Tuesday, 18 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 18.08.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 18 August 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यातल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

·      खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व महानगरपालिकांनी तत्काळ कामाला लागावं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

·      एसआयआर प्रक्रियेत दोन कोटींहून अधिक मतदारांच्या अर्जांची प्रतीक्षा, अर्ज जमा करण्याची मुदत संपली

·      श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला पहिल्या डावात १७८ धावांची आघाडी

आणि

·      पुढील दोन दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

****

राज्यातल्या पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातल्या विविध विकास प्रकल्पांची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. केंद्र सरकारच्या समन्वयातून सुरू असलेल्या योजना आणि प्रकल्पांना अधिक गती देण्यासाठी आवश्यक सहकार्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली. महामार्ग, रेल्वे, मेट्रो, नदीजोड प्रकल्प तसंच उत्तन-विरार कॉरिडॉर यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांबाबत यावेळी चर्चा झाली. यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले:

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

**

दरम्यान, फडणवीस यांनी काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतली. मुंबई-वाढवण एक्सप्रेस-वे कनेक्टिव्हीटीकरता जायकामार्फत आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून परवानगी मिळावी, अशी विनंती त्यांनी या बैठकीत केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महाराष्ट्रातल्या विविध प्रकल्पांच्या प्रलंबित पर्यावरण आणि वनविषयक मंजुरींचा आढावा घेतला.

****

खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्यातल्या सर्व महानगरपालिकांनी तत्काळ कामाला लागावं, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पावसाळ्यात तातडीने रस्ते बुजवण्यासाठी प्री कास्ट आणि जिओ पॉलिमर टेक्नो पॅच यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, तसंच शहरातले अंतर्गत रस्ते आणि विसर्जन मार्गावरचे खड्डे तातडीने बुजवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा असंही शिंदे यांनी सूचित केलं. छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड यासह अन्य प्रमुख महानगरपालिकांचे आयुक्त या बैठकीला उपस्थित होते.

दरम्यान, परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाचा काल शिंदे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणं ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची ताकद असल्याचं ते यावेळी म्हणाले.

****

राज्यात एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा काल शेवटचा दिवस होता. प्रारुप मतदार यादी २४ ऑगस्टला प्रकाशित होणार असून, त्यावर २३ सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. २२ ऑक्टोबरपर्यंत हे आक्षेप निकाली काढले जातील आणि २७ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.

निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात दोन कोटी सात लाख ९३ हजार ९१६ मतदारांचे अर्ज मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांना मिळाले नव्हते. राज्यात एकूण नऊ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदार आहेत. त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या २१ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. तर एक लाख सात हजार ८७१ मतदारांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झाले नाही.

****

छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा औद्योगिक वससहतीत भरवलेल्या ‘स्वदेशी फॅशन अँड लाइफस्टाईल एक्स्पो २०२६’ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालयाच्या सहकार्याने १४ ते १६ ऑगस्टदरम्यान झालेल्या या प्रदर्शनात, देशाच्या विविध भागांतून आलेले कारागीर, विणकर, महिला उद्योजक आणि हस्तकला कलाकार सहभागी झाले होते. भारतीय हस्तकला, हातमाग आणि स्वदेशी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.

****

नागपंचमीचा सण काल पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा झाला. घरोघरी महिलांनी नागाची पूजा केली. सांगली जिल्ह्यातल्या मौजे बत्तीस शिराळा इथं ४१ ग्रामस्थांना केवळ शैक्षणिक उद्देशासाठी नाग पकडण्याची परवानगी देण्यात आली होती.

धाराशिव जिल्ह्यात श्री तुळजाभवानी मंदिरात होमकुंडासमोर नागदेवतेची पूजा करण्यासाठी सकाळपासूनच स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. परंपरेनुसार होमासमोर भवानी-शंकराचा पितळी नागफणा मांडण्यात आला होता. त्यासमोर चिखलाची नागदेवता तयार करून तिची पूजा करण्यात आली. सायंकाळी वाद्यांच्या गजरात नागदेवतेची उत्तरपूजा करुन, पारंपरिक पद्धतीने कल्लोळ तीर्थामध्ये विसर्जन करण्यात आलं.

****

श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारनिमित्त काल राज्यभरातल्या शिवमंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

बारावं ज्योतिर्लिंग असलेल्या वेरूळच्या घृष्णेश्वर दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले होते. छत्रपती संभाजीनगर ते खुलताबाद रस्त्यावर सकाळपासूनच पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैद्यनाथ मंदिरातही भाविकांची गर्दी पाहता देवस्थान ट्रस्टकडून विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली होती.

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथंही श्रावणी सोमवार आणि नागपंचमी हा दुहेरी योग आल्याने पहाटेपासूनच मंदिर खुलं करण्यात आलं होतं. महाराष्ट्रासह आजूबाजूच्या राज्यातल्या भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावत नागनाथाचं दर्शन घेतलं.

****

हिंगोली जिल्ह्यात वसमत नगरपरिषद आणि शासकीय जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोन नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. नगरसेवक हाफिज रहेमान आणि हबीब शेख बशिर यांच्याविरुद्ध यासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारींच्या आधारे प्रशासनामार्फत सखोल चौकशी करण्यात आली. कायदेशीर निकषांनुसार दोन्ही नगरसेवक दोषी आढळल्याने, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी अपात्रतेची कारवाई केली.

****

टीसीएस कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातली संशयित आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर इथं आश्रय दिल्याप्रकरणी ‘एमआयएम’चे नगरसेवक मतीन पटेल यांना नाशिकरोड न्यायालयाने काल सशर्त जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या सुनावणींना नियमित हजर राहत नसल्याने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट बजावलं होतं.

****

लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात ‘पैशांचा पाऊस’ पाडण्याच्या अंधश्रद्धेतून अघोरी विधी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातले दोन आरोपी फरार आहेत.

****

धाराशिव जिल्ह्यात ‘हरित धाराशिव 2.0’ उपक्रमाने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने उल्लेखनीय कामगिरी केली असून, मियावाकी पद्धतीने रोपलागवडीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स नोंदवला आहे. १४ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातल्या आठ ठिकाणी अवघ्या १२ तासांत ६० हून अधिक स्थानिक आणि देशी प्रजातींच्या दहा लाख सात हजार रोपांची लागवड करण्यात आली.

****

बीड जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत २७३ पूर्णांक दोन शतांश मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, जून ते सप्टेंबर या कालावधीत वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ४८ पूर्णांक तीन शतांश टक्के इतकं आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत पावसाची तूट कायम असल्यानं शेतकरी आणि नागरिक पावसाच्या प्रतिक्षेत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

लातूर इथले व्यापारी गगन मालपानी यांच्याकडे अडत व्यापाऱ्यांचं सुमारे दीड कोटी रुपयांचं बील थकीत असून, या रकमेची तातडीने वसुली करून देण्याच्या मागणीसाठी अडत व्यापारी असोसिएशनच्या वतीनं काल बाजार समिती परिसरात धरणे आंदोलन करण्यात आलं. बाजार समितीने व्यापारी तसंच त्यांच्या जामीनदाराविरुद्ध तातडीने कायदेशीर कारवाई करून थकीत रक्कम वसूल करून द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली.

****

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला पहिल्या डावात १७८ धावांची आघाडी मिळाली आहे. काल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव ४६२ धावांवर आटोपला. त्यानंतर श्रीलंकेचा पहिला डाव २८४ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून मानव सुतारने चार, रविंद्र जडेजाने तीन तर मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

****

येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...