Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 August 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ ऑगस्ट २०२६ सायंकाळी
६.१०
****
· विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज बाधित-लोकसभेत कर व्यवस्था
सुधारणा विधेयक तर राज्यसभेत जन्म-मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक मंजूर
· गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला
तीन वर्ष मुदतवाढ
· शालेय अभ्यासक्रमात व्यसनमुक्तीचे धडे समाविष्ट करण्याचे मुख्यमंत्र्यांचे
निर्देश
· माजी राज्यपाल शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉक्टर डी. वाय. पाटील
यांचं निधन
आणि
· जायकवाडी धरणातून दहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदापात्रात
विसर्ग सुरू
****
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित झालं. लोकसभेत
कामकाज सुरु होताच, आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईबद्दल
गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं, अशी मागणी विरोधकांनी
केली. या मुद्यावरून विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यामुळे सदनाचं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत, आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं. दरम्यान, या
गदारोळातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर व्यवस्था आणि अन्य कायदे
सुधारणा विधेयक २०२६ सादर केलं. भारतातल्या डिजिटल, इलेक्ट्रॉनिक
आणि बँकिंग व्यवहारांचं नियंत्रण करणाऱ्या पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टिम्स ॲक्ट २००७, आयकर कायदा २०२५ आणि वित्त कायदा २०२६ मध्ये हे विधेयक सुधारणा करेल. दुपारी दोनवाजेनंतर
कामकाज सुरू झाल्यावरही सदनात गदारोळ सुरूच होता, या
गदारोळातच हे विधेयक सदनानं मंजूर केलं, त्यानंतर सदनाचं कामकाज
दिवसभरासाठी तहकूब झालं.
राज्यसभेचं कामकाज सकाळी सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन
खरगे यांनी अयोध्या मंदिर देणगी अपहार प्रकरणाचा मुद्दा उचलून धरला. संसदीय कामकाज
मंत्री किरेन रिजिजू यांनी यावर, विरोधी पक्ष या मुद्द्यावर देशाची
दिशाभूल करत असून, राम मंदिराला विरोध करणारे पक्ष आता याबाबत
नक्राश्रू ढाळत असल्याची टीका केली. सदनाचं नियमित कामकाज न चालू देता विरोधी पक्षांनी
हौद्यापर्यंत जाऊन, या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन
द्यावं,
अशी मागणी करत गदारोळ केल्यामुळे सभापती सी.पी.राधाकृष्णन यांनी
सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं. दरम्यान, विरोधकांच्या
गदारोळात गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी जन्म आणि मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक
सदनात सादर केलं. अशा नोंदण्यांसंदर्भातल्या तरतुदी अधिक कठोर करणं आणि जन्म मृत्यूच्या
नोंदी वेळेत करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणं, या
उद्देशानं सरकारनं हे सुधारणा विधेयक आणलं आहे. हे विधेयक लोकसभेत याआधीच पारित झालं
आहे. गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं. त्यानंतर राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब
झालं.
****
राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक २०२६ अंतर्गत कोणत्याही
राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली
जाणार नाही,
असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या
तासात एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. अन्नधान्याचं वाटप सुनिश्चित करणं, लाभांच्या बाबतीत समानता आणणं आणि कुटुंबाधारित प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या तफावती
दूर करणं,
हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं जोशी यांनी सांगितलं.
****
रेल्वे कायदा १९८९ मधील विविध तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात
आली आहे. मध्य रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली. या सुधारणांमुळे विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृत प्रवेश, महिलांसाठी तसंच दिव्यांगांसाठी
राखीव जागांचा गैरवापर आणि तिकिटांच्या बेकायदेशीर हस्तांतरणाविरोधात अधिक कठोर दंडात्मक
कारवाई करण्यात येणार आहे.
****
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला
तीन वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असून, आता या योजनेत भूमिहीन
शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज
झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तसंच नांदेड जिल्ह्यात
किनवट इथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय आणि वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय तसंच
बीड जिल्ह्यात केज इथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्याला आज मंत्रिमंडळानं
मान्यता दिली. यासाठीच्या पदांनाही आज मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य माहिती आयोगात राज्य माहिती आयुक्तांची तीन
नवीन पदं आणि या पदांसाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदं निर्माण करण्याला आज
मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
****
व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी
प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत शालेय शिक्षण विभागाची
आढावा बैठक झाली, त्यात त्यांनी हे निर्देश दिले. राज्यसरकारनं
शाळांमध्ये अंमली पदार्थ मार्गदर्शन आणि समुपदेशन समित्या स्थापन करण्याचा तसंच अंमली
पदार्थमुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातली दत्तक प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण व्हावी यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम
करून प्रलंबित प्रकरणं तातडीनं निकाली काढावीत, असे
निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. आज मंत्रालयात यासंदर्भात
झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. कायदेशीररित्या दत्तकासाठी मुक्त करण्यात
येणाऱ्या बालकांच्या प्रक्रियेत महाराष्ट्र देशात अव्वल आहे, असं तटकरे यांनी सांगितलं.
****
माजी राज्यपाल शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉक्टर डी. वाय. पाटील
यांचं आज कोल्हापूर इथे निधन झालं, ते ९० वर्षांचे होते. शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात मोठं साम्राज्य उभारलेले डी.वाय. पाटील यांनी प्रारंभीच्या
काळात कोल्हापूरचं महापौर पद भुषवलं. विधानसभेत पन्हाळा मतदार संघाचं त्यांनी प्रतिनिधीत्व
केलं. त्रिपुरा तसंच बिहारचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळलेले पाटील यांनी काही
काळ पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला.
डी वाय पाटील यांच्या डी. वाय. पाटील ग्रुप अंतर्गत कोल्हापूर, मुंबई,
पुणे यांसारख्या शहरांमध्ये तीन हून अधिक अभिमत विद्यापीठं, सहा खाजगी विद्यापीठं आणि १८० पेक्षा जास्त शिक्षण संस्था कार्यरत आहेत. शिक्षण
आणि सामाजित कार्यातल्या अतुलनीय योगदानाबद्दल केंद्र सरकारने १९९१ मध्ये त्यांना पद्मश्री
या नागरी पुरस्काराने सन्मानित केलं होतं.
****
डी.वाय.पाटील यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच
राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी आपल्या शोकसंदेशात एक दूरदर्शी व्यक्तिमत्त्व हरवलं, या
शब्दांत पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात
एक द्रष्टा नेता, आणि दिलदार मार्गदर्शक गमावला, असं म्हटलं तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी, पाटील
यांच्या निधनामुळे देशानं एक दूरदर्शी शिक्षणमहर्षी आणि समाजसेवक गमावला, असं म्हटलं आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, यांच्यासह राजकीय क्षेत्रासह शिक्षण क्षेत्रातून डी. वाय.पाटील यांना श्रद्धांजली
वाहिली जात आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणातून दहा
हजार घनफूट प्रतिसेकंद या वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात
आला आहे. यामुळे गोदावरी नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये तसंच नदीकाठच्या गावांतल्या
नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं
आवाहन जायकवाडीच्या नियंत्रण कक्षाकडून करण्यात आलं आहे. सध्या धरणात सुमारे ४७ हजार
घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरू असून, धरणाची
पाणी पातळी ९१ टक्क्यांच्या वर पोहोचली आहे.
****
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पालखी पादुकांचं आज छत्रपती
संभाजीनगर इथे आगमन झालं. परतवारीच्या प्रवासात शहरात आलेल्या या पालखीचं भाविकांनी
सहर्ष स्वागत केलं. आरती, प्रसाद वितरण झाल्यानंतर पालखी
सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
****
एमडी अर्थात मेफेड्रोन हा अमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन व्यक्तिंना
धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला.
****
येत्या सात ते नऊ ऑगस्ट या कालावधीत दिल्लीमध्ये, 'दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव २०२६' आयोजित करण्यात आला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीला राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वाकांक्षी
उपक्रम असल्याचं, दिल्ली मराठी प्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक
वैभव डांगे यांनी सांगितलं. या महोत्सवात विविध चित्रपटांसह कलाकार-प्रेक्षक संवाद
सत्र,
तसंच मराठी चित्रपटसृष्टीच्या शतकभराच्या प्रवासाचं दर्शन घडवणारं
प्रदर्शन,
असे विविध उपक्रम होणार आहेत.
****
आरोग्य क्षेत्रात आवश्यक सुविधा उभारण्यासाठी निधीची कमतरता
पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही धाराशिवचे पालकमंत्री प्रताप
सरनाईक यांनी दिली आहे. जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या उद्घाटनप्रसंगी
ते आज बोलत होते.
****
No comments:
Post a Comment