Tuesday, 25 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.08.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 25 August 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता जारी

·      नागपूर इथं लता मंगशेकर विद्यापीठ आणि अहिल्यानगर इथं डॉ. बाळासाहेब विखे पाटील आरोग्य विज्ञान विद्यापीठ उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

·      मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्याशी सरकारी शिष्टमंडळाची चर्चा, मुंबईत पुढील बैठक घेण्याचं आश्वासन 

·      श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यावर भारताची मजबूत पकड

आणि

·      छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी तसंच नांदेड जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत सहा लाख ३६ हजार ३६ शेतकऱ्यांच्या खात्यात, पाच हजार ८६ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता जमा करण्यात आला. काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा दुसरा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला. यापूर्वी सात ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं. आतापर्यंत कर्जमुक्ती योजनेतल्या १२ लाख ५८ हजार २४३ पात्र शेतकऱ्यांना, दहा हजार ११५ कोटींचं वितरण करण्यात आलं आहे.

****

नागपूर इथं लता मंगशेकर विद्यापीठ स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अहिल्यानगर इथं डॉ. बाळासाहेब विखे पाटील आरोग्य विज्ञान विद्यापीठ उभारण्यास, नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत इथं वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास तसंच त्यासाठीची पदे आणि अनुषांगिक खर्चाच्या तरतुदीस मंत्रिमंडळाने कालच्या बैठकीत मान्यता दिली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांना दिल्या जाणाऱ्या रोख बक्षीस धोरणात सुधारणा करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. युथ ऑलिम्पिक आणि युथ पॅरा ऑलिंपिक स्पर्धेतल्या सुवर्ण पदकासाठीचा पुरस्कार साडे बावीस लाखांवरून ५० लाख, रौप्य पदकासाठी १५ लाखांवरून ३० लाख तर कांस्य पदकासाठी साडे सात लाखांवरून २० लाख रुपये करण्यात आला आहे.

****

मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, सुट्या तेलाच्या विक्रीसंदर्भात आदर्श कार्यपद्धती तयार करण्यात येणार असल्याचं सांगितलं. सुटं तेल विकणारे आणि खरेदी करणार्या ग्राहकांना अडचण होऊ नये, त्यांच्यावर अन्याय होऊ नये आणि भेसळही रोखली गेली पाहिजे, हा सर्व विचार करुन अन्न आणि औषध प्रशासनाला कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश दिले जातील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चेसाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं काल आंतरवाली सराटी इथं भेट दिली. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेपाटील, मंत्री उदय सामंत तसंच मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह अनेक मान्यवरांचा या समितीत समावेश आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीत प्रशासकीय पातळीवर त्रुटी झाल्याचे विखे पाटील यांनी मान्य केलं असून, यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. २८ ऑगस्टपर्यंत नोंदी असलेल्या नागरिकांना प्रमाणपत्र आणि वैधता देण्याची मागणी करत, ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत मात्र प्रमाणपत्र किंवा वैधता मिळालेली नाही, अशांनी अंतरवाली सराटीत यावं, असं आवाहनही जरांगे यांनी केलं. या मागण्यांबाबत मुंबईत बैठक घेऊन सरकारशी चर्चा करण्याचं आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिलं. मराठा समाजाच्या मागण्यांची आणि शासनाने घेतलेल्या निर्णयांची २८ ऑगस्टपर्यंत अंमलबजावणी न झाल्यास २९ ऑगस्टपासूनचं आंदोलन निर्णायक असेल, असा इशारा जरांगे यांनी दिला.

****

उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातल्या उत्कृष्ट योगदानासाठी केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून आयआयटी मुंबईचे प्राध्यापक विक्रम विशाल, वर्धा इथल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. अमर ताकसांडे आणि सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे डॉ. संदीपान नरोटे या तीन प्राध्यापकांची निवड झाली आहे. मराठवाड्यातल्या दोन शिक्षकांसह चार शिक्षकांनाही राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचं औचित्य साधून नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

****

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अकरावीच्या प्रवेशासाठी दहावी फेरी जाहीर केली आहे. २७ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना या फेरीत सहभागी होऊन प्रवेश घेता येणार आहे. राज्यात अद्यापही अकरावीच्या आठ लाख ९४ हजार जागा रिक्त आहेत.

****

मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचं काल पुण्यात निधन झालं, त्या १०१ वर्षांच्या होत्या. ज्यू कुटुंबात जन्मलेल्या पूर्वाश्रमीच्या जेरुषा रुबेन उर्फ यास्मिन शेख यांनी भाषाशास्त्र आणि प्रमाण मराठीच्या समर्थनासाठी आयुष्यभर कार्य केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या मिलिंद महाविद्यालयात अध्यापन केलेल्या यास्मिन शेख यांनी, मुंबईतल्या SIES महाविद्यालयातही मराठीच्या प्राध्यापक म्हणून तसंच मराठी विभागप्रमुख म्हणूनही काम केलं. मराठी लेखन मार्गदर्शिका, मराठी शब्दलेखन कोश, सुगम मराठी व्याकरण कोश ही त्यांची काही पुस्तकं मराठी अभ्यासकांमध्ये प्रसिद्ध आहेत. यास्मिन शेख यांच्या निधनानं मराठी भाषा विश्वातील एक व्रतस्थ, अभ्यासू आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

छत्रपती संभाजीनगर इथले सरस्वती भुवन महाविद्यालयातले प्राध्यापक नागेश अंकुश यांच्या मागोवा या पुस्तकाला यास्मीन शेख यांनी प्रस्तावना लिहिली होती. नागेश अंकुश यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला...

बाईट- प्राध्यापक नागेश अंकुश

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभ्यासक यास्मिन शेख यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. शब्दांशी त्यांचं नातं हे केवळ अभ्यासापुरतं नव्हतं, तर मराठीवरील निस्सीम प्रेमाचं नातं होतं, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

डॉ. यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी भाषाविश्वाची मोठी हानी झाली असून मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****

अमरावतीमधल्या स्त्री जिल्हा रुग्णालयातल्या अग्निकांडात दगावलेल्या अर्भकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.जखमी अर्भकांवर शासकीय खर्चाने उपचाराचे निर्देशही अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून, या प्रकरणी दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. काल पहाटेच्या सुमारास घडलेल्या या अग्निकांडात तीन अर्भकांचा होरपळून मृत्यू झाला. 

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सदर रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनेच्या वेळी कक्षात ३९ अर्भकांवर उपचार सुरू होते. त्यापैकी ३६ अर्भकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असून, सहा अर्भकांना पुढील उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

****

लातूर जिल्ह्यात काल जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद पार पडली. या परिषदेत राज्य शासन आणि जिल्ह्यातल्या नवउद्योजकांमध्ये ९२ सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून तीन हजार ६६ कोटी रूपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, सुमारे चार हजार १६९ जणांना रोजगार उपलब्ध होईल. या गुंतवणूक परिषदेला छत्रपती संभाजीनगर इथले उद्योग आणि सेवा सहायक आयुक्त संजय भुरेवाल, लातूर जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त निखिल पाटील यांच्यासह उद्योजक प्रतिनिधी उपस्थित होते.

****

श्रावण महिन्यानिमित्त हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं काल कावड यात्रा काढण्यात आली.आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून दुपारी बारा वाजता यात्रेला सुरूवात झाली. जिल्हाभरातून या यात्रेसाठी भाविकांनी गर्दी केली होती.

****

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने पहिल्या डावात नऊ बाद ५०३ धावा केल्या. देवदत्त पडिक्कलने ११७, ध्रूव जुरेल ११५, ऋषभ पंत ६३ तर कर्णधार शुभमन गिलने ५० धावा केल्या. कालचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेच्या दोन बाद आठ धावा झाल्या होत्या.

****

येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

 

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...