Monday, 17 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.08.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 17 August 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ ऑगस्ट २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

रेल्वे प्रवाशांना सुरक्षित आणि स्वच्छ पेयजल उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तात्काळ सुधारणा उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. पेयजलाच्या गुणवत्तेबाबत कॅगच्या अहवालानंतर रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे मंडळाचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. याअंतर्गत वॉटर कूलरसह जवळपास २० हजार ठिकाणी ‘टाकी ते नळ’ जलशुद्धीकरण प्रणाली उभारण्यात येणार आहे. पाण्याच्या टाक्याही तातडीने बदलण्यात येणार असून, साठवणूक टाक्यांची नियमित स्वच्छता आणि देखभालीवर रेल्वे मंडळाच्या पातळीवर देखरेख ठेवली जाणार आहे.

****

राज्यातल्या गरीब आणि गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतला निधी अपुरा पडत असल्यास, अतिरिक्त खर्च कॉर्पस फंडातून उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. राज्यात अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपणाच्या मोहिमेला गती देण्याच्या दृष्टीने पुण्यात रुबी हॉल क्लिनिक आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत गरीब आणि गरजू रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसंच खासगी रुग्णालयं आणि शासकीय आरोग्य योजनांमध्ये समन्वय वाढवून सर्वसामान्य रुग्णांना अधिक चांगल्या आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही आबिटकर यांनी दिले.

****

महसूल विभागांतर्गत प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणं परस्पर सहमतीने आणि तडजोडीने निकाली काढण्यासाठी राज्यभरात एक सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’  राबवण्यात येणार आहे. महसूल विभागाने यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला. सर्व स्तरांवर तीन महिन्यांतून एकदा महसूल लोक अदालत आयोजित करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.

****

श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारनिमित्त आज राज्यभरातल्या शिवमंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पहाटेपासूनच मंदिरांमध्ये अभिषेक, पूजा आणि दर्शनासाठी भाविकांची रांग पाहायला मिळत आहे. त्र्यंबकेश्वर आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरांमध्येही मध्यरात्रीपासून भाविक मोठ्या संख्यने दाखल होत आहेत. बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैद्यनाथ मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी वैजनाथ देवस्थान ट्रस्टकडून विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली असून, सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त असून १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, आज नागपंचमीचा सणही साजरा होत असल्याने राज्यभर भक्तीमय वातावरण आहे. कृषी संस्कृतीशी घट्ट नातं असलेल्या नागपंचमीनिमित्त विविध गावांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

सांगली जिल्ह्यात अनिष्ट आणि अघोरी प्रथा तसंच जादूटोण्याच्या माध्यमातून पीडितांची फसवणूक करून मिळालेल्या पैशांची विल्हेवाट लावल्याप्रकरणी कुर्डुवाडी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत आणखी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी मनोहर ऊर्फ ‘मामा’ चंद्रकांत भोसले याच्यासह सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात एकूण सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

****

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या प्रस्तावित राहुरी–शनिशिंगणापूर रेल्वे मार्ग रेल्वे विभागाने मंजूर केला, मात्र यामुळे शेतकर्‍यांच्या सुपीक जमिनी जात असल्याने हा रेल्वे मार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी राहुरी इथं नगर–मनमाड महामार्गावर शेतकर्‍यांनी काल रस्ता रोको आंदोलन केलं. भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्राजक्त तनपुरे यावेळी उपस्थित होते.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगार आणि उद्योग उभारणीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी सुधारित बीजभांडवल योजना आणि जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त पात्र सुशिक्षित बेरोजगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक करुणा खरात यांनी पत्रकाद्वारे केलं आहे.

****

एफआयएच हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय पुरुष संघाचा सामना आज इंग्लंडशी होणार आहे. या आधींच्या सामन्यात भारताने वेल्स संघावर तर इंग्लंडने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे.

महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताने बलाढ्य चीनला काल 2-2 असं बरोबरीत रोखलं. भारताकडून नवनीत कौर आणि दीपिकाने गोल केले.

****

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. भारत तब्बल १७ वर्षांनंतर या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचं यजमानपद भूषवत आहे. महिला एकेरीत दोन वेळा ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू भारतीय संघाचं नेतृत्व करणार असून, आज तिचा सामना आयर्लंडच्या सोफिया नोबलशी होणार आहे. महिला दुहेरीत ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद, पुरुष एकेरीत आयुष शेट्टी, पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, तर मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांचे सामने आज होणार आहेत.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...