Sunday, 9 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.08.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 09 August 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ ऑगस्ट २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

हर घर तिरंगा अभियान आज सुरू झालं आहे. येत्या १७ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अभियानाद्वारे देशातल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्यास प्रोत्साहन देऊन देशप्रेम, राष्ट्रीय एकता आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या गौरव सोहळ्यात त्यांना सहभागी करून घेण्याच्या उद्देश आहे. वर्ष २०२२ पासून दरवर्षी ही मोहीम राबवण्यात येते. दरम्यान, वंदेमातरम या राष्ट्रीय गीताला यंदा दीडशे वर्ष पूर्ण होत असल्यानं या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'भारत छोडो' आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना आणि आंदोलकांना आदरांजली वाहिली. सोशल मीडियावरील एका संदेशामध्ये मोदी म्हणाले की, या वीरांचे धैर्य प्रत्येक भारतीयासाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. पंतप्रधान म्हणाले की, महात्मा गांधींच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन 'भारत छोडो'च्या आवाहनाने देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला नवी ऊर्जा दिली. या आंदोलनातून वसाहतवादी राजवटीतून स्वातंत्र्य मिळवण्याचा भारतीय लोकांचा अढळ निर्धार दिसून आला.

****

मराठवाड्यात आगामी ७२ तासात जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात वीजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर नजिक पैठणच्या जायकवाडी धरण नाथसागर जलाशयाचं काल पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं. जायकवाडी धरणातून नऊ हजार ८१० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात पाणी साठा ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

****

जालन्यातल्या आर्थिक अडचणीत असलेल्या मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट बँकेचे नाशिकमधील नाशिक मर्चंट को-ऑप. बँकेमध्ये विलीनीकरणास काल नाशिक मर्चंट बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगरच्या सिडको एन-सेवनमधील महापालिका शाळेतर्फे स्वच्छतेसंदर्भात अभिनव उपक्रम घेण्यात आला. शिक्षकांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी मानवी साखळी, प्रभातफेरी काढून जनजागृती स्वच्छतेबाबत जनजागृती केली.

****

दक्षिण कोरियाच्या असान इथं आयोजित ‘कोरिया मास्टर्स सुपर ३००’ बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अश्मिता चालिहा हिने महिला एकेरीचा किताब पटकावला आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम सामन्यात अस्मितानं चीनच्या हान कियान शी या खेळाडूचा १४-२१,२१-१४ आणि २१-१४ याप्रमाणे पहिल्या सेट मधील पिछाडीनंतर पुढचे सलग दोन सेट दमदार खेळ करून जिंकत हे यश ५३व्या मिनिटात मिळवलं.

****

फिलिपीन्सच्या मनिला इथं  आयोजित अशियायी  एरोबिक जिम्नास्टिक्स  विजेतेपद स्पर्धेत  महिला वैयक्तीक वरिष्ठ गटात भारताच्या अरिहा पंगमबम हिनं सुवर्ण् पदक जिंकण्याची ऐतीहासिक कामगिरी केली आहे.अरिहा मुळ मणीपूरमधील उर्खुल इथली रहिवासी असून स्पर्धेत तिनं १९ पूर्णांक दहा गुण मिळवले

****

स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात भारताने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. जीवाश्म-इंधनावर आधारित नसलेल्या वीज निर्मिती क्षमतेमध्ये देशाने ३०० गिगावॅटचा टप्पा ओलांडला आहे. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सामाजिक माध्यमावरून ही माहिती दिली. गेल्या १२ वर्षांत भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत ४०० टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...