Sunday, 16 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.08.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 16 August 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.

****

माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंती दिनी २१ ऑगस्टला राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार असून यानिमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यात “महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर” घेण्यात येणार आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा हे या मॅरथॉनचं घोषवाक्य आहे. कमाल ३ किलोमीटर चालणे, मृद आणि जलसंधारणाची शपथ घेणे असं या कार्यक्रमाचं स्वरुप आहे. मुंबईहून या राज्यस्तरीय मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमाच्या आयोजनाचे प्रमुख जिल्हास्तरीय मृद आणि जलसंधारण समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी हे असणार आहेत. याशिवाय १५ ते २१ ऑगस्ट, दरम्यान “जलसंधारण सप्ताह” आणि १५ ऑगस्ट ते २६ जानेवारी, २०२७ दरम्यान “जलसंधारण अभियान” घेतलं जाणार आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येनं या उपक्र्मात सहभागी होण्याचं आवाहन मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे.

****

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या जनगणनेच्या प्रश्नावलीत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमच नसेल, तर ही जनगणना अर्धवट ठरेल, असं मत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नागपूरमध्ये बोलत होते. ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट होईपर्यंत सरकारवर दबाव आणला पाहिजे, असं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं. कुंभमेळ्यावर सरकार करत असलेला खर्च अवास्तव आणि अनावश्यक असल्याची टिका वडेट्टीवार यांनी यावेळी केली.

****

प्रतिबंधित पान मसाल्याच्या प्रचाराची जाहिरात केल्याबद्दल अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांना अन्न आणि औषध प्रशासन एफडीएनं कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. २०२४ मध्ये विमल या पान मसाला कंपनीच्या जाहिरातीसाठी हे तीन अभिनेते एकत्र आले होते. या तिघांना ‘विमल पान मसाला, इलायची’च्या जाहिरातीतील सहभाग तात्काळ थांबवण्याचे आणि त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल, वेबसाइटवरून जाहिरातीशी संबंधित सर्व प्रमोशनल मजकूर काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

****

जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या ‘महास्ट्राइड’ प्रकल्पांतर्गत जिल्हा विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल वाशिम जिल्ह्याने राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीबद्दल जिल्ह्याला १६ कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी मंजूर झाला आहे. अमरावती विभागातून हा निधी मिळवणारा वाशिम एकमेव जिल्हा ठरला आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली. १५ ऑगस्टच्या मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी आणि नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

****

पालघर जिल्ह्यातल्या नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातल्या निळकंठ अपार्टमेंटमध्ये एका मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टी दरम्यान ११ जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सर्वांवर नालासोपाऱ्यातील विजय लक्ष्मी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यापैकी चार जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर सात जणांना जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत केलेल्या रस्त्यांच्या कामांच्या गुणवत्तेबाबत येत्या १९ ऑगस्टला प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्ता तपासणी करण्यात येणार आहे. खासदार संदीपान भुमरे यांनी ही माहिती दिली. या कामांबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत केंद्र सरकारकडून ही गुणवत्ता तपासणी करण्यात येत असल्याचं भुमरे यांनी सांगितलं.

****

महिला हॉकी विश्व कप २०२६ मधील भारतीय महिला हॉकी संघाचा पहिला महत्त्वाचा सामना आज बलाढ्य चीनविरुद्ध होत आहे. बेल्जियम आणि नेदरलँड्सच्या संयुक्त यजमानपदाखाली सुरू झालेल्या या विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांचा संघ आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने करण्यासाठी उत्सुक आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता हा सामना नेदरलँड्सच्या अमस्टेलवीन शहरातील वॅगेनर स्टेडियममध्ये होणार आहे.

****

मराठवाड्यामध्ये आज सर्वत्र ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

****

पश्चिम बंगालमध्ये आजपासून आयुष्यमान भारत योजना लागू होत आहे. याआधी तृणमूल काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात ही योजना लागू करण्यात आली नव्हती. आता राज्यात भाजप सरकारने ही योजना लागू केली आहे.

****

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाच्या वेळी ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीत गीताला कॉंग्रेस पक्षाने विरोध केल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना केला. काँग्रेसच्या मुख्यालयात आयोजित स्वातंत्र्यदिन सोहळ्यादरम्यान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी ‘वंदे मातरम्’ गायन थांबवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने केवळ राष्ट्रगीताचाच नव्हे, तर देशाच्या राज्यघटनेचा आणि जनतेचाही अपमान केला आहे, असा दावा भंडारी यांनी केला आहे.

****

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजधानी दिल्लीतील ‘सदैव अटल’ स्मारकावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...