Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 24
August 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.
****
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल जपानच्या
दौऱ्यावर असून, आज त्यांनी भारतीय दूतावास आणि जपान
चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या जपान-भारत व्यवसाय सल्लागार समितीच्या गोलमेज परिषदेत
सहभाग घेतला. भारत आणि जपान यांच्यातल्या राजनैतिक संबंधांच्या अमृतमहोत्सवानिमित्त
हे वर्ष ‘भारत-जपान सामायिक क्षितिज वर्ष’ म्हणून घोषित करण्यात आलं आहे. भविष्यातल्या
भागीदारीवर चर्चा करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं.
भारतात मोठ्या संख्येनं जपानी कंपन्या कार्यरत असून, भारत आजच्या सुमारे चार ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेतून २०४७
पर्यंत ३० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, या प्रवासात जपान भारताचा महत्त्वाचा भागीदार असेल, अशी अपेक्षा गोयल यांनी व्यक्त केली.
****
वैद्यकीय उपकरण क्षेत्रात व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी
सरकारने महत्त्वपूर्ण नियामक सुधारणा लागू केल्या आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने
प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, ‘मेडिकल डिव्हाइसेस रुल्स, २०१७’ मध्ये तीन प्रमुख बाबींअंतर्गत सुधारणा करण्यात आल्या आहेत.
वैद्यकीय उपकरणांच्या निर्जंतुकीकरणाशी संबंधित नियमांचं सुलभीकरण, चाचणी शुल्कात एकसमानता आणणं आणि वैद्यकीय तपासणी अटींमधून
सूट देण्यासाठी मान्यताप्राप्त परदेशी अधिकारक्षेत्रांच्या यादीत युरोपियन युनियनचा
समावेश करणं, या तीन महत्त्वाच्या सुधारणांचा
यात समावेश आहे. या सुधारणांमुळे नियामक प्रक्रिया सोपी होईल, अनुपालन खर्च कमी होईल, पारदर्शकता आणि अचूकता वाढेल, तसंच देशात प्रगत आणि नाविन्यपूर्ण वैद्यकीय उपकरणं वेळेत उपलब्ध
होण्यास मदत होईल, असं मंत्रालयानं म्हटलं
आहे.
****
मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचं आज
पुण्यात निधन झालं, त्या १०१ वर्षांच्या
होत्या. भाषाशास्त्र आणि प्रमाण मराठीच्या समर्थनासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केलं.
यास्मिन शेख यांनी छत्रपती संभाजीनगर इथल्या मिलिंद महाविद्यालयात अध्यापन केलं. त्यानंतर
मुंबईतल्या एस आय ई एस महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ काम केलं.
श्री. पु. भागवत आणि विंदा करंदीकर यांसारख्या साहित्यिकांबरोबर त्यांनी काम केलं.
त्या महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुखही राहिल्या. त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या
विद्यार्थ्यांना आणि लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींना मराठी व्याकरण आणि भाषाशास्त्र
शिकवलं. मराठी लेखन मार्गदर्शिका, मराठी शब्दलेखन कोश, सुगम मराठी व्याकरण कोश ही त्यांची काही पुस्तकं आहेत. यास्मिन
शेख यांच्या निधनानं मराठी भाषा विश्वातील एक व्रतस्थ, अभ्यासू आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची
भावना व्यक्त होत आहे.
****
अमरावतीमधल्या स्त्री जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु
अतिदक्षता विभागात आज पहाटेच्या सुमारास आग लागून तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना दुःखद आणि
हृदयद्रावक असल्याचं म्हटलं आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आरोग्य
प्रशासनाला देण्यात आले असून, घटनेतल्या दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं. मृत
बालकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, तसंच जखमी बालकांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही
अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
नागपूर जिल्ह्यात गोधनी गावात जल शुद्धीकरण प्रकल्पातल्या
नऊशे किलो क्षमतेच्या क्लोरीन गॅस सिलेंडर मधून आज पहाटे क्लोरीनची गळती सुरू झाल्याची
घटना घडली. प्रकल्पातला वायू आजबाजूच्या परिसरात पसरल्यामुळे अनेक लोकांना खोकला येऊन
श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. पोलिसांच्या मदतीने आजूबाजूच्या वस्तीतल्या नागरिकांना
हलवण्यात आलं असून, गंभीर रुग्णांवर रूग्णालयात
उपचार सुरू आहेत.
****
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अकरावीच्या
प्रवेशासाठी दहावी फेरी जाहीर केली आहे. २७ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना या फेरीत सहभागी
होऊन प्रवेश घेता येणार आहे. राज्यात अद्यापही अकरावीच्या आठ लाख ९४ हजार जागा रिक्त
असल्याचं दिसून आलं.
****
श्रावण महिन्यातला आज दुसरा सोमवार असून, अनेक शिव मंदिरांमध्ये पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी
पाहायला मिळत आहे. वेरुळ इथल्या घृष्णेश्वर, बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैद्यनाथ तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या
औंढा नागनाथ मंदिरात प्रशासनाकडून दर्शन रांगा, पिण्याचं पाणी आणि सावलीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
****
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या
दुसऱ्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या सात गडी बाद ४३१ धावा झाल्या
होत्या. धृव जुरेल ६६, तर मानव सुतार पाच धावांवर
खेळत आहेत.
****
नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या पुरुषांच्या एफआयएच हॉकी
विश्वचषक स्पर्धेत भारताचा सामना आज अर्जेंटिनाविरुद्ध होणार आहे. संध्याकाळी सव्वा
सहा वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment