Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 August
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.
****
· संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १२ विधेयकं पारित, संसद अनिश्चित काळासाठी
तहकूब
· पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर नांदेड इथं हल्ला, हल्लेखोर
ताब्यात
· राज्यात नदीजोड प्रकल्पाला येत्या वर्षभरात प्रारंभ-मुख्यमंत्र्यांचं सुतोवाच
· स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याचं आज राष्ट्राला
संबोधन
आणि
· छत्रपती संभाजीनगर इथं आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रेचं आयोजन
****
संसदेचं पावसाळी अधिवेशन काल
अनिश्चित काळासाठी तहकूब झालं. काल सकाळी दोन्ही सदनाचं कामकाज सुरू होताच, वंदे मातरम्
गायनाने अधिवेशनाचा समारोप झाल्याची घोषणा, दोन्ही सदनांच्या
पीठासीन अधिकाऱ्यांनी केली. राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी
कामकाजाचा आढावा घेताना, सभागृहाची प्रतिष्ठा जपण्याचं आणि भारतीय
लोकशाहीच्या परंपरांनुसार आपली संसदीय जबाबदारी पार पाडण्याचं आवाहन सदस्यांना केलं.
२० जुलैपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात २५ दिवसांच्या कालावधीत एकूण १९ बैठका झाल्या.
अधिवेशन काळात झालेल्या कामकाजाबाबत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी पत्राकार
परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले…
बाईट - संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू
****
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री
आणि अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांच्यावर काल नांदेड इथं हल्ला झाला. नांदेड
जिल्ह्याच्या खासगी दौऱ्यावर आलेले बादल, काल मुदखेड तालुक्यात मातासाहेब गुरुद्वारा
इथं एका कार्यक्रमासाठी गेले असता, एका निहंगाने त्यांच्यावर
हल्ला केला. तीक्ष्ण हत्याराने झालेल्या या हल्ल्यात बादल यांच्या हाताला इजा झाली,
त्यांना नांदेडमधल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती
धोक्याबाहेर असल्याचं, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितलं.
दरम्यान, सदर हल्लेखोराला
ताब्यात घेण्यात आलं आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी मातासाब गुरुद्वारा
इथं भेट देऊन घटनेची माहिती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी फोनद्वारे सुखबीर सिंघ यांच्या प्रकृतीची चौकशी केली. या घटनेची उच्चस्तरीय
चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
****
केंद्रीय जल आयोगाची मान्यता
मिळाल्यानंतर याच वर्षी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला नदीजोड प्रकल्पाचं काम सुरू
करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काल मुंबईत महाराष्ट्र
जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. पश्चिम वाहिनी
नद्यांचं समुद्रात वाहून जाणारं पाणी, गोदावरी खोऱ्यात आणल्यास, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या तुटीची खोरी संतुलित करता येतील,
असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
****
शेतकऱ्यांच्या जमीन हक्कांचं
संरक्षण, भूसंपादनातले वाद कमी करणं आणि मालमत्ता नोंदणी प्रक्रिया पारदर्शक
करण्यासाठी राज्य सरकार विविध निर्णय घेत असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांनी दिली. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रत्यक्ष ताबा आणि वहिवाट
असूनही सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्डवर नाव नसलेल्या सुमारे दोन लाख ३१ हजार शेतकऱ्यांच्या
जमिनी त्यांच्या नावावर करण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार असल्याचंही,
त्यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा दर्जा
देण्यात यावा, अशी मागणी खासदार संदिपान भुमरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्यांकडे सविस्तर पत्र दिलं. मराठवाड्यातल्या
आरोग्य व्यवस्थेच्या भविष्यातल्या गरजा लक्षात घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची
विनंती भुमरे यांनी या पत्रात केली आहे.
****
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम
उद्योग मंत्रालयाच्यावतीने छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून तीन दिवसीय स्वदेशी एक्स्पो
२०२६ ची सुरुवात होणार आहे. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे
यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. देशभरातून ७५ हून अधिक प्रदर्शक या
प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.
****
देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन
उद्या साजरा होत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
आज राष्ट्राला संबोधित करणार आहेत. सायंकाळी सात वाजता त्यांचं हे संबोधन आकाशवाणीवरून
प्रसारित केलं जाईल.
**
दरम्यान, राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २०२४ - २५ या वर्षाचे संगीत नाटक अकादमी गौरववृत्ती आणि
पुरस्कार काल नवी दिल्लीत प्रदान करण्यात आले.
ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर यांना अकादमीची गौरववृत्ती देऊन गौरवण्यात आलं. इतर
पुरस्कार प्राप्त कलावंतांमध्ये आनंद भाटे, मुकुंद मराठे,
सनईवादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर,
मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार यांचा समावेश
आहे.
युवा कलावंतांसाठीचे उस्ताद
बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार यंदा देशातल्या १०६ कलाकारांना देण्यात आले. महाराष्ट्रातले
गायक कृष्णा बोंगाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे,
कठपुतळी कलावंत बालकृष्ण मासगे, संवादिनीवादक तन्मय
देवचके, आणि जागर कलावंत प्रवीण जाधव यांना यंदा हा पुरस्कार
मिळाला आहे.
****
राज्यात मतदान केंद्रस्तरीय
अधिकाऱ्यांनी घरोघरी भेट देऊन गणना प्रपत्र भरून घेण्याची मुदत येत्या सोमवारी १७ ऑगस्टला
संपत आहे. राज्यात एकूण नऊ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदार असून, त्यापैकी
सुमारे ७८ टक्के म्हणजे सात कोटी ६२ लाख ९९ हजार ३६० मतदारांचे गणना प्रपत्र भरुन तसंच
स्वाक्षरी करुन प्राप्त झालेले आहेत. प्रत्यक्ष गृहभेट दिल्यानंतर सापडू न शकलेले,
कायमस्वरूपी स्थलांतरीत झालेले, मृत झालेले,
तसंच इतर मतदारांच्या नावांच्या याद्या, राजकीय
पक्षांनी नियुक्त केलेल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना उपलब्ध करून देण्याची कार्यवाही
सुरू आहे. सर्व
जिल्हाधिकारी कार्यालयांच्या अधिकृत संकेतस्थळावर अशा याद्या प्रसिध्द करण्याची कार्यवाही
सुरू आहे.
****
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर
देशभरात सुरु असलेल्या हर घर तिंरगा मोहिमेत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत
आज छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली
काढण्यात येणार आहे.
**
धाराशिव इथं जिल्हा प्रशासनाच्या
वतीने काल तिरंगा रॅली काढण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा
महडदळकर यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, यांच्यासह
सर्व शासकीय विभागांचे प्रमुख, यात सहभागी झाले होते.
लातूर इथं जिल्हा प्रशासन
आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने काल तिरंगा रॅली काढण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषा पाटील, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी
रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.
हिंगोली नगर परिषदेच्या वतीने
तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यात आली. अधिकारी कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनीही या रॅलीत
सहभाग नोंदवला.
बीड शहरात आज ई-बाईक तिरंगा
रॅली काढण्यात येणार आहे.
**
हर घर तिरंगा अभियानात सर्व
नागरिकांनी सहभागी व्हावं, आणि आपापल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर
इथले सैन्यदलातून निवृत्त झालेले कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांनी केलं. ते म्हणाले…
बाईट – निवृत्त कॅप्टन सुरेंद्र सुर्वे
****
परभणी जिल्ह्यात वालूर इथं
आयोजित मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या मार्गदर्शन कार्यशाळेचं उद्घाटन
काल पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी
लाभ घेऊन शेतीला पूरक पशुपालन व्यवसायातून उत्पन्नवाढ साधावी, असं आवाहन
त्यांनी यवेळी केलं.
****
विकसित भारत रोजगार आणि उपजीविका
हमी कामांचं नियोजन करून ग्रामीण भागाचा शाश्वत विकास साधावा, असं आवाहन
रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केलं. काल छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हास्तरीय
पंच संमेलनात’ ते बोलत होते. गावांच्या विकासासाठी कायमस्वरूपी आणि उपयुक्त मालमत्ता
निर्माण करणं हा ‘विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियानाचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
अंमली पदार्थ विरोधी कृती
दलाने धाराशिव जिल्ह्यातल्या ढोकी इथं चरस आणि गांजाचा साठा जप्त केला. गोपनीय माहितीच्या
आधारे पथकाने बाप्पा शंकर पवार यांच्या घरावर छापा टाकून ५० किलो ३५८ ग्रॅम गांजा आणि
१३१ ग्रॅम चरस तसंच २१ तोळे सोनं आणि रोख रक्कम असा एकूण ६९ लाख १९ हजार १९० रुपयाचा
मुद्देमाल जप्त केला.
****
हवामान
राज्यात आज कोकणासह पुणे, सातारा आणि
कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसराला तसंच विदर्भात बहुतांश जिल्ह्यांना हवामान
विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment