Sunday, 23 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.08.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 August 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ ऑगस्ट २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      राज्यात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची सोय करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

·      स्टार्टअप परिसंस्थेत युवा वर्गाचा सहभाग वाढवण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

·      डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन उत्साहात

आणि

·      भारताच्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात पाच बाद ३०० धावा, पडीक्कलचं शतक तर शुभमनचं अर्धशतक

****

राज्यभरातल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी आणि त्यांना अधिक चांगल्या सेवा-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करणाऱ्या विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. सर्वसामान्यांना आरोग्य सेवा मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर करणं आणि त्यांना प्रशासकीय प्रक्रियेत सुलभता मिळवून देणं हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. यामुळे राज्यातले हजारो गरीब आणि गरजू रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं शासनातर्फे नमूद करण्यात आलं आहे. या करारामुळं धर्मादाय संस्थांचं योगदान आणि शासकीय यंत्रणांची कार्यक्षमता एकत्र येऊन एक आदर्श आरोग्य सहाय्य मॉडेल राज्यात उभं राहील. धर्मादाय न्यासांच्या सहकार्यानं विविध त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात येऊन त्याचा थेट लाभ रुग्णांना देणं शक्य होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी- सीएमआरएफच्या संकेतस्थळावर सर्व तपशील उपलब्ध आहे. त्यात सर्व संस्थानी सहभाग नोंदवावा, असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे.

****

शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग वाढवण्यासोबतच संपूर्ण मदत देण्यात येईल त्यासोबत स्टार्टअप परिसंस्थेमध्ये चर्चा करून चांगलं धोरण तयार करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी आज दिली. नागपूर इथं मंथन फॉर युवा या उपक्रमांतर्गत ढोल ताशा पथकाचा जागतिक विक्रम तसंच विविध क्षेत्रात आदर्श असलेल्या व्यक्तींसोबत थेट संवाद, नशामुक्त महाराष्ट्र आणि देश यासाठी युवकांना शपथ उपक्रमाचा यात समावेश होता. यात २५ हजारपेक्षा जास्त युवा सहभागी झाले होते. राज्याची परंपरा असलेल्या ढोल ताशा पथकानं ५८५ ध्वजधारकांच्या यातील सहभागाची इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. आजची युवा पिढी सर्वच क्षेत्रात आपल्या कौशल्यानं नावलौकिक मिळवीत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी गौरवोद्गार काढले. क्रीडा समालोचक रिधिमा पाठक यांनी युवकांचे आदर्श असलेले मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतच क्रिकेटपटू तिलक वर्मा, राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेते दिलीप महादू गावित, अर्जुन देशपांडे, किरण शहाजी यांच्याशी यावेळी संवाद साधला.

****

देशातली वीज व्यवस्थेची सुरक्षितता, विश्वासार्हता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या नियम आणि तांत्रिक मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणं अत्यावश्यक असल्याचं मत वीज क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केलं आहे.

केंद्रीय विद्युत प्राधिकरण, भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित -महापारेषण यांच्यातर्फे पुण्यात केंद्रीय विद्युत प्राधिकरण नियम आणि तांत्रिक मानकांवर प्रादेशिक स्तरावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. पश्चिम विभागातल्या विविध राज्यांतल्या वीज कंपनी, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातले वीज उपक्रम, तज्ज्ञ आणि अधिकारी अशा सुमारे दीडशे प्रतिनिधींनी सहभाग घेतला. केंद्रीय विद्युत प्राधिकरणचे सदस्य, अतिरिक्त सचिव प्रवीण गुप्ता यांनी कार्यशाळेचं उद्‌घाटन केलं.

****

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल उद्यापासून २७ ऑगस्ट दरम्यान जपानला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते टोकियो, नागोया आणि ओसाका इथं जाणार असून, जपानला जाणाऱ्या भारताच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या व्यावसायिक शिष्टमंडळाचे ते नेतृत्व करत आहेत. या शिष्टमंडळात २०० हून अधिक व्यावसायिक प्रतिनिधींचा समावेश आहे. यात उत्पादन, सेमी कंडक्टर, स्वच्छ ऊर्जा आणि पोलाद क्षेत्रापासून ते वाहन उद्योग, वित्तीय सेवा, आरोग्य सेवा आणि स्टार्टअप्स यांसारख्या विविध क्षेत्रांचा सहभाग आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज ६८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे यांच्या हस्ते माजी सनदी अधिकारी, भास्कर मुंढे यांना जीवन साधना पुरस्कार प्रदान करण्यात आला. याचबरोबर विविध परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थी तसंच उत्कृष्ठ प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि महाविद्यालयांना विविध पुस्काराचं वितरण केलं गेलं.

****

बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात ब्रह्मगाव शिवारात वाघानं गाईची शिकार केल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकानं घटनास्थळी पाहणी केली. शिकार अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेजवळ केल्यानंतर वाघ जामखेड परिसरात निघून गेल्याचा अंदाज वन विभागानं व्यक्त केला आहे. नागरिकांनी विनाकारण घाबरून जाऊ नये, मात्र शेतात वगैरे जाताना काळजी घ्यावी, पशूधनाची सुरक्षितता राखावी आणि रात्री एकटं बाहेर पडणं टाळावं. संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीनं वन विभागाला माहिती द्यावी असं आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी केलं आहे. बीडसह अहिल्यानगर, धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांच्या परिसरात वाघाचा वावर असल्याचं वन विभागातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.

****

नाटक हे केवळ मनोरंजनाचं माध्यम नाही, समाजाशी संवाद साधण्याचं तसंच पश्न विचारण्याचं हे प्रभावी माध्यम असल्याचं प्रतिपादन, जेष्ठ नाटककार प्राध्यापक रंगकर्मी अजित दळवी यांनी केलं. एमजीएम विद्यापीठात जिगीषा नाट्यसहवास २०२६ च्या महोत्सवात डॉ. शिवदर्शन कदम तसंच प्राध्यापक मुस्तजीब खान यांनी त्यांची आज मुलाखत घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दळवी यांनी त्यांच्या जीवनातील संघर्षासह जीवनातील अनेक आठवणी सांगितल्या. या तीन दिवसीय महोत्सवात आज अखेरच्या दिवशी महात्मा गांधी यांच्यावरील लेखांचं अभिवाचन करण्यात आलं. नामवंत अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रतिमा जोशी यांनी या लेखांचं अभिवाचन केलं.

****

खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्या प्रकरणी लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि एकूण १६ कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपींनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर २०२२ ते २०२६ या कालावधीत तब्बल २ हजार १४३ कोटी ७९ लाख ४३ हजार ७६० रुपये परदेशात पाठवायला साहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

****

भारतानं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज पहिल्या दिवस अखेर पाच बाद ३०० धावा केल्या आहेत. देवदत्त पडीक्कलनं १२ चौकारांसह झळकवेल्या ११७ धावा तसंच कर्णधार शुभमन गीलच्या ५० धावा यात प्रमुख होत्या. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या सत्रात सलामीवर के.एल. राहुल १८ तर यशस्वी जयस्वाल ४५ धावांवर बाद झाले. भारतानं या सामन्यासाठी जखमी कुलदीप यादव ऐवजी सारांश जैन याला प्रथमच संधी दिली आहे.

****

राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, नागपूर अर्थात वनार्टीनं, विमुक्त जाती तसंच भटक्या जमाती ब, क आणि ड या नॉन- क्रिमीलेअर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांकरता पूर्व प्रशिक्षणाच्या अर्जाची अंतिम मुदत येत्या २६ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार ही मुदत आज संपणार होती. मात्र विद्यार्थ्यांचा राज्यभरातून मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता ‘वनार्टी’नं मुदत वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती ‘वनार्टी’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागानं शाळांमध्ये अन्न सुरक्षा पर्यवेक्षक नियुक्त करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मन्नू पी. एम. यांनी दिले आहेत. या नियुक्तीसाठी आवश्यक पात्रता तसंच प्रशिक्षण असणं अपेक्षित असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी संघरत्न सरोदे यांनी दिली आहे.

****

बीड जिल्हा परिषदेच्या शाळांत इयत्ता चौथी आणि सातवीच्या १०० टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसवण्याचा संकल्प यंदा करण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रेहमान यांच्या संकल्पनेतून आणि शिक्षणाधिकारी राजश्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू झाला असून, विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी दर शनिवारी विशेष सराव चाचणी घेण्यात येत आहे.

****

‘साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट’च्या अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र, मुंबई’ यांच्यातर्फे दिला जाणारा ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार’ यंदा जयश्री हरि जोशी आणि मयुरेश कुलकर्णी यांना आज जाहीर झाला.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...