Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 04 February 2026
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०४ फेब्रुवारी
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधून
परीक्षेचा ताण कमी करणं आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ हा संवादात्मक कार्यक्रम येत्या शुक्रवारी होणार आहे.
दरवर्षी परीक्षांच्या हंगामाच्या आधी होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोर्डाच्या
परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहण्यासाठी मार्गदर्शन करतात आणि ‘एक्झाम
वॉरियर्स’ बनण्यासाठी स्वतः प्रोत्साहित करतात. यंदाच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाने गेल्या वर्षीच्या साडेतीन कोटी नोंदणींचा
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडत, यावर्षी चार कोटींहून
अधिक ऑनलाइन सहभागींची नोंदणी केली आहे.
****
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था
– डीआरडीओने सॉलिड फ्युएल डक्टेड रॅमजेट – एसएफडीआर तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी केली. ओडिशातल्या किनाऱ्याजवळील चांदीपूर इथल्या
एकात्मिक चाचणी केंद्रातून ही चाचणी करण्यात आली.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण
समितीच्या बैठकीला आजपासून मुंबईत सुरुवात होत आहे. परवा शुक्रवारी रिझर्व्ह बँक आपला
पतधोरण आढावा जाहीर करणार आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, आगामी पतधोरण आढाव्यात प्रमुख व्याजदरांमध्ये कपात होण्याची
शक्यता कमी आहे. मागील पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात केली होती, ज्यामुळे रेपो दर पाच पूर्णांक २५
टक्क्यांपर्यंत आला होता.
****
ग्राहकांचा डेटा गोळा करण्याच्या नावाखाली
नागरिकांच्या माहितीच्या खासगीपणाचा हक्क
हिरावून घेता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने
बजावलं आहे. मेटा आणि व्हॉट्सअॅपने भारतीय स्पर्धा आयोगाने लावलेल्या दंडाला सर्वोच्च
न्यायालयात आव्हान दिलं असून, त्याची सुनावणी काल सुरु
झाली.
****
मध्यमवर्गीय शेतकऱ्यांची कर्जमाफी
लवकरच केली जाईल, असं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. ते लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या लामजना इथं जिल्हा परिषद
निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलत होते. कर्जमाफीच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारची भूमिका
स्पष्ट केली.
****
यवतमाळ जिल्ह्यातल्या शेंदूरसनी, भवानी यासह अन्य जिल्ह्यांमधल्या
जन्म मृत्यू नोंदींचा घोटाळा हा व्यापक असून ही टोळी पाच राज्यांमध्ये सक्रिय असल्याचं
उघडकीस आलं आहे आणि या टोळीनं या राज्यांमधली संपूर्ण सिस्टीम हॅक केली आहे, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी
म्हटलं आहे. त्यांनी यवतमाळ इथं जिल्हाधिकारी
आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाच्या तपासाबाबत आढावा घेतला. नांदेड जिल्ह्यातल्या
कंधार तालुक्यात एका गावची लोकसंख्या दीड हजार असूनही ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये १५ हजार ५७० जन्म नोंदी
असल्याचंही सोमय्या यावेळी म्हणाले.
****
राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी
विद्यापीठाअंतर्गत केळी संशोधन केंद्रात फुले कृषी महोत्सव २०२६ अंतर्गत ‘केळी दिवस आणि शिवार फेरी’ कार्यक्रम काल राबवण्यात आला.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्वे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं.
यावेळी केळीवरील सुरू असलेल्या विविध संशोधन प्रयोगांची पाहणी करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष
अनुभवातून तांत्रिक माहिती देण्यात आली.
****
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी
अमृत कौशल्य उद्यम विकास योजनेअंतर्गत नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठातल्या कौशल्य विकास केंद्रामार्फत मोफत कौशल्य आणि उद्योजकता आधारित प्रशिक्षण
कार्यक्रमांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण कार्यक्रम विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलं जात असून, एस्पायर ज्ञान आणि कौशल्य इंडिया
प्रा.ली. या संस्थेच्या सहकार्याने गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये फेब्रुवारी
- मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेची तयारी शिक्षण मंडळाकडून अंतिम
टप्प्यात आली आहे. परीक्षेच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या सांख्यिकी माहितीनुसार
छत्रपती संभाजीनगर विभागातल्या पाच जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी परीक्षा
देणार आहेत. विभागात एकूण १ लाख ९० हजार ५९२ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. त्यासाठी
बोर्डाकडून तयारी करण्यात आली आहे.
****
प्रवाशांची मागणी लक्षात घेता दक्षिण
मध्य रेल्वे ने चारलापल्ली -उधना – चारलापल्ल्ली दरम्यान नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला मार्गे विशेष गाडीच्या सहा
फेऱ्या करण्याचे ठरवलं आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क विभागानं ही माहिती
दिली.
****
हरियाणा इथं सुरु असलेल्या ३५ व्या
किशोर आणि किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपांत्यपुर्व
फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात किशोर गटात महाराष्ट्र संघाने हरयाणाचा, एक डाव १८ गुणांनी तर किशोरी गटात मणिपुरचा, एक डाव ३३ गुणांनी पराभव केला.
****
झिम्बॉब्वे इथं सुरू असलेल्या १९
वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज उपान्त्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारत
आणि अफगाणिस्तान संघात सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सामन्याला
सुरुवात होईल. या सामन्यातला विजेता संघ येत्या शुक्रवारी अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध
खेळेल.
****
No comments:
Post a Comment