Wednesday, 5 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 05.08.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 05 August 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ ऑगस्ट २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

भारतीय रिझर्व्ह बँक - आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल केला नसून, तो पाच पूर्णांक २५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. मुंबईत बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली. पश्चिम आशियातल्या संकटामुळे निर्माण झालेली अनिश्चितता, त्यामुळे इंधनाचे दर आणि पुरवठा साखळीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन, व्याजदर सलग तिसऱ्यांदा जैसे-थे ठेवले असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि शेती अधिक शाश्वत बनवण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण उपाययोजना राबवल्या असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत दिली. किमान आधारभूत किंमत प्रणालीअंतर्गत ऊस, तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया आणि इतर विविध कृषी उत्पादनांना प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. पीएम-किसान योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. तसंच किसान क्रेडिट कार्ड सुविधेचा विस्तार पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रापर्यंत करण्यात आल्याने संबंधित शेतकऱ्यांना सुलभ आणि सवलतीच्या दराने कर्ज उपलब्ध होत असल्याचंही सीतारामन यांनी सांगितलं.

****

धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर प्रस्तावित रेल्वे मार्गाला गती मिळावी, यासाठी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याने प्रशासकीय मंजुरी, आवश्यक निधीची तरतूद आणि प्रत्यक्ष काम तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. रेल्वेमंत्र्यांनी मागण्यांची सकारात्मक दखल घेत नियमानुसार पुढील प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्याची माहिती खासदार सोनवणे यांनी दिली.

****

नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफने संयुक्त कारवाई करत महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगतच्या कुमनार जंगल परिसरातून नक्षलवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य जप्त केलं. यात एकूण १४ अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली.

****

राज्य शासनाने आकांक्षित योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातल्या पाच तालुक्यांचा समावेश केला आहे. यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, कळवण आणि पेठ या तालुक्यांची निवड करण्यात आल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय पातळीवर मागासलेल्या या तालुक्यांच्या विकासासाठी शासनाने ही निवड केली आहे. प्रत्येक तालुक्याला पाच कोटी असे एकूण २५ कोटी रूपये देण्यात येणार आहे. शिक्षण, आरोग्य, अन्न, मुलभूत सुविधांसाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे.

****

धाराशिव इथं महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सुनावणीनंतर आढावा बैठक आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. बालकांच्या विविध प्रश्नांबाबत यंत्रणा तसंच नागरिकांनी अधिक संवेदनशील आणि जागरूक राहावं असं सांगून बालविवाह, बालसुरक्षा, शिक्षण आणि बालहक्कांबाबत त्यांनी विविध सूचना दिल्या.

****

बीड विधानसभा मतदारसंघातली प्रलंबित विकासकामं आणि विविध प्रश्नांसंदर्भात भाजप नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी मंत्रालयात पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे तसंच राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेतली. शहर आणि ग्रामीण भागातल्या विकासकामांसाठी निधी, वीजपुरवठा आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर त्यांनी चर्चा करून शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी केली. बोर्डीकर यांनी बीड मतदारसंघातल्या विजेच्या समस्यांवर सकारात्मक भूमिका घेत विविध ठिकाणी नवीन ३३ केव्ही वीज उपकेंद्रे उभारण्याचं आश्वासन दिलं.

****

ऑनलाइन गुंतवणूक आणि इतर आमिषं दाखवून देशातल्या ६५ नागरिकांची सुमारे १५० कोटीची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीतल्या मुख्य म्यूल अकाउंट पुरवठादाराला आळंदी पोलिसांनी अटक केली. त्याच्या नऊ खात्यांमध्ये एक कोटी १५ लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचं तपासात उघड झालं आहे.

****

वीजहानी कमी करण्यासाठी महावितरणनं लातूर मंडळात विशेष मोहिमेत गेल्या चार महिन्यांत ३६४ वीजचोरांवर कारवाई करण्यात केली. या प्रकरणांमध्ये वीजबिल आणि दंड मिळून एकूण २९ लाख ८५ हजार रुपयांचं देयक आकारण्यात आलं असून, आतापर्यंत २ लाख रुपयांची वसुली झाली आहे. दंड न भरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा महावितरणनं दिला आहे.

****

नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असल्यानं शेतकऱ्यांना खरीपाच्या पेरणीसाठी संधी मिळाली असून, जिल्ह्यात आत्तापर्यंत ९१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मालेगाव, सिन्नर, चांदवड, निफाड आणि येवला या तालुक्यांमध्ये शंभर टक्के पेरणी झाली आहे. मात्र, यंदा पावसाला उशिरा सुरूवात झाल्याने पेठ तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ३६ टक्के पेरणी झाली आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...