Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 August
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.
****
· कर आकारणी आणि इतर
कायदे सुधारणा विधेयकाला
संसदेची मंजुरी, न्यायाधिकरण सुधारणा
विधेयक लोकसभेत पारित
· विद्यार्धी आंदोलन आणि संबंधित मुद्द्यांवर सरकार संसदेत
चर्चा करण्यास तयार, संसदीय कार्यमंत्र्यांची माहिती
· हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत येत्या शुक्रवारी छत्रपती
संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तिरंगा फेरीचं आयोजन
· लातूर, नांदेड, धाराशिव तसंच बीड जिल्ह्यांत ६१ हजार २१६ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ
आणि
· जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सुमारे ९४ टक्क्यांपर्यंत, आज
विसर्ग थांबवण्यात येणार
****
कर आकारणी आणि इतर कायदे, सुधारणा
विधेयक, २०२६ काल संसदेनं मंजूर केलं. राज्यसभेनं
चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेकडे परत पाठवलं. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं
होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं होतं. या
विधेयकाद्वारे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टिम्स ॲक्ट, २००७, आयकर कायदा, २०२५, आणि
वित्त कायदा, २०२६ यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव
आहे. बाह्य आर्थिक धक्क्यांचा प्रभाव कमी करणं, देशांतर्गत
अर्थव्यवस्थेत स्थिरता सुनिश्चित करणं आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे
प्रभावित झालेल्या प्रमुख क्षेत्रांना आधार देणं, हा या
विधेयकाचा उद्देश असल्याचं, सीतारामन यांनी चर्चेला उत्तर
देताना सांगितलं. 'बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक २०२६' राज्यसभेत पारित झालं.
**
न्यायाधिकरण सुधारणा
विधेयक २०२६ काल लोकसभेत मंजूर झालं. विविध न्यायाधिकरणमधले सदस्य आणि
अध्यक्षांच्या नेमणुका,
प्रशासन आणि कारभारात पारदर्शिता, आणि
सक्षमता आणि सुधारणा तसंच, स्वतंत्र पणाची खातरजमा करणं
हे या विधेयकाचं उद्दीष्ट आहे.
केंद्रीय नागरी विमान
वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ
सुधारणा विधेयक २०२६,
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी केरळ नाव बदल
विधेयक २०२६,
केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांनी खाण आणि खनिज
विकास आणि नियमन सुधारणा विधेयक २०२६ काल लोकसभेत सादर केलं.
**
दरम्यान, विद्यार्थ्यांवरच्या पोलीस कारवाईबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन
करावं,
अशी मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात
कालही वारंवार व्यत्यय आला.
नुकतंच झालेलं
विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्याच्याशी संबंधित मुद्द्यांवर सरकार संसदेत सखोल
चर्चा करण्यास तयार असल्याचं, संसदीय कामकाज मंत्री
किरेन रिजिजू यांनी सांगितलं. ते काल संसद परिसरात
पत्रकारांशी बोलत होते. गृहमंत्री अमित शाह सुद्धा प्रत्येक मुद्द्यावर उत्तर
देण्यास तयार असून,
यासाठी विरोधकांनी सदनाची शिस्त पाळावी आणि यापुढचं कामकाज
होऊ द्यावं,
अशी अपेक्षा रिजिजू यांनी व्यक्त केली.
**
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही संसदेचं कामकाज
सुरळीत आणि शिस्तबद्ध पद्धतीने चालवण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या गटनेत्यांना
सहकार्य करण्याचं आवाहन केलं. संसद भवनात आयोजित
कामकाज सल्लागार बैठकीत, सभागृहातल्या सततच्या कोंडीबद्दल बिर्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त
केली.
****
एसटीच्या ८६ हजार
कर्मचाऱ्यांचं जुलै महिन्याचं वेतन आज, अकरा
तारखेला बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे
अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. शासनाकडून प्रतिपूर्तीची रक्कम वेळेत प्राप्त न
झाल्यानं आणि सलग आलेल्या सुट्ट्या आणि प्रशासकीय प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे
वेतन उशिरा होत असल्याचं त्यांनी सांगितलं. असा विलंब पुन्हा
होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना
दिले.
****
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव
विखे-पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांना जाहीर
झाला आहे. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी काल
ही घोषणा केली. नाट्य दिग्दर्शक सचिन शिंदे यांना नाट्यसेवा,
तमाशा कलावंत मालती इनामदार यांना कलागौरव, तर मराठी अभ्यास परिषदेला प्रबोधन पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत
येत्या शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत
तिरंगा फेरी आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी
काल नागपूर इथं माध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली. देशभरात
तरुणांमध्ये देशभक्तीचं वातावरण निर्माण करून विकसित भारताचं ध्येय साकारण्यासाठी
सर्वांनी एकत्र यावं, या उद्देशानं तिरंगा रॅलीचं आयोजन
करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. काल मुंबईतही तिरंगा रॅलीत केलेल्या भाषणात
मुख्यमंत्री म्हणाले…
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
****
येत्या १७ तारखेपर्यंत चालणाऱ्या
हर घर तिरंगा मोहिमेत नागरिकांनी सक्रीय सहभाग घेण्याचं आवाहन माजी केंद्रीय मंत्री
डॉ भागवत कराड यांनी केलं आहे.
बाईट- माजी केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड
****
धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनीही जिल्ह्यातल्या
नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं. त्या म्हणाल्या.
बाईट- मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर
**
‘हर घर
तिरंगा’ अभियानांतर्गत परभणी इथं आज तिरंगा सायकल आणि बाईक
रॅली काढण्यात येणार आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ अंतर्गत लातूर, नांदेड, धाराशिव
आणि बीड या चार जिल्ह्यांतल्या ६१ हजार २१६ शेतकऱ्यांना एकूण ४६२ कोटी ८१ लाख
रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे. सहकार विभागाचे लातूर
विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी ही माहिती दिली. यात लातूर जिल्ह्यात
सुमारे एकशे साठ कोटी, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात
प्रत्येकी सुमारे एकशे सहा कोटी तर बीड जिल्ह्यात एक्क्याण्णव कोटी रुपये निधी
मिळाला आहे.
****
नांदेड जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांची
तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीनल खतगावकर यांची बिनविरोध निवड
करण्यात आली. बँकेच्या २१ संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने
२१ पैकी १९ जागा जिंकल्या आहेत.
****
जालन्याचे ज्येष्ठ आणि
प्रख्यात चित्रकार श्रीधर अंभोरे यांचं काल निधन झालं, ते ७९ वर्षांचे होते. केवळ चित्रकार नव्हे, तर
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रेषांमधून साहित्याला दृश्यभाषा देणारे कलावंत म्हणून
अंभोरे यांची ओळख होती. महाराष्ट्रातल्या अनेक लेखक, कवी आणि
साहित्यिकांच्या पुस्तकांना त्यांनी आपल्या कलात्मक मुखपृष्ठांमधून वेगळी ओळख
मिळवून दिली. त्यांच्या निधनामुळे या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैलीचा एक महत्त्वाचा
अध्याय संपल्याची भावना कला-साहित्य क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
****
जालना पोलिसांनी काल ४१
घातक शस्त्रांचा साठा जप्त केला. या प्रकरणी शेख माजेद याला अटक करण्यात आली असून, त्याचा फरार साथीदार इम्रान ऊर्फ इम्मा सलीम शेख याचा पोलीस शोध घेत आहेत.
शेख माजेद याला न्यायालयाने १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. खासगी
ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून अजमेरहून विक्रीच्या उद्देशाने आणलेला २२ तलवारी,
१५ खंजीर आणि चार चॉपर पोलिसांनी जप्त केले, बाजारभावानुसार
त्यांची किंमत एक लाख ३४ हजार रुपये इतकी आहे.
****
२०२५ मध्ये झालेल्या
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मागास प्रवर्ग–महिला या प्रवर्गातून निवड झालेल्या रेखा अंबुरे यांचं कुणबी जात
प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं नाही. बीड जिल्हा
प्रशासनाकडून हा खुलासा करण्यात आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे
यांनी याबाबत आरोप केला होता. अंबुरे यांच्या कुणबी जात नोंदीबाबत आक्षेप
नोंदण्यात आला आहे, मात्र, त्या
आधारावर जात प्रमाणपत्र रद्द करण्याची अधिकृत कार्यवाही झालेली नाही, असं प्रशासनानं सांगितलं आहे.
****
भूजल सर्वेक्षण आणि विकास
यंत्रणेअंतर्गत जिल्हा संनियंत्रण कक्ष तसंच जिल्हा आणि उपविभागीय
प्रयोगशाळांमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचं गेल्या चार ते पाच महिन्यांपासून
न मिळालेलं वेतन तातडीनं द्यावं, या मागणीसाठी या
कर्मचाऱ्यांनी एक ऑगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केलं आहे.
****
हवामान
राज्यात आज कोकणातल्या काही
भागाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून सध्या १२ हजार
११० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामध्ये
धरणाच्या सांडव्यातून नऊ हजार आठशे, उजव्या कालव्यातून बाराशे
घनफूट तर डाव्या कालव्यातून अकराशे घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.
धरणात सध्या साडे सात हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरू
आहे.
****
No comments:
Post a Comment