Wednesday, 4 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.02.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 04 February 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ फेब्रुवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      लोकसभेत असभ्य वर्तन करणारे आठ खासदार चालू अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित

·      भारत – अमेरिका टॅरिफ कपातीच्या व्यापार कराराचं विविध स्तरातून स्वागत

·      मुंबई-अहमदाबाद बुलेट रेल्वे मार्गातल्या दुसऱ्या बोगद्याचं खोदकाम पूर्ण

·      उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आता पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री

आणि

·      १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि अफगाणिस्तान संघात सेमीफायनल

****

लोकसभेत असभ्य वर्तन करणाऱ्या आठ खासदारांना चालू अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आलं आहे.

भारत अमेरिका व्यापार करारावरून लोकसभेचं कामकाज काल सलग दोन वेळा तहकूब झालं. दुपारी दोन वाजता कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर, राष्ट्रपती अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर बोलण्याऐवजी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा संदर्भ देत बोलायला सुरुवात केली. मात्र पीठासीन अधिकारी कृष्णप्रसाद टेन्नेटी यांनी गांधी यांना थांबवत, लोकसभा अध्यक्षांनी यावर निर्णय दिला असल्याने, राष्ट्रपती अभिभाषणावर बोलण्यास सांगितलं. त्यावर विरोधकांनी गदारोळ करत, अध्यक्षांच्या दिशने कागद भिरकावले. ही कृती करणाऱ्या आठ खासदारांना पीठासीन अधिकाऱ्यांनी निलंबित केलं. यामध्ये भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांच्यासह काँग्रेसच्या सात तर माकपच्या एका खासदाराचा समावेश आहे.

**

राज्यसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अमेरिकेसोबतच्या कराराच्या मुद्द्यावरून सभात्याग केला. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. या कराराची विस्तृत माहिती सभागृहासमोर मांडली जाईल, असं सभागृह नेते जे पी नड्डा यांनी सांगितलं. ते म्हणाले…

बाईट- सभागृह नेते जे पी नड्डा

****

भारत – अमेरिका परस्पर टॅरिफ कपातीबाबतच्या व्यापार कराराचं विविध स्तरातून, विशेषतः उद्योगजगताकडून स्वागत होत आहे. हा करार उभयपक्षी हित साधणारा असल्याची प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

या करारामुळे तरुणाईला रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, तसंच तंत्रज्ञानाची नवनवी क्षेत्रं खुली होतील, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. ते म्हणाले…

बाईट- केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल

 

महाराष्ट्र कायम निर्यातीत अग्रेसर असलेलं राज्य असून, या करारामुळे राज्यातल्या व्यवसायासाठी नवं क्षितिज खुलं होईल, आणि राज्यात मोठी गुंतवणूक होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

विविध उद्योजक आणि व्यापारी संघटनांनी या कराराबद्दल आनंद व्यक्त केला असून, यामुळे भारतीय उत्पादनांना अमेरिकेत उठाव मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

दलित इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे संस्थापक ज्येष्ठ उद्योजक पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी या कराराचं स्वागत केलं…

बाईट- पद्मश्री मिलिंद कांबळे

****

मुंबई-अहमदाबाद बुलेट रेल्वे प्रकल्पासाठीच्या दुसऱ्या बोगद्याचं खोदकाम पूर्ण झालं आहे. महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातला हा दुसरा बोगदा असून बुलेट ट्रेन प्रकल्पाचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले:

बाईट- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

****

मुंबई महानगर प्रदेशातल्या विविध महापालिकांमध्ये महापौर निवड प्रक्रिया काल पार पडली. ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची, उल्हासनगरच्या महापौरपदी शिवसेनेच्या अश्विनी निकम यांची तर कल्याण डोंबिवलीच्या महापौर म्हणून शिवसेनेच्या हर्षाली थविल यांची आणि वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर पदी बहुजन विकास आघाडीचे अजीव यशवंत पाटील निवड झाली.

छत्रपती संभाजीनगर इथं येत्या १० तारखेला महापौर निवड होणार आहे. या पदासाठी अर्जविक्री आजपासून सुरू होत आहे. परवा सहा तारखेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.

****

पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. सामान्य प्रशासन विभागानं काल यासंदर्भातला निर्णय जारी केला. यापूर्वी या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे होतं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठीचे आपण दावेदार नाही, असं वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.

****

पायाभूत सुविधा तसंच औद्योगिक विकासासाठी राज्यात राबवण्यात येत असलेली भूसंपादन प्रक्रिया गतीनं आणि पारदर्शक पद्धतीनं राबवावी, प्रकल्पांसाठी जमीन देणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

****

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरण, यासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्वपूर्ण असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे. या करारामुळे राज्यातल्या नऊ कापूस उत्पादक जिल्ह्यांतल्या पाच हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत आणि आधुनिक शेती पद्धतींचं प्रशिक्षण मिळणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात परभणी, बीड, नांदेडसह नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे.

****

शेती आणि पूरक उद्योगांसाठी भारतानं इस्राईलच्या धर्तीवर शाश्वत पर्यावरणस्नेही 'मॉडेल’ विकसित करण्याची गरज, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनेश कुमार अस्वाल यांनी व्यक्त केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या पदार्थविज्ञान विभागात 'इनोव्हेशन इन मटेरियल्स सायन्स फॉर सस्टेनेबल फ्युचर' या विषयावरच्या परिषदेत ते काल बोलत होते. या विभागातले वरिष्ठ प्राध्यापक तथा विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र शिरसाट यांच्या गौरवार्थ ही तीन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या परिषदेत देश विदेशातले चारशे पंचाहत्तर संशोधक सहभागी झाले आहेत.

****

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थिकलश काल नांदेड जिल्ह्यात आणण्यात आला. विविध ठिकाणी या अस्थिकलशाला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. काल रात्री काळेश्वर मंदिर परिसरातल्या गोदावरी पात्रात अस्थी विसर्जन करण्यात आलं.

लातूर इथंही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह नागरिकांनी अजित पवार यांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेऊन अभिवादन केलं.

****

राज्यात येत्या २६ एप्रिलला होणार असलेल्या इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परिक्षांसाठी अर्ज करण्याला येत्या १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार असून, त्यानंतर मात्र कोणत्याही परिस्थितीत अर्ज करता येणार नसल्याचं परीक्षा परिषदेनं कळवलं आहे.

****

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी-टीईटी देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट देण्यात आली असून, राज्य निवडणूक आयोगानं तसे निर्देश सगळ्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. निवडणुकीच्या दिवशी, म्हणजे येत्या सात तारखेलाच ही परीक्षा असल्यानं हा निर्णय घेण्यात आला.

****

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत हृदयरुग्ण विद्यार्थ्यांसाठी हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात टूडी-इको तपासणी शिबीर घेण्यात आलं. यावेळी हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ आणि सेनगाव तालुक्यातल्या एकूण १७० संशयित हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची टूडी-इको तपासणी करण्यात आली. यापैकी ३५ विद्यार्थ्यांना हृदयशस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आलं असून, महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत ठाण्याच्या किम्स रुग्णालयात त्यांच्या शस्त्रक्रिया नि:शुल्क करण्यात येणार आहेत.

****

महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या आशा मोहिमेअंतर्गत लातूर इथं विशेष जनजागृती कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना बाल विवाहाचे दुष्परिणाम, बाल विवाह प्रतिबंधक कायदा, बाल संरक्षणाशी संबंधित विविध कायदे याबद्दल माहिती देण्यात आली.

****

झिम्बॉब्वे इथं सुरू असलेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज उपान्त्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारत आणि अफगाणिस्तान संघात सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यातला विजेता संघ येत्या शुक्रवारी अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध खेळेल.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...