Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 10
August 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या
चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. दोन्ही सभागृहांमध्ये आज अनेक महत्त्वाची
विधेयकं सादर होणार असून, त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र आजचं कामकाज
सुरु होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी नीट आंदोलनातल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या
कथित पोलीस कारवाईसह अन्य मुद्द्यांवरून केलेल्या गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज
बाधित झालं.
लोकसभेत अकरा वाजता सदनाचं
कामकाज सुरू होताना पीठासीन अधिकारी एन. के. प्रेमचंद्रन यांनी प्रश्नोत्तराचा तास
सुरू केला मात्र, विद्यार्थ्यांवरच्या पोलीस कारवाईबाबत गृहमंत्री अमित
शाह यांनी निवेदन करावं, अशी मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सदनाचं
कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.
राज्यसभेत कामकाज सुरु झाल्यावर
भाजपचे तरुण चुघ यांनी पंजाबमधली कायदा आणि सुव्यवस्थेची ढासळती स्थिती आणि युवापिढीत
वाढत चाललेल्या मादक पदार्थांच्या व्यसनाबाबत भाष्य केलं. याबाबत पंजाब सरकार आवश्यक
ती कारवाई करत नसल्याची टीका त्यांनी केली. भाजपच्या बाबूभाई देसाई यांनी गुजरातमध्ये
आढळून येत असलेल्या चंडिपुरा विषाणूच्या आजाराचा मुद्दा मांडत, सरकारनं या
आजाराबाबत देशव्यापी अभियान चालवावं अशी सूचना केली. या सर्व कामादरम्यान विरोधकांनी
सातत्यानं केलेल्या घोषणाबाजीचा गोंधळ वाढत गेल्यानं राज्यसभेचं कामकाजही आधी १२ वाजेपर्यंत
आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.
****
गव्हर्नमेंट ई–मार्केटप्लेस
– GeM ला आज दहा वर्ष पूर्ण झाली. या योजनेने डिजिटल सार्वजनिक खरेदीला सर्वसमावेशक आणि
पारदर्शक स्वरूप दिलं आहे. GeM ने एकूण २० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून, आतापर्यंत
तीन कोटींहून अधिक ऑर्डर्स पूर्ण झाल्या आहेत. तसंच १२ लाखांहून अधिक सूक्ष्म आणि लघु
उद्योग GeMवर नोंदणीकृत झाले आहेत. सरकारी खरेदीच्या प्रवाहात महिला उद्योजकांचा वाढता सहभाग
हा आत्मनिर्भर भारत आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा असल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
आशियायी सिंहांच्या संरक्षणामध्ये
भारतानं मिळवलेलं यश म्हणजे वन्यप्राणी आणि जैविविधतेबाबत सरकारच्या अतूट वचनबद्धतेची
गौरवपूर्ण साक्ष आहे, असं केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्री
भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. जागतिक सिंह दिनाच्या औचित्यानं आज त्यांनी समाजमाध्यमावरच्या
संदेशात हे प्रतिपादन केलं. २०१५ साली देशात आशियायी सिंहांची संख्या पाचशे तेवीस होती, ती २०२५ मध्ये
आठशे एक्क्याण्णवपर्यंत पोचल्याचं त्यांनी सांगितलं. आशियायी सिंहांची गर्जना पुढच्या
पिढ्यांपर्यंत गर्जत राहण्यासाठी सर्वांनी नैसर्गिक वारशांचं संरक्षण करत रहावं, असं आवाहनही
यादव यांनी केलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र
पवार पक्षाचे खासदार आज पंतप्रधानांना भेटणार असून, याकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची
गरज नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी
बोलत होते. पंतप्रधान हे कुठल्या एकट्या पक्षाचे नसतात, विरोधकही त्यांना आपल्या विकास
कामासाठी भेटू शकतात, असं ते म्हणाले. परकीय योगदान नियमन कायदा एफसीआरए हा
कुठल्या विशिष्ट धर्माविरोधात नसून केंद्र सरकारने परकीय निधीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी
आणि याचा वापर देश विरोधी कृत्यांसाठी होऊ नये म्हणून संसदेत हे विधेयक आणल्याचंही
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ अंतर्गत
लातूर, नांदेड, धाराशिव आणि बीड या चार जिल्ह्यांतल्या ६१ हजार २१६ शेतकर्यांना एकूण ४६२ कोटी
८१ लाख रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे. सहकार विभागाचे लातूर विभागीय सहनिबंधक
नानासाहेब चव्हाण यांनी ही माहिती दिली. यात लातूर जिल्ह्यात सुमारे एकशे साठ कोटी, नांदेड आणि
धाराशिव जिल्ह्यात प्रत्येकी सुमारे एकशे सहा कोटी तर बीड जिल्ह्यात सुमारे एक्क्याण्णव
कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. राज्यातल्या कर्जखात्यांचं आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या
पात्र शेतक-यांच्या खात्यात निधी जमा झाला असून, खरीप पीक कर्ज तातडीनं वितरित
करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा
तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या तीन विद्यार्थिनींचा विषारी सापानं
दंश केल्यामुळे मृत्यू झाला. या शाळेत काल मध्यरात्री दोन ते अडीच वाजताच्या सुमारास
काही विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं.
या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी
सांगितलं.
****
No comments:
Post a Comment