Friday, 28 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.08.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 August 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      सरकार २१व्या शतकातील आधुनिक क्रीडा परिसंस्था तयार करण्यास कटीबद्ध- पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      नेपाळमधे अडकलेल्या पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्याचा केंद्र सरकारशी समन्वय, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून हेल्पलाईन क्रमांक जारी

·      रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं प्रशिक्षण घेण्यासाठी एक वर्षाची मुदत

·      गणेशोत्सवातल्या प्रसादासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांच्या किमान निकषांचं पालन होणं गरजेचं, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

आणि

·      मतदार यादी पुनरीक्षणाच्या पुढील टप्प्यात दुरुस्त्या पारदर्शक आणि नागरिकाभिमुख ठेवाव्या, राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१व्या शतकातल्या भारतासाठी आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला. खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमाला त्यांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं. क्रीडा विद्यापीठं, आधुनिक प्रशिक्षण केंद्रं आणि इतर सुविधा विकसित करून खेळाडूंना प्रत्येक स्तरावर मदत केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारनं क्रीडा क्षेत्र आणि प्रतिभा शोधण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. ते म्हणाले,

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६ अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात देशभरातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या दोन महाविद्यालयांमधले युवक सहभागी झाले होते. धाराशिव इथं झालेल्या कार्यक्रमात मुष्टीयोद्धा सनी कापसे यांनी, युवकांना विविध क्रीडा प्रकारात स्वतःचं भविष्य घडवण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले,

बाईट – सनी कापसे

 

परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात या विशेष कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं. विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालयांतले ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

हिंगोली इथं न्यू मॉडेल डिग्री कॉलेज इथं या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं. माजी आमदार गजाननराव घुगे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

****

नेपाळमधल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर असून, अडकलेल्या पर्यटकांच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यांच्या सुरक्षित परतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाशीही समन्वय साधण्यात येत आहे.

दरम्यान, नागपूर जिल्ह्यातल्या स्वामी महाराज यांच्या समूहासोबत नेपाळमध्ये गेलेले ११० नागरिक सुरक्षित असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. त्यांची महाराष्ट्रात परतण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

**

राज्यातल्या इतर पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या संपर्कात असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातून नेपाळ, कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्यांची माहिती संकलित करावी असं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं असून, आपत्ती व्यवस्थापन विभागानं मदत दूरध्वनी क्रमांक जारी केले असल्याचं ते म्हणाले.

****

रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं प्रशिक्षण घेण्यासाठी एक वर्षाची मुदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईतल्या ऑटो आणि टॅक्सी चालक संघटनेच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मराठी शिकण्यासाठी अधिक वेळ देण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या एका वर्षाच्या कालावधीत कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले,

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

महाराष्ट्राचा राज्य उत्सव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सामध्ये मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या प्रसादासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांची माहिती करून घ्यावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भाविकांना शुद्ध प्रसाद मिळण्यासाठी आवश्यक किमान निकषांचं पालन होणं गरजेचं असून, यासाठी मंडळांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घ्यावं, असं ते म्हणाले. आगामी गणेशोत्सवानिमित्त कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री काल बोलत होते. गणेशोत्सव उत्साह, शिस्त आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी शासन, प्रशासन आणि गणेश मंडळांनी समन्वयानं काम करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं.

****

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाच्या पुढील टप्प्यात प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या अर्ज, सूचना आणि हरकतींवर तत्परतेने कार्यवाही करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले. छत्रपती संभाजीनगर विभागातलया विशेष सखोल पुनरीक्षणाच्या कामाचा आढावा घेताना ते काल बोलत होते. मतदार यादीतलया नोंदींची पडताळणी, नमुना क्रमांक ६, ७ आणि ८ मधल्या अर्जांवर कार्यवाही आणि आवश्यक दुरुस्त्या नियमानुसार पूर्ण करताना प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख ठेवावी, असं त्यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या साखर कारखान्यांसाठी यंदाच्या ऊस गाळप हंगामाच्या ऑनलाइन परवाना अर्जाची प्रक्रिया येत्या एक सप्टेंबरपासून सुरू होत आहे. कारखान्यांना ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी गाळप सुरू करण्यापूर्वी परवाना घेणं बंधनकारक आहे. परवाना न घेता गाळप सुरू केल्यास किंवा अटींचं उल्लंघन केल्यास संबंधित कारखान्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिला आहे.

****

राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा बहिण-भावांमधल्या खास नात्याचा सण आज साजरा होत आहे. या दिवशी बहिणी भावांना राखी बांधून त्यांच्या भरभराटीची, उत्तम आरोग्याची आणि सुखी आयुष्याची सदिच्छा व्यक्त करतात, तर भाऊ बहिणींना भेटवस्तू देऊन त्यांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचं रक्षण करण्याचं वचन देतात.

**

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या कवडा इथल्या मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी राखी पौर्णिमेच्या निमित्तानं विविध टाकाऊ पदार्थांपासून 'वारली राख्या' तयार केल्या आहेत. या राख्यांचं प्रदर्शन शाळेत भरवण्यात आलं आहे.

**

स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्री तळवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातल्या चारोसे या वनवासी गावात यावर्षीचा रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात येणार आहे. आज होणाऱ्या या उत्सवाला नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि मालेगाव इथून नागरीक उपस्थित राहणार आहेत.

****

श्रीक्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखड्यानुसार विकासकामं करतांना पुरातत्व विभागानं केलेल्या सूचनांचं पालन करावं, तसंच स्थानिक, दुकानदार आणि यात्रेकरू अशा सर्व घटकांना सर्वसमावेशक ठरेल अशी अंमलबजावणी करावी, असे निर्देश अपर मुख्य सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते.

दरम्यान, वेरूळ इथं प्रशासनाच्या वतीनं श्रावण महिन्यानिमित्त काल स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. वेरूळ हे जागतिक पर्यटन आणि धार्मिक महत्त्व असलेलं ठिकाण असून, इथं येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांना स्वच्छ, सुंदर आणि निरोगी वातावरण मिळावं, यासाठी प्रशासनाचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचं जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्यात सेलू तालुक्यातल्या देऊळगाव गात इथल्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते काल झालं. पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या या शाळेत विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

****

जालना शहरातल्या एमआयडीसी भागातल्या त्रिमूर्ती चौक इथं उभारण्यात येणाऱ्या चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा काल आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते पार पडला. गृह विभाग आणि महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या माध्यमातून या इमारतीला मंजुरी मिळाली आहे.

****

मराठवाड्यासह राज्यात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...