Thursday, 27 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.08.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 27 August 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ ऑगस्ट २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

नेपाळमधल्या रसुआ जिल्हा आणि सभोवतालच्या परिसरात काल आलेल्या भीषण पुरात सुमारे १६० लोकांचा मृत्यू झाला असून, १३३ भारतीय नागरिकांसह ७५०हून अधिक लोक बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्या भारतीयांमध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या किमान ५० यात्रेकरुंचा समावेश आहे. तिबेटमध्ये झालेल्या हिमस्खलनामुळे आलेल्या या पुरात अनेक शहरं आणि गावं उद्ध्वस्त झाली असल्याची माहिती, नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी दिली. पूरग्रस्त भागातल्या विविध ठिकाणांवरुन सुमारे १०० लोकांची सुटका करण्यात आली असून, त्यापैकी ३० जणांवर काठमांडू इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पूरग्रस्तांसाठी भारताने आतापर्यंत १० टन मदत साहित्य पाठवलं आहे. काठमांडू इथल्या भारतीय दुतावासाने तसंच बीजिंगमधल्या दुतावासाने भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी आणि माहितीसाठी आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत.

**

दरम्यान, नेपाळमधल्या पुरात झालेल्या प्रचंड हानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी नेपाळच्या जनतेप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. या कठिण काळात भारत मदत आणि बचाव कार्यात सहकार्य करण्यासाटी नेपाळच्या जनतेच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा करुन सर्वतोपरी मदत देण्याचं आश्वासन दिलं.

**

नेपाळमधल्या या परिस्थितीवर केंद्र सरकारचं बारकाईनं लक्ष आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर बिहार आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या पुराचा परिणाम पुढे भारतातल्या गंडक नदीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. संभाव्य परिणाम होऊ शकणाऱ्या सीमावर्ती भागांमध्ये स्थानिक प्रशासन, बचाव पथकं आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आलं आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश सरकारकडून भारत-नेपाळ सीमेजवळील नागरिकांसाठी आवश्यकतेनुसार स्थलांतर आणि मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे.

****

गोवा राज्याला पोर्तुगीज राजवटीतून मुक्त करण्यासाठी झालेल्या ऐतिहासिक संघर्षाशी संबंधित पत्रादेवी इथल्या पुनर्विकसित हुतात्मा स्मृती स्मारकाचं काल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय ऊर्जा तसंच नव आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक उपस्थित होते. गोवा मुक्तीचा लढा हा केवळ प्रादेशिक संघर्ष नव्हता, तर तो भारताच्या राष्ट्रीय चेतना आणि एकात्मतेची अभिव्यक्ती होता, असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

****

देशात उच्च वाहतूक घनता असलेल्या सात मार्गांवर चार पदरी रेल्वे जाळे उभारण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे, अशी माहिती, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. देशाच्या एकूण रेल्वे वाहतुकीपैकी, ४१ टक्के रेल्वे वाहतूक असलेल्या या मार्गांवर, या चार पदरी रेल्वेमार्गामुळे, ११ हजार किलोमीटरचं रेल्वेजाळं वाढणार आहे. या सात रेल्वेमार्गात मुंबई-दिल्ली, मुंबई-हावडा, चेन्नई-मुंबई, दिल्ली- हावडा, हावडा-चेन्नई, दिल्ली-चेन्नई आणि दिल्ली-गुवाहाटी या मार्गांचा समावेश आहे. या सर्व मार्गांना आता चारपदरी केलं जाणार आहे. यामुळे या मार्गांची क्षमता वाढेल आणि मालवाहतुकीसाठी अधिक मार्ग उपलब्ध होतील, अशी अपेक्षा वैष्णव यांनी व्यक्त केली.

****

कांद्याच्या वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर येत्या काही महिन्यात कांद्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि झालेली भाववाढ नियंत्रित ठेवण्यासाठी, केंद्र सरकारने राखीव साठ्यातून नियोजनपूर्वक आणि टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी कांद्याची उपलब्धता समाधानकारक असेल, असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने सांगितलं आहे. राखील साठ्यातल्या या कांद्याची राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ - नाफेडच्या फिरत्या गाड्या आणि किरकोळ विक्री केंद्रांमधून, तसंच सफल आणि केंद्रीय भंडारच्या केंद्रांमधून ३५ रुपये प्रति किलो दराने विक्री करण्यात येईल.

****

नारळी पौर्णिमा आज साजरी होत आहे. श्रावण पौर्णिमेचा हा दिवस कोळी बांधव पारंपरिक पद्धतीनं आणि उत्साहात साजरा करतात. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. याच दिवशी मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात केली जाते.

****

कथित ऑनलाईन गुंतवणूक फसवणुकीप्रकरणी गुजरातमधल्या सुरत शहर सायबर गुन्हे शाखेनं परभणी जिल्ह्यातल्या दोन जणांना काल अटक केली. संबंधित व्यक्तींनी शेअर बाजारातल्या गुंतवणुकीचं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आमिष दाखवून सुमारे नऊ लाख ५८ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सुरतमधल्या व्यक्तीनं केली होती. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...