Wednesday, 4 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.02.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 04 February 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

भारत – अमेरिका टॅरिफ कपातीच्या व्यापार करारावर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत निवेदन दिलं. या कराराचा दोन्ही देशातल्या उद्योजकांना फायदा होईल, असं ते म्हणाले. यामुळे शेतकर्यांना नुकसान होणार नाही, अमेरिकेच्या बाजारात भारताची निर्यात वाढेल, भारतीय उद्योगांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील, असंही गोयल यांनी सांगितलं. त्यामुळे हा व्यापार करार ऐतिहासिक असल्याचं त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, विविध मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आजही बाधित झालं. पियुष गोयल यांच्या निवेदनानंतरही विरोधकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सदनाचं कामकाज सकाळी एकदा आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

****

जागतिक कर्करोग दिवस आज पाळण्यात येत आहे. कर्करोगाविषयी जागरूकता वाढवणं आणि त्याच्या प्रतिबंध, निदान आणि उपचारांना प्रोत्साहन देणं, तसंच कर्करोगग्रस्तांना पाठिंबा देण्यासाठी आणि निरोगी समाजाकरिता नियमित तपासण्यांना प्रोत्साहन देणं, या उद्देशानं हा दिवस पाळला जात असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी म्हटलं आहे. आयुष्यामान आरोग्य मंदिरांमधून देशभरात रुग्णांच्या तपासण्या, निदान आणि कर्करोगग्रस्त रुग्णांणा वेळेवर उपचार दिले जात असल्याचं त्यांनी सांगितलं. युनायटेड बाय युनिक ही यंदाची कर्करोग दिनाची संकल्पना असून, लोकांची देखभाल याच्या केंद्रस्थानी आहे.

****

विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधून परीक्षेचा ताण कमी करणं आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ हा संवादात्मक कार्यक्रम येत्या शुक्रवारी होणार आहे. दरवर्षी परीक्षांच्या हंगामाच्या आधी होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोर्डाच्या परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहण्यासाठी मार्गदर्शन करतात आणि ‘एक्झाम वॉरियर्स’ बनण्यासाठी स्वतः प्रोत्साहित करतात. यंदाच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाने गेल्या वर्षीच्या साडेतीन कोटी नोंदणींचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडत, यावर्षी चार कोटींहून अधिक ऑनलाइन सहभागींनी नोंदणी केली आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत करत असून, राजकीय जुळवाजुळव करण्यावर नाही, असं पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज बारामती इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना, अपघाताच्या चौकशीसंदर्भात सरकारनं योग्य निर्णय घ्यावा, असंही पवार यांनी सांगितलं. अमेरिका आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली देश असून, जर अमेरिकेतील कृषी उत्पादनं भारतात आली तर त्याचा भारतीय शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशीही चिंता पवार यांनी व्यक्त केली.

****

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ काल संध्याकाळी ज्वलनशील प्रोपलेन गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना घडली. अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आली, त्यामुळे द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. जवळपास १६ तासांपासून हजारो वाहनं अडकून पडली आहेत. द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी असल्याने आता जुन्या मुंबई - पुणे महामार्गावर देखील वाहतूक कोंडी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

धाराशिव शहर आणि परिसरात आज सकाळी भूगर्भातून मोठे आवाज आले. कळंब, ढोकी, धाराशिव परिसरात गुढ आवाज आणि भूकंप सदृश्य धक्के जाणवले मात्र भूकंपाची अधिकृत नोंद झाली नसल्याचं जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी निवेदनाद्वारे सांगितलं. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकार्यांनी केलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथं उद्या पाच तारखेला, पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात तीनशेहून जास्त पदांसाठी मुलाखती घेण्यात येणार असून, नांदेड जिल्ह्यातल्या बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

झिम्बॉब्वे इथं सुरू असलेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज उपान्त्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारत आणि अफगाणिस्तान संघात लढत होत आहे. या सामन्यातला विजेता संघ येत्या शुक्रवारी अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध खेळेल.

****

चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला संघानं शानदार सुरुवात केली. पहिल्या फेरीत भारतानं म्यानमारवर ५-० असा एकतर्फी विजय मिळवला. एकेरीच्या सामन्यांत मालविका बनसोड, रक्षिता श्री आणि तन्वी शर्मा यांनी सरळ सेटमध्ये विजय मिळवत प्रतिस्पर्ध्यांना कोणतीही संधी दिली नाही. दुहेरीत त्रिशा जॉली–गायत्री गोपीचंद आणि प्रिया–श्रुती मिश्रा या जोड्यांनीही शानदार कामगिरी करत भारताला निर्भेळ यश मिळवून दिलं. या स्पर्धेत आज भारतीय पुरुष संघाचा सामना सिंगापूरविरुद्ध होणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...