Tuesday, 25 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.08.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 25 August 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ ऑगस्ट २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      यूपीआयची व्याप्ती प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद-दशकपूर्तीनिमित्त पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      कच्च्या साखरेवर प्रक्रिया तसंच विक्रीच्या मुदतीत कपात-साखरेच्या दरात घसरण

·      निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांची लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती

·      जिल्हा परिषद शाळांची पाहणी करून आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश

आणि

·      दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात श्रीलंका संघ २३८ धावांनी पिछाडीवर

****

यूपीआयची व्याप्ती ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद असल्याचं, प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. युनिफाइड पेमेंट इंटरफेस - युपीआयच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने सामाजिक माध्यमांवरच्या संदेशात पंतप्रधानांनी युपीआयच्या अभूतपूर्व यशावर प्रकाश टाकत, नागरिकांना त्यांचे युपीआय अनुभव आणि दैनंदिन जीवनावरील प्रभाव सोशल मीडियावर शेअर करण्याचं आवाहन केलं आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ ते २०२५-२६ या दहा वर्षांत युपीआय व्यवहारांच्या संख्येत १३ हजार पट तर मूल्यात चार हजार पट वाढ झाली आहे. जगातल्या ११ देशांमध्ये युपीआय कार्यरत असून, ७०३ बँका या प्रणालीशी जोडलेल्या आहेत. युपीआयद्वारे ३१४ लाख कोटींच्या व्यवहारांसह भारत जगातली सर्वात मोठी रिअल-टाईम पेमेंट प्रणाली बनली आहे.

****

शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत केंद्र सरकारनं बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त दोन महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाइंड साखरेत रूपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

राज्यात साखरेच्या दरात गेल्या तीन दिवसांत प्रतिक्विंटल १५०० रुपयांची मोठी घसरण झाली आहे. केंद्र सरकारनं साठेबाजी रोखण्यासाठी उचललेल्या कडक पावलांमुळे बाजारातली कृत्रिम तेजी ओसरल्यानं, घाऊक बाजारात ६७ रुपयांवर गेलेले दर खाली आले असून, किरकोळ बाजारातही प्रति किलो मागे सात रुपयांची घसरण झाली आहे. राज्यात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती साखर संचालक डॉ. केदारी जाधव यांनी दिली.

****

निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांची राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज त्यांना पदाची शपथ दिली. मुंबईत लोकभवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

शुक्रे यांची नियुक्ती २०२३च्या नव्या महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यानुसार केली गेली आहे. त्यांच्या नियुक्तीचा कालावधी हा पाच वर्षांसाठी किंवा ते वयाची ७० वर्षे पूर्ण करेपर्यंत, यापैकी जे अगोदर असेल, त्या दिवसापर्यंत असणार आहे.

****

राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या, पिण्याचं पाणी, स्वच्छतागृहं, वीज आणि वर्ग खोल्यांची स्थिती यांचा प्रत्यक्ष आढावा घेऊन आठ दिवसांत अहवाल सादर करावा, असे निर्देश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शाळांना वरचेवर भेटी देऊन सुविधा उपलब्धतेची पाहणी करावी, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी केली.

****

राज्यातल्या आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठीची वयोमर्यादेची अट रद्द करण्यात आल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज केली. आदिवासी समाजाच्या आमदार आणि खासदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना उईके यांनी ही माहिती दिली. राज्य शासनानं अलीकडेच वयाची ३० वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर मर्यादा घातली होती. मात्र विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर ही अट रद्द करण्यात आली आहे.

****

अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई क्रिकेट संघटनेच्या पाच उपहारगृहांचे परवाने अन्न आणि औषध प्रशासन-एफडीएने निलंबित केले आहेत. या विरोधात संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने या संघटनेला एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून येत्या गुरूवारी होणाऱ्या तपासणीपूर्वी उपाहारगृहाचा परिसर स्वच्छ करण्याचे निर्देश दिले.

****

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, डीआरडीओ नं विकसित केलेल्या सर्व पारंपरिक क्षेपणास्त्र प्रणालींचं तंत्रज्ञान भारतीय संरक्षण उद्योगाकडे सोपवण्याला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे या प्रणाली देशात तयार करता येतील आणि आयातीवरचं अवलंबित्व कमी होईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र तसंच जात वैधता प्रमाणपत्र देण्याकरता वंशावळ जुळवण्याची कार्यवाही करण्यासाठी तालुकास्तरावर नेमलेल्या समित्यांना १ जुलै २०२६ ते ३० जून २०२७ या एक वर्षाच्या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं आज या संदर्भातील शासन निर्णय जारी केला.

****

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सराला बेटाच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत असून सर्व विकासकामं पूर्ण झाल्यावर हे बेट महाराष्ट्रातल्या भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जा केंद्र असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनानिमित्त आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.

दरम्यान, महिला शेतकऱ्यांना शेतकरी म्हणून मान्यता मिळवून देणारा महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम आणल्याबद्दल, अहिल्यानगर इथल्या शेतकरी महिलांनी आज मुख्यमंत्र्यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली.

****

बुलडाणा इथल्या वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेकडून सीड्स बॉल बॉम्बार्डिंग प्रोजेक्ट राबवला जात आहे. यामध्ये गोफणीच्या साहाय्याने बीजगोळ्यांची पेरणी केली जात आहे. ज्या ठिकाणी वृक्षारोपण करणं खूप अवघड आहे अशा ठिकाणी गोफणीच्या साहाय्याने हे मातीचे गोळे दूरपर्यंत फेकले जात आहेत. या बीजगोळ्यांमध्ये कडुनिंब, आवळा, कदंब, जांभूळ, बहावा, बांबू, रिठा यांसारख्या विविध देशी आणि औषधी वनस्पतींच्या बियांचा समावेश आहे.

****

अरबी समुद्रातल्या प्रस्तावित शिवस्मारकाचं काम लवकरात लवकर मार्गी लावावं, या मागणीसाठी आज बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांना नागरिकांनी निवेदन दिलं. महाराष्ट्रातल्या सर्व शिवप्रेमींची श्रद्धा असलेल्या या स्मारकाबाबत शासनानं तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.

****

नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड शहरात पवित्र श्रावण महिन्याच्या औचित्यानं भव्य कावड यात्रा काढण्यात आली. या यात्रेत शिवभक्तांसह भाजपचे आमदार तुषार राठोड सहभागी झाले. या कावड यात्रेमुळे संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या सर्व शासकीय रुग्णालयं आणि आरोग्य संस्थांचे फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. अग्निसुरक्षा आणि विद्युत सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असं मित्तल यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग येत्या १ ते ८ सप्टेंबर या कालावधीत, पुढच्या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय संचलनासाठी सराव शिबीर घेणार आहे. यासाठीची निवड चाचणी काल पार पडली. यात प्राथमिक स्तरावर ३० स्वयंसेवकांची निवड झाली.

****

राज्य शासनानं यावर्षी घेतलेला, लघुलेखक संवर्ग मृत संवर्ग घोषित करण्याच्या निर्णय रद्द करावा आणि नियमित लघुलेखक भरती प्रक्रिया सुरू करावी, या मागणीसाठी युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीनं नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आजपासून उपोषण सुरू करण्यात आलं आहे.

****

क्रिकेट

श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड अधिक मजबूत झाली आहे. आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ थांबला तेव्हा यजमान श्रीलंकेच्या पहिल्या डावात आठ बाद २६५ धावा झाल्या होत्या. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी तीन तर मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. यजमान संघ पहिल्या डावात २३८ धावांनी पिछाडीवर आहे.

****

हवामान

मराठवाड्यात पुढचे तीन दिवस तुरळक ठिकाणी जोरदार वारे आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांसह विदर्भातले काही जिल्हे, जळगाव, नाशिक तसंच पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा परिसराला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

No comments:

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...