Friday, 7 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.08.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 07 August 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.

****

राष्ट्रीय हातमाग दिवस आज साजरा होत आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सात ऑगस्ट १९०५ रोजी स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली होती, त्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान करण्यात आले.

**

नागरिकांनी हातमागावरील किमान एक तरी उत्पादन खरेदी करावं आणि त्याचा व्हिडीओ तयार करुन तो प्रसारित करावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त केलं आहे.

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आम्ही त्या विणकरांना आणि कारागिरांना सलाम करतो, ज्यांच्या समर्पणामुळे हा अनमोल वारसा जिवंत राहतो, शाश्वत उपजीविका निर्माण होते आणि ग्रामीण समुदाय सक्षम होतात, असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. हातमागाची निवड करून, स्थानिक कारागिरांना पाठिंबा देऊन आणि 'व्होकल फॉर लोकल' आणि'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनांना बळकट करून, आपण त्यांच्या या अमूल्य योगदानाचा गौरव करूया, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

नीट परीक्षा मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित झालं.

लोकसभेत कामकाज सुरु झाल्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्वातंत्र्यसैनिकांना आणि 'भारत छोडो' आंदोलनातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. नऊ ऑगस्ट रोजी भारत छोडो आंदोलनाला ८४ वर्षे पूर्ण होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. या आंदोलनाने लोकशाही, स्वातंत्र्य, राष्ट्रीय एकता आणि संविधानात नमुद केलेल्या मूल्यांप्रति देशाची वचनबद्धता अधिक दृढ केली असल्याचं ते म्हणाले.

त्यानंतर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधकांनी विद्यार्थी आंदोलनादरम्यानच्या कथित पोलीस कारवाईवर गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन देण्याची मागणी लाऊन धरली. यावरुन गदारोळ वाढल्याने सदनाचं कामकाज १२ वाजेपर्यंत आणि नंतर सोमवार पर्यंत स्थगित झालं.

**

राज्यसभेतही 'भारत छोडो' आंदोलनातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर, मंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर विविध कागदपत्रे सादर केली. संरक्षण, गृह, वाणिज्य आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांशी संबंधित विभागीय संसदीय स्थायी समित्यांचे अहवालही मांडण्यात आले. नीट मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षाने गदारोळ सुरू केला. या गदारोळातही शून्य प्रहराच्या कार्यकाळात काही सदस्यांनी सार्वजनिक महत्त्वाचे तातडीचे विषय उपस्थित केले. मात्र गदारोळ सुरूच राहिल्याने राज्यसभेचे कामकाज आधी दुपारी बारा वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत स्थगित झालं.

****

नवी दिल्लीत आज हर घर तिरंगा २०२६ अभियानाच्या उपक्रमांची घोषणा केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केली. ९ ते १७ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या या अभियानातून राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची भावना अधिक दृढ करण्याचं उद्दिष्ट त्यांनी अधोरेखित केलं.

****

महाराष्ट्र सरकारनं दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या ११४ PDF मासिकांवर बंदी घालत ती जप्त करण्याचे आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या साहित्याचा भौतिक किंवा डिजिटल स्वरूपात ताबा बाळगणं, साठवणं, प्रसारित करणं, वितरण, विक्री किंवा प्रदर्शन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी असं साहित्य आढळल्यास संबंधित यंत्रणांना माहिती द्यावी; माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदने अमेरिकेत झालेल्या ग्रँड चेस टूर सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रज्ञानंद आणि उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर झवोखिर सिंदारोव्ह यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. प्रज्ञानंदला स्पर्धेत ३५ पैकी २३ गुण मिळाले. पाच दिवसांच्या या स्पर्धेत प्रज्ञानानंदने सुरुवातीपासूनच आघाडी कायम ठेवली.

****

कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या अश्मिता चालिहा आणि रक्षिता रामराजने उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या सामन्यात अश्मिताने जपानच्या हिना अकेची हिचा २०-२२, २१-१५, २१-१८ असा, तर रक्षिताने भारताच्याच तन्वी शर्मा हिचा २१-१८, १९-२१, १९-२१ असा पराभव केला. पुरुष दुहेरीत उपान्त्यपूर्व फेरीत आज पृथ्वी कृष्णमुर्ती रॉय आणि क्रिष्णा प्रसाद गर्ग यांचा सामना मलेशियाच्या जोडीशी होणार आहे.

****

पैठणच्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी ९३ टक्क्यांवर स्थिर आहे. धरणात सध्या दहा हजार आठ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरु असून, धरणातून सध्या चार हजार ३२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...