Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 21 August
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २१ ऑगस्ट
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
केंद्रीय
मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद
मंत्र्यांची बैठक होत आहे. या परिषदेत सदस्य देशांचे दूरसंवाद मंत्री आणि वरीष्ठ प्रतिनिधी
माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान, डिजिटल
रुपांतरण, नवोन्मेष
तसंच लवचिक डिजिटल पायाभूत सुविधा याविषयी चर्चा करतील. बदलासाठी अनुकूल भविष्यासाठी
माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान क्षेत्रात नवोन्मेष, सहकार्य आणि हस्तांतरण ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना
आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञान, डिजिटल
पायाभूत सुविधा, भविष्यातील
नेटवर्क्स, सायबर
सुरक्षा, क्षमता
उभारणी आणि सर्वसमावेशक डिजिटल कनेक्टीव्हीटी या विषयांवर या परिषदेत विचारविनिमय होईल.
****
माजी
मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती आज जलसंधारण दिन म्हणून साजरी होत आहे. मृद
आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आज ‘महा वॉकेथॉन - वॉक फॉर
वॉटर’ हा उपक्रम राबवण्यात आला.
छत्रपती
संभाजीनगर शहरात क्रांती चौक ते महात्मा फुले पुतळा या दरम्यान झालेल्या या जनजागृती
पदयात्रेत हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. विधान परिषदेचे अअमदार सुहास शिरसाट, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष
जितेंद्र जयस्वाल, जिल्हा
परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम, मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी
यावेळी उपस्थित होते. मृद आणि जलसंधारणाची शपथही यावेळी घेण्यात आली.
हिंगोली
इथं जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी वॉकेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. या महा-वॉकेथॉनमध्ये
मुली, महिला अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
यवतमाळ
मध्ये आयोजित वॉकेथॉनमध्ये ‘माती वाचवा, पाणी जपा, भविष्य सुरक्षित करा’ हा संदेश देत मृद आणि जलसंधारणाविषयी
जनजागृती करण्यात आली. यात २३ हजार ८०० स्पर्धकांनी सहभाग घेतला.
अकोला, धुळे, गोंदिया याठिकाणीही वॉकेथॉनला
नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतसाद मिळाला.
****
नीट
पेपरफुटी आंदोलनादरम्यान पोलीस, निमलष्करी
दल आणि इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बळाचा अतिवापर केल्याच्या कथित आरोपांची चौकशी करण्यासाठी
सर्वोच्च न्यायालयाने पाच सदस्यांची उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीच्या
अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी यांची
नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या इतर सदस्यांमध्ये पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचे
माजी मुख्य न्यायाधीश रवी शंकर झा, दिल्ली
उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती शलिंदर कौर, सीबीआयचे माजी संचालक ऋषी कुमार
शुक्ला आणि मेघालयचे निवृत्त पोलीस महासंचालक डॉ. एल. आर. बिश्नोई यांचा समावेश आहे.
****
राज्यात
पवित्र पोर्टलद्वारे वर्ग तीन संवर्गातल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांची एकूण दोन
हजार ४२१ रिक्त पदं भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेमुळे पात्रताधारक उमेदवारांना
रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आदिवासी विकास विभागाच्या नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर इथल्या
शासकीय आश्रमशाळांमधल्या रिक्त जागांसाठी ही शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
ही प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे पारदर्शकपणे, गुणवत्तेच्या आधारावर आणि नियमानुसारच होत असल्याचं
आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी स्पष्ट केलं. उमेदवारांनी कोणत्याही
अफवांवर विश्वास ठेवू नये आणि भरतीसंदर्भात अधिकृत माहितीसाठी संबंधित अधिकृत माध्यमांवरच
विश्वास ठेवावा, असं
आवाहन त्यांनी केलं.
****
प्रवाशांशी
आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी मराठीत संवाद साधता न येणाऱ्या रिक्षा
आणि टॅक्सी चालकांविरोधात राज्यभरात परिवहन विभागाने तपासणी मोहीम सुरू केली आहे. या
मोहिमेअंतर्गत ठाणे शहरात सुमारे ४५ रिक्षाचालकांना एक महिन्याची नोटीस बजावण्यात आली
आहे. मोटार वाहन कायद्यातल्या संबंधित नियमांनुसार, एका महिन्याच्या कालावधीत प्राथमिक
पातळीवर मराठीत संवाद साधता आला नाही, तर
चालकाचा परवाना बिल्ला तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो. त्यानंतरही मराठीत
संवाद साधता आला नाही, तर
बिल्ला रद्द करण्याची तरतूद आहे.
****
गरीब
दलित मजूर वर्गाकडे अजूनही उपजीविकेसाठी शेती नाही, त्यामुळे अशा भूमिहीनांना सरकारने गायरान जमिनी, झुडपी जंगले ताब्यात घेऊन ती
शेती करण्यासाठी द्यावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले
यांनी केली आहे. ते काल यवतमाळ इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्याप्रमाणे
विनोबा भावे यांनी भूदान चळवळ राबवली त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात असलेल्या भूमिहीन
लोकांना उपजीविकेसाठी शेती मिळावी यासाठी प्रयत्न व्हावे असं आठवले म्हणाले.
दरम्यान, आर पी आय ला राज्यात महामंडळाची
एक दोन अध्यक्षपदे आणि ३० ते ४० सदस्य पदे द्यावीत, जिल्हा समित्यांमध्ये स्थान मिळावं, अशी मागणीही आठवले यांनी केली.
****
नवी
दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या
सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आणि महिला दुहेरीत त्रिशा जॉली आणि
गायत्री गोपीचंद यांनीउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
****
No comments:
Post a Comment