Friday, 7 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.08.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 07 August 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ ऑगस्ट २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रीय हातमाग दिवस आज साजरा होत आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सात ऑगस्ट १९०५ रोजी स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली होती, त्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात विशेष कार्यक्रम आयोजित केला असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. यावेळी संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. देशाची समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग परंपरा दर्शवणाऱ्या चार विशेष टपाल तिकीटांचं तसंच हातमागा संबंधी दोन पुस्तकांचं प्रकाशन या कार्यक्रमात केलं जाणार आहे.

नागरिकांनी हातमागावरील किमान एक तरी उत्पादन खरेदी करावं आणि त्याचा व्हिडीओ तयार करुन तो प्रसारित करावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त केलं आहे.

**

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आम्ही त्या विणकरांना आणि कारागिरांना सलाम करतो, ज्यांच्या समर्पणामुळे हा अनमोल वारसा जिवंत राहतो, शाश्वत उपजीविका निर्माण होते आणि ग्रामीण समुदाय सक्षम होतात, असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. हातमागाची निवड करून, स्थानिक कारागिरांना पाठिंबा देऊन आणि 'व्होकल फॉर लोकल' आणि'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनांना बळकट करून, आपण त्यांच्या या अमूल्य योगदानाचा गौरव करूया, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काल मुंबईत जेन झी आणि जेन अल्फा विद्यार्थ्यांशी संवाद साधताना लोकशाही, आंदोलन, युवा, सोशल मीडिया, दहशतवाद, आरक्षण आणि शेजारी देशांशी संबंध अशा विविध विषयांवर आपले विचार मांडले. लोकशाहीत आंदोलन ही सहमती निर्माण करण्याची एक पद्धत आहे. आंदोलन हे व्यवस्था सुधारण्यासाठी असावं, कोणत्याही व्यक्तीच्या विरोधासाठी किंवा समाजात फूट पाडण्यासाठी नसावं, असं ते म्हणाले. आजची युवा पिढी प्रश्न विचारते आणि तर्कसंगत उत्तरांची अपेक्षा ठेवते, त्यामुळे त्यांच्या प्रश्नांकडे केवळ विरोध म्हणून न पाहता, त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. सोशल मीडियावरील खोट्या माहितीला आळा घालण्यासाठी स्वयंशिस्त आणि जबाबदारी आवश्यक असल्याचं भागवत यांनी स्पष्ट केलं.

****

ओडिशात चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रावरून 'अग्नी-४' या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी घेण्यात आली. या प्रक्षेपणाद्वारे क्षेपणास्त्राचे सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक निकष यशस्वीरीत्या पडताळण्यात आले. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड यांच्या देखरेखीखाली पार पडली. 'अग्नी-४' च्या यशस्वी चाचणीमुळे भारताच्या सामरिक आणि संरक्षण क्षमतेला आणखी बळ मिळालं असून, स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानातील भारताच्या प्रगतीचं हे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे.

****

दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या सुमारे एक लाख ६० हजार गोविंदांना १० लाख रुपयांपर्यंतचं मोफत विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. क्रीडा आणि युवक कल्याण विभागानं यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी केला. जखमी गोविंदांवर रुग्णालयात वैद्यकीय उपचार करावे लागल्यास प्रत्यक्ष उपचाराचा खर्च अथवा जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंतचं वैद्यकीय विमा संरक्षण सरकारकडून दिलं जाणार आहे.

****

राज्यात सुरू असलेल्या बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानांतर्गत एक लाखांपेक्षा जास्त अमराठी प्रवासी वाहन चालकांनी मराठीचे धडे पूर्ण केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या अभियानाच्या मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते. उर्वरित चालकांनी येत्या १५ तारखेपर्यंत मराठी शिकून घेण्याचं आवाहन सरनाईक यांनी केलं.

****

परभणी इथं स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका व्यक्तीकडून गावठी पिस्टल, मॅक्झिन आणि तीन जिवंत काडतुसं जप्त केली. याप्रकरणी १० लाख ३१ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह सदर आरोपीस ताब्यात घेण्यात आलं आहे.

****

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने नंदुरबार जिल्ह्यात तलावडी शिवार आणि उपनदेव फाट्याजवळ धडक कारवाई करत ५९ लाख ८० हजार रुपयांचा अवैध गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी मध्य प्रदेशातल्या विनोद फुलजी मोरे याला अटक करण्यात आली असून, दुसऱ्या वाहनाचा चालक फरार झाला आहे.

****

कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या अश्मिता चालिहाने उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या सामन्यात अश्मिताने जपानच्या हिना अकेची हिचा २०-२२, २१-१५, २१-१८ असा पराभव केला.

****

पैठणच्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी ९३ टक्क्यांवर स्थिर आहे. धरणात सध्या दहा हजार आठ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरु असून, धरणाच्या सांडव्याद्वारे सुमारे चार हजार ३२८ घनफूट, उजव्या कालव्यातून ११००, तर डाव्या कालव्यातून ८०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...