुधारणा विधेयक पारित

·      मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डॉक्टरांचा संप मागे

·      जातपडताळणी समितीच्या निर्णयात सरकारचा हस्तक्षेप नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

·      एसआयआरमधून सुटलेल्या मतदारांनाही मतदारयादीत नावं समाविष्ट करता येईल- निवडणूक आयोगाचा निर्वाळा

आणि

·      जायकवाडी धरणातून होणाऱ्या विसर्गात कपात; मराठवाड्यात पुढचे पाच दिवस पावसाचा अंदाज

****

केंद्रीय मंत्रिमंडळाने 'गोबर-धन' या राष्ट्रीय चक्रीय जैव-ऊर्जा प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. सुमारे २३ हजार ७३१ कोटी रुपयांची तरतूद असलेली ही योजना, २०२६-२७ ते २०३५-३६ या कालावधीत राबवली जाईल. यामुळे दीड लाख रोजगार निर्मिती होईल, असं त्यांनी सांगितलं. देशांतर्गत कॉम्प्रेस्ड बायोगॅसचं उत्पादन सुमारे दहा पटीने वाढवणं, हे या योजनेचं उद्दिष्ट असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली, ते म्हणाले...

बाईट - माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

****

संसदेनं काल विनियोजन विधेयक २०२६ मंजूर केलं. लोकसभेनं मंजूर केलेलं हे विधेयक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत विचारार्थ सादर केलं. चर्चेनंतर राज्यसभेनं विधेयक लोकसभेला परत पाठवलं.

दरम्यान, विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कथित कारवाईप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं, या मागणीसह विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ केला. त्यामुळे कामकाजात वांरवार व्यत्यय आला.

लोकसभेत विरोधकांच्या गदारोळातच कररचना आणि इतर कायदेसुधारणा विधेयक चर्चेविना मंजूर झालं.

****

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डॉक्टरांचा संप मागे घेण्याचा निर्णय काल घेण्यात आला. या डॉक्टरांची बाजू आपण ऐकून घेऊ, असं आश्वासनही प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठानं दिलं. मेडिकल फार्माकॉलॉजीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करायची परवानगी देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय वैद्यकीय संघटनेनं हा संप पुकारला होता. सरकारच्या निर्णयाबाबत बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

दरम्यान, जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया ही सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि नियमांप्रमाणे होते, यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसतो, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द होण्यावरुन राज्य सरकारवर टीका केली होती, त्यावर फडणवीस यांनी हे भाष्य केलं.

जात प्रमाणपत्र रद्द होण्याच्या बाबतीतली वस्तुस्थिती तपासण्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून, जाणीवपूर्वक काही झालं असेल, तर त्यावर कारवाई करण्यात येईल, असं, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर इथं माध्यमांशी बोलत होते.

****

मनोरंजन क्षेत्रात गुंतवणूक आणि वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल दोन दिवसीय ब्रिक्स वेव्हज बाजार परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यंदा इफ्फीसोबतच ब्रिक्स चित्रपट महोत्सव होणार असल्याचं, माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी यावेळी सांगितलं. ब्रिक्सच्या २० देशातले ५०० हून अधिक सदस्य या परिषदेत सहभागी झाले आहेत. या देशांतल्या विविध भाषा, नागरीकरण, परंपरांची देवाणघेवाण होण्याला या परिषदेमुळे मदत होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधल्या शिक्षण सेवक तसंच शिक्षक या ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी ही माहिती दिली. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीने ही भरती करण्यात येत असल्याचं सिंह यांनी सांगितलं.

****

एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदारयादीत नावं समाविष्ट करता येईल, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. प्रारुप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना सहा, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करुन मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत संबंधित मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा नाव नोंदवता येईल, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.

**

परभणी जिल्ह्यात गंगाखेड उपविभागाने विशेष सखोल पुनरीक्षण अभियानांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात सर्वप्रथम १०० टक्के काम पूर्ण करण्याचा मान मिळवला आहे. यासोबतच छत्रपती संभाजीनगर विभागातही १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करणारा गंगाखेड हा पहिला विधानसभा मतदारसंघ ठरला आहे.

****

ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं काल निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. श्री. वि. कुलकर्णी यांच्या डोह या पहिल्याच ललित लेखसंग्रहाने त्यांना मराठी साहित्यविश्वात महत्वाचं स्थान मिळवून दिलं. कराड इथं झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते.

कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्राची हानी झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी श्रीनिवास कुलकर्णी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****

कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी काल जालना जिल्ह्यात बदनापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन बायोमिक्स प्रयोगशाळा, माती परीक्षण प्रयोगशाळा, कृषी प्रदर्शन स्टॉल आणि संशोधन उपक्रमांची पाहणी केली. जैविक शेती, मृदा आरोग्य संवर्धन आणि शाश्वत कृषी विकासासाठी राबववण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. कृषी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून संशोधनाधिष्ठित शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचं मंत्री जयस्वाल यांनी आवाहन केलं.

****

पुण्याच्या डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या वतीने लातूरच्या विलास सहकारी साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना - २०२६ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या यशाबद्दल पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधींनी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली देशमुख यांची बाभळगाव निवासस्थानी भेट घेऊन सत्कार केला.

****

परभणी जिल्ह्यात पालम इथं पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा काल पार पडला. यात एकूण १८७ उमेदवारांनी सहभाग घेतला, त्यापैकी ६० उमेदवारांची प्राथमिक निवड, तर १२ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली.

****

जालना इथल्या महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल हिवराळे यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांना दीड लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. महाविद्यालयातून प्रबंधक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला अर्जित रजा रोखीकरण आणि भविष्य निर्वाह निधीचा लाभ देण्यासाठी आरोपींनी लाचेची मागणी केली होती.

****

नांदेड जिल्ह्यात धर्माबाद तालुक्यातल्या बाळापूर इथल्या डेबेकर कुटुंबियांनी, पिकांवर फवारणीसाठी घरात ठेवलेल्या कीटकनाशकाचा फैलाव झाल्याने संपूर्ण कुटुंबाला विषबाधा झाली. या घटनेत दोन मुलींचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****

लातूर शहरात कचरा व्यवस्थापन, पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था आदी मूलभूत नागरी समस्यांकडे काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत महायुती आणि घटक पक्षांच्या वतीने काल गांधी चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी काँग्रेसविरोधात घोषणाबाजी करत शहरातली प्रलंबित विकासकामं तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.

****

पैठणच्या जायकवाडी धरणातून होणाऱ्या विसर्गात कपात करण्यात आली आहे. सध्या धरणातून सहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या सांडव्याद्वारे सुमारे चार हजार तीनशे घनफूट, उजव्या कालव्यातून एक हजार, तर डाव्या कालव्यातून ७०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या १० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरू असून, पाणी साठा सुमारे ९३ टक्क्यांवर स्थिर आहे.

**

दरम्यान, हवामान विभागाने मराठवाड्यात सगळ्या जिल्ह्यांत पुढचे पाच दिवस जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आला आहे.

****

No comments:

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...