Monday, 10 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.08.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 10 August 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १० ऑगस्ट २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      संसद अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यालाही गदरोळाने सुरुवात

·      ‘द बँकर्स बुक्स एव्हिडन्स’ विधेयकाला संसदेची मंजुरी

·      न्यायाधिकरण सुधारणा विधेयक लोकसभेत चर्चेविना संमत

·      ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत छत्रपती संभाजीनगर इथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तिरंगा फेरीचं आयोजन

आणि

·      लातूर, नांदेड, धाराशिव तसंच बीड जिल्ह्यांतले ६१ हजार २१६ शेतकरी कर्जमुक्त

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. लोकसभेत केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक २०२६, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी केरळ नाव बदल विधेयक २०२६, केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांनी खाण आणि खनिज विकास आणि नियमन सुधारणा विधेयक २०२६ सादर केलं. पीठासीन अधिकारी एन.के.प्रेमचंद्रन यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू केला मात्र, विद्यार्थ्यांवरच्या पोलीस कारवाईबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन करावं, अशी मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

दोन वाजता लोकसभेचं कामकाज पुन्हा कार्यवाही सुरू झाल्यानंतर विधी आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी विरोधकांच्या गदारोळातच न्यायाधिकरण सुधारणा विधेयक २०२६ सादर केलं. विरोधकांच्या गोंधळात, चर्चेशिवायच हे विधेयक पारित झालं. यानंतर विरोधकांचा गदारोळ वाढत गेल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं.

राज्यसभेत कामकाज सुरु झाल्यावर भाजपचे तरुण चुघ यांनी पंजाबमधली कायदा आणि सुव्यवस्थेची ढासळती स्थिती आणि युवापिढीत वाढत चाललेल्या मादक पदार्थांच्या व्यसनाबाबत भाष्य केलं. याबाबत पंजाब सरकार आवश्यक ती कारवाई करत नसल्याची टीका त्यांनी केली. या सर्व कामादरम्यान विरोधकांनी सातत्यानं केलेल्या घोषणाबाजीचा गोंधळ वाढत गेल्यानं राज्यसभेचं कामकाजही आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

दुपारी दोन वाजल्यानंतर राज्यसभेच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली तेव्हा केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘द बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक, २०२६’ सभागृहात चर्चा आणि संमतीसाठी मांडलं. सदनानं ते आवाजी मतदानानं संमत केलं. लोकसभेने गेल्या आठवड्यातच हे विधेयक मंजूर केलं आहे. कर संरचना आणि इतर कायदे सुधारणा विधेयकावरही आज राज्यसभेत चर्चा झाली.

****

दरम्यान, नुकतंच झालेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्याच्याशी संबंधित मुद्द्यांवर सरकार संसदेत सखोल चर्चा करण्यास तयार असल्याचं, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. ते आज संसद परिसरात पत्रकारांशी बोलत होते. गृहमंत्री अमित शाह सुद्धा प्रत्येक मुद्द्यावर उत्तर देण्यास तयार असून, यासाठी विरोधकांनी सदनाची शिस्त पाळावी आणि यापुढचं कामकाज होऊ द्यावं, अशी अपेक्षा रिजिजू यांनी व्यक्त केली.

****

झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात विद्यार्थ्यांनी झारखंड विधानसभा परिसरात आज निदर्शनं केली. गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिसांना लाठीमार तसंच पाण्याचे फवारे मारावे लागल्याचं याबाबतच्या वृत्तात सांगितलं आहे. या आंदोलनाचा आज १७वा दिवस आहे. काही परीक्षा रद्द कराव्यात आणि कथित गैरप्रकारांची चौकशी सीबीआयमार्फत करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. यापैकी जवळपास ९८ टक्के मागण्या मान्य केल्याचा दावा झारखंड राज्य सरकारनं केला आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं केली, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनाविषयी राजकीय भूमिका घेणारा काँग्रेस पक्ष आता झारखंडमधल्या आंदोलनावर मौन बाळगत असल्याचं भाजपने म्हटलं आहे.

****

हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत येत्या शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तिरंगा फेरी आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज नागपूर इथे माध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली. देशभरात तरुणांमध्ये देशभक्तीचं वातावरण निर्माण करून विकसित भारताचं ध्येय साकारण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, या उद्देशानं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज नागपूर इथे ‘तिरंगा वंदे मातरम् प्रदर्शनी’चं उद्घाटन केलं. नागपूर जिल्ह्यातल्या अस्थिव्यंग आणि कर्णबधिरत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज जयपूर फूट आणि इतर सहाय्यक साधनांचं निःशुल्क वाटप करण्यात आलं. दिव्यांग व्यक्तींना दरमहा सुमारे वीस हजार रुपयांपर्यंत रोजगाराची साधनं उपलब्ध करून देणं, तसंच गृहनिर्माणासह विविध योजनांमध्ये दिव्यांगांना प्राधान्य मिळावं, यासाठीही शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

येत्या १७ तारखेपर्यंत चालणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेत नागरिकांनी सक्रीय सहभाग घेण्याचं आवाहन माजी केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड यांनी केलं आहे.

बाईट - माजी केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ अंतर्गत लातूर, नांदेड, धाराशिव आणि बीड या चार जिल्ह्यांतल्या ६१ हजार २१६ शेतकऱ्यांना एकूण ४६२ कोटी ८१ लाख रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे. सहकार विभागाचे लातूर विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी ही माहिती दिली. यात लातूर जिल्ह्यात सुमारे एकशे साठ कोटी, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात प्रत्येकी सुमारे एकशे सहा कोटी तर बीड जिल्ह्यात एक्क्याण्णव कोटी रुपये निधी मिळाला आहे.

****

२०२५ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मागास प्रवर्ग–महिला या प्रवर्गातून निवड झालेल्या रेखा अंबुरे यांचं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं नाही. बीड जिल्हा प्रशासनाकडून हा खुलासा करण्यात आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी याबाबत आरोप केला होता. अंबुरे यांच्या कुणबी जात नोंदीबाबत आक्षेप नोंदण्यात आला आहे, मात्र, त्या आधारावर जात प्रमाणपत्र रद्द करण्याची अधिकृत कार्यवाही झालेली नाही, असं प्रशासनानं सांगितलं आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या, एकत्रित वेतनावरच्या एकशे एक्केचाळीस सहाय्यक प्राध्यापक पदांसाठीच्या मुलाखतींना आजपासून सुरुवात झाली. या विद्यापीठाचा छत्रपती संभाजीनगर इथला मुख्य परिसर तसंच धाराशिव उपपरिसरासाठी या नेमणुका होणार आहेत. या महिन्याच्या तीन आणि चार तारखांना या पदांसाठीच्या लेखी परीक्षा झाल्या होत्या.

****

लातूर जिल्ह्यातल्या, शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणीमुळे अर्ज न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी स्थानिक वसतिगृहाचे गृहप्रमुख किंवा गृहपालांकडे अर्ज भरावेत, असं आवाहन सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी केलं आहे. याशिवाय, जागेअभावी वसतिगृह प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातल्या विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ ऑनलाईन पद्धतीनं देण्यात येणार असल्याचंही सहायक आयुक्तांनी कळवलं आहे.

****

पशुपालनातून शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करावेत, असं आवाहन भाजपचे नेते अक्षय मुंदडा यांनी केलं आहे. बीड इथे पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या प्रशिक्षणात पशुपालन क्षेत्रातल्या आधुनिक पद्धती, व्यवसायाच्या संधी आणि उपलब्ध साधनांचा प्रभावी वापर, याबाबत मार्गदर्शन केलं जाणार आहे.

****

हवामान

राज्यात आज पुणे तसंच सातारा जिल्ह्यात घाटमाथा परिसराला तर उद्या कोकणातल्या काही भागाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून सध्या १२ हजार ११० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामध्ये धरणाच्या सांडव्यातून नऊ हजार आठशे, उजव्या कालव्यातून बाराशे घनफूट तर डाव्या कालव्यातून अकराशे घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...