Saturday, 1 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.08.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 August 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ ऑगस्ट २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी

·      लोकमान्य टिळकांच्या सांस्कृतिक राष्ट्रवादानुसार देश मार्गक्रमण करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन

·      व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १९२ रुपये कपात

·      लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांना सर्वत्र अभिवादन

आणि

·      राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मुष्टियुद्ध प्रकारात भारताला आणखी दोन सुवर्णपदकं

****

सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली आहे. संसदेनं मंजूर केलेल्या या विधेयकाचं आता कायद्यात रुपांतर झालं असून, यामुळे परीक्षा प्रणाली अधिक मजबूत, पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार आहे. पेपरफुटीसह बनावट संकेतस्थळं, बनावट प्रवेशपत्रं, संगणक नेटवर्कशी छेडछाड, उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार आणि बेकायदेशीर मदत अशा १६ प्रकारच्या गैरप्रकारांचा आळा घालण्यासाठी या कायद्यात कठोर तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे.

****

लोकमान्य टिळकांनी रुजवलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या मार्गावर देश मार्गक्रमण करत असल्याचं प्रतिपादन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. पुण्यात लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२६ शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना आज प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले -

बाईट – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

दरम्यान, देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य करण्यात डोभाल यांचं योगदान अत्यंत मोलाचं असल्याचं शहा यांनी नमूद केलं. डोभाल यांची दूरदृष्टी, धाडस आणि धोरणांमुळे देशाची सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट झाल्याचं शाह यांनी नमूद केलं. डोभाल यांनी यावेळी बोलतांना, पुण्याशी आपल्या शालेय जीवनाच्या आठवणी जोडलेल्या असल्याचं सांगितलं. त्याच शहरात लोकमान्य टिळकांच्या नावाने सन्मानित होणं हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याची भावना डोभाल यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

वस्तू आणि सेवा कर संकलनात जुलै महिन्यात १५ पूर्णांक ४ शतांश टक्के भर पडली असून ते २ लाख ११ हजार कोटी रुपयांच्या वर पोहोचलं आहे. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये एकूण जीएसटी संकलन १ लाख ८३ हजार कोटी रुपये झालं होतं. यंदाच्या संकलनात महिन्यात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर महसूल ३९ हजार ८३५ कोटी रुपये होता, तर राज्य वस्तू आणि सेवा करापोटी ४७ हजार ८८१ कोटी रुपये जमा झाले. एकात्मिक जीएसटी संकलन १ लाख २३ हजार कोटी रुपयांहून अधिक झालं.

दरम्यान, वर्ष २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जुलै अखेरपर्यंत जवळपास सहा लाख प्राप्तिकर करविवरण भरण्यात आले आहेत. दंड आणि व्याज लागू न होता विवरणपत्र भरायची मुदत काल ३१ जुलैला संपली. गेल्यावर्षी ही मुदत १६ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती आणि ७ कोटी ३० लाखापेक्षा जास्त विवरणपत्रं भरण्यात आले होते.

****

केंद्र सरकारने आज राज्यांना कर हस्तांतरणापोटी १ लाख ९ हजार १९ कोटी रुपयांचा अतिरिक्त हप्ता जारी केला आहे. १० ऑगस्ट रोजी नियोजित असलेल्या नियमित मासिक हस्तांतरणाव्यतिरिक्त ही रक्कम जारी करण्यात आली असल्याचं वित्त मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

****

तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत १९२ रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू झाले. यानुसार १९ किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरची किंमत मुंबईत २ हजार ६९० रुपये इतकी झाली आहे.

५ किलो वजनाच्या छोट्या सिलिंडरचे दरही ८०८ रुपये ५० पैसे वरुन कमीकरुन प्रतिसिलिंडर ७६२ रुपये केले आहेत.

****

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थळी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी लोकमान्यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शन आणि वस्तूंची पाहणीही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. राज्यात इतरत्र विविध संस्था संघटनांतर्फे टिळक पुण्यतिथीनिमित्त आदराजंलीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर इथं विश्व हिंदू परिषदेसह विविध संस्था संघटनांच्या वतीने टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं.

****

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन इथल्या अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. मुख्यमंत्री आणि इतर मंत्रिमंडळ सदस्यांनी समाजमाध्यमावर साठे यांना आदरांजली वाहिली आहे.

 

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली वाहण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर समाजाने चाललं पाहिजे, असं जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल यावेळी म्हणाले. या वेळी अधिकारी, कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

नांदेड इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. नांदेड काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण, आमदार अमरनाथ राजुरकर, महापौर कविता मुळे, महापालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बीड इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी जिल्हा प्रशासन पूर्ण पाठपुरावा करेल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली. अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी बीड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली. महोत्सवानिमित्त समता सैनिक दलाने मानवंदना दिली. एक हजार महिलांच्या सहभागाने पंचशील फेटा रॅली आज काढण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय मिटमिटा इथल्या सफारी पार्कमध्ये स्थलांतरित करण्यासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला असून, परवानगी मिळताच स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहीती महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिली आहे. प्राणी स्थलांतरित करण्याची तयारी महापालिकेने केली असून, प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये. आणि त्यांना नैसर्गिक सावली मिळावी, यासाठी नर्सरीमधून थेट १० ते १२ फूट उंचीची १५० तयार झाडे लावली जाणार आहेत. १७ सप्टेंबरला हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाचं औचित्य साधून या वृक्षांचं रोपण केलं जाईल, असही येडगे म्हणाले.

****

बीड च्या लाचखोर विभागीय वन अधिकाऱ्याला बीड जिल्हा न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लाच प्रकरणाचा तपास सुरू असून आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. झडतीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची नोंद करण्यात आली असून आरोपीच्या आर्थिक व्यवहारांचा तपशीलही तपास यंत्रणा पडताळत आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपीच्या बीड आणि नांदेड इथल्या निवासस्थानांची झडती घेतली असून, या कारवाईत सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

****

लातूर जिल्ह्यात बनावट सोन्याच्या बिस्किटांचे आमिष दाखवून महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला अहमदपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून बनावट सोन्याची चार बिस्किटे, एर्टिगा कार आणि चोरीस गेलेले सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

****

गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्यातल्या खेडेगाव इथं आंघोळीला गेलेल्या तीन मुलांचा सती नदीत बुडून मृत्यू झाला.

****

ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मुष्टियुद्ध प्रकारात जास्मिन लंबोरिया आणि प्रीती पवार यांनी आपापल्या गटात सुवर्णपदकं पटकावली. प्रीतीने महिलांच्या ५४ किलो वजनी गटात तर जास्मिनने महिलांच्या ५७ किलो वजनी गटात हा विजय संपादित केला. दरम्यान, भारताच्या प्रवीण चित्रवेलने ट्रिपल जंप प्रकारात रौप्यपदक, तर सेल्वा प्रभूने कांस्यपदक जिंकलं. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. या स्पर्धेत भारत सध्या सात सुवर्ण, १३ रौप्य आणि सात कांस्य अशा एकूण २७ पदकांसह पदक तालिकेत सहाव्या स्थानावर आहे.

****

तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे. उपान्त्य सामन्यात तिने चिनी तैपेईच्या हुआंग यु सुनचा २१-१२, २१-११ असा पराभव केला. उद्या सकाळी होणाऱ्या अंतिम फेरीत तिची लढत व्हिएतनामच्या थुय लिन एंगुयेन हिच्याशी होणार आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...