Monday, 17 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.08.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 17 August 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.

****

बिहारच्या लखीसराय जिल्ह्यातल्या अशोक धाम मंदिरात आज झालेल्या चेंगराचेंगरीत सात महिला भाविकांचा मृत्यू झाला. आज श्रावणी सोमवारनिमित्त मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती, त्यातच अशोक धाम स्‍टेशनपासून मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर विजेच्या खंबावर करंट उतरल्याच्या अफवेने ही दुर्घटना घडल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या घटनेत इतर १० भाविक जखमी झाले असून, त्यांना पाटणा इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुख्‍यमंत्री सम्राट चौधरी यांनी या दुर्घटनेबद्दल दुख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहिर केली असून, जखमींना तातडीने आणि योग्य वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुख व्यक्त करत जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना केली आहे.

****

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत दोन दिवसीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक परिषदेचं उद्घाटन केलं. या परिषदेत सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि सार्वजनिक वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी, प्रमुख प्राधान्यक्रम, उदयोन्मुख संधी आणि विकसित होत असलेल्या बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रावर चर्चा करण्यासाठी एकत्र आले आहे. सरकार सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांसाठी लवकरच उच्चस्तरीय समिती स्थापन करणार असल्याची माहिती, सीतारामन यांनी यावेळी दिली. ही समिती बँकिंग क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी धोरण आखेल, असं त्यांनी सांगितलं.

****

रांची इथं विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे. आज सरकार आणि आंदोलक विद्यार्थी यांच्यामध्ये दुपारी दोन वाजता रांची इथं चर्चा होणार आहे. यावेळी कायदेतज्ज्ञ उपस्थित असतील, असं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं असून, विद्यार्थ्यांची बाजू समजून घ्यावी, आणि त्यांचं समाधान करावं, असं आवाहन विद्यार्थी नेते देवेंद्र महातो यांनी केलं आहे.

****

रेल्वे प्रवाशांना सुरक्षित आणि स्वच्छ पेयजल उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तात्काळ सुधारणा उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. पेयजलाच्या गुणवत्तेबाबत कॅगच्या अहवालानंतर रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे मंडळाचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. याअंतर्गत वॉटर कूलरसह जवळपास २० हजार ठिकाणी ‘टाकी ते नळ’ जलशुद्धीकरण प्रणाली उभारण्यात येणार आहे. याशिवाय जवळपास २० हजार ठिकाणी व्यापक जलशुद्धीकरण आणि देखरेख प्रणाली तात्काळ कार्यान्वित केली जाणार आहे. पाण्याच्या टाक्याही तातडीने बदलण्यात येणार असून, साठवणूक टाक्यांची नियमित स्वच्छता आणि देखभालीवर रेल्वे मंडळाच्या पातळीवर देखरेख ठेवली जाणार आहे.

****

श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारनिमित्त आज राज्यभरातल्या शिवमंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पहाटेपासूनच मंदिरांमध्ये अभिषेक, पूजा आणि दर्शनासाठी भाविकांची रांग पाहायला मिळत आहे. त्र्यंबकेश्वर आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरांमध्येही पहाटेपासून भाविक मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत.

बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैद्यनाथ मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी वैजनाथ देवस्थान ट्रस्टकडून विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त असून १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, आज नागपंचमीचा सणही साजरा होत असल्याने राज्यभर भक्तीमय वातावरण आहे. कृषी संस्कृतीशी घट्ट नातं असलेल्या नागपंचमीनिमित्त विविध गावांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. भारत तब्बल १७ वर्षांनंतर या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचं यजमानपद भूषवत आहे. महिला एकेरीत दोन वेळा ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू भारतीय संघाचं नेतृत्व करणार असून, आज तिचा सामना आयर्लंडच्या सोफिया नोबलशी होणार आहे. महिला दुहेरीत ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही भारतीय जोडी स्पेनच्या जोडीविरुद्ध पहिल्या फेरीत खेळणार आहे. पुरुष एकेरीत आयुष शेट्टीचा सामना जागतिक क्रमवारीत अव्वल आणि गतविजेता चीनच्या शी यू की याच्याशी होणार आहे. पुरुष दुहेरीत भारताची पाचव्या मानांकित आघाडीची जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या प्रतिस्पर्धी जोडीने माघार घेतल्याने त्यांना थेट दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला आहे. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांनीही थेट दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या तिसर्या दिवशी, श्रीकंलेच्या पहिल्या डावात पाच बाद ११३ धावा झाल्या आहेत. भारताकडून मानव सुतारने दोन, तर मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. आजच्या दिवसाचा खेळ भारताने नऊ बाद ४६० धावांपासून पुढे सुरु केला होता. भारताने पहिल्या डावात ४६२ धावा केल्या आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...