Monday, 2 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.02.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 02 February 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ फेब्रुवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      केंद्रीय अर्थसंकल्पातून गरीब, वंचित आणि समाजाच्या प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार, अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

·      अर्थसंकल्प २०४७ च्या विकसित भारताच्या गरुडझेपेचा सशक्त आधार, पंतप्रधानांकडून अर्थसंकल्पाचं कौतुक

·      हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या माध्यमातून राज्याच्या जीडीपीत वाढ होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

आणि

·      छत्रपती संभाजीनगर इथल्या अकराव्या अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप

****

यंदाचा अर्थसंकल्प गरीब, वंचित आणि देशाच्या प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडणारा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. काल लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतांना सीतारामन यांनी, या अर्थसंकल्पाच्या तीन कर्तव्यांकडे लक्ष वेधलं. देशाचा आर्थिक विकास गतीमान आणि चिरस्थायी करणं, जनतेला अधिक सक्षम करून समृद्धीच्या वाटेवर भागीदार करून घेणं, आणि समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत विकासाचा लाभ पोहोचवणं, हेच या अर्थसंकल्पाची तीन कर्तव्य असल्याचं, सीतारामन यांनी सांगितलं. मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबादसह सात द्रुतगती रेल्वे मार्गिकांची घोषणा त्यांनी केली.

 

या अर्थसंकल्पात औद्योगिक क्षेत्रात वाढ आणि आत्मनिर्भरतेवर भर देतानांच, सेमीकंडक्टर सप्लाय चेन मजबूत करणं, ग्राम स्वराज योजनेतून ग्रामीण उद्योगांना चालना देणं, तसंच बायोफार्मा संशोधन, वस्त्रोद्योग, क्रीडासाहित्य, कंटेनर उत्पादन आणि हातमाग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.  अर्थसंकल्पाबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून…

बाईट-बजेट

 

‘‘आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तसंच विकास दरात वाढ करण्यासाठी सहा क्षेत्रांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न सरकारने या अर्थसंकल्पातून केला. परदेशातल्या भारतीयांसाठी शेअर बाजारातल्या गुंतवणूक मर्यादेत वाढ प्रस्तावित करण्यात आली असून, मधुमेह तसंच कर्करोग यासारख्या दुर्धर आजारांची औषधं कमी दरात उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. भारताला जागतिक बायो-फार्मा उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी ‘बायो फार्मा शक्ती’ ही योजना प्रस्तावित आहे. याअंतर्गत पुढील पाच वर्षांत दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. या माध्यमातून बायोलॉजिक्स आणि बायोसिमिलर्सच्या देशांतर्गत उत्पादनासाठी सक्षम परिसंस्था उभी करण्यात येणार आहे. देशभरात पाच ठिकाणी मेडिकल हब विकसित केले जाणार आहेत. पशू चिकित्सेला चालना देण्यासाठी जामनगर मध्ये WHO वैश्विक पारंपारिक चिकित्सा योजना राबवली जाईल, देशात आयुर्वेदाचं शिक्षण देणाऱ्या तीन नव्या संस्था उभारल्या जाणार असून, पशुवैद्यक महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी भरीव अर्थसहाय्य दिलं जाणार आहे.

लखपती दीदींच्या धर्तीवर महिला बचत गटांसाठी शी मार्ट्स सुरू करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली. खादी, हातमाग आणि हस्तकला क्षेत्राला बळकटी देण्यासाठी, त्यांना जागतिक बाजारपेठेशी जोडण्याकरता आणि ब्रँडिंगसाठी महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रम राबवण्याचा प्रस्ताव यंदाच्या अर्थसंकल्पात आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये कॉर्पोरेट मित्र ही व्यवस्था उभारण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. कॉर्पोरेट मित्र या व्यवस्थेअंतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना नियमांचं पालन करण्याची प्रक्रिया परवडणाऱ्या दरात पूर्ण करण्यासाठी मदत पुरवली जाईल. मासेमारीला प्रोत्साहन देण्यासाठी ५०० सरोवरांचा विकास केला जाणार असल्याचं अर्थसंकल्पात सांगण्यात आलं.

येत्या पाच वर्षात शहरी आर्थिक क्षेत्रावर पाच हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पायाभूत सुविधा वाढवण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात आहे.

२०० वारसा औद्योगिक क्लस्टर्सच्या पुनरुज्जीवनासाठी या अर्थसंकल्पात विशेष योजना प्रस्तावित करण्यात आली असून, उद्योगांच्या प्रोत्साहनासाठी १० हजार कोटी रुपयांचा एसएमई विकास निधी प्रस्तावित असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी गुंतवणूकदारांकरता विविध कर सवलती या अर्थसंकल्पातून जाहीर करण्यात आल्या.

बांधकाम आणि पायाभूत सुविधा उपकरणांच्या उन्नतीसाठी नवीन योजना आणणं प्रस्तावित असून, कंटेनर उत्पादनासाठी पुढील पाच वर्षांत दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.

पुढच्या पाच वर्षांत २० नवे राष्ट्रीय जलमार्ग सुरु करण्यात येणार असून, वाराणसी तसंच पाटणा इथं, जहाज दुरुस्ती सुविधा सुरू केली जाणार आहे.

देशभरातल्या २० प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर दहा हजार गाइड्सची नियुक्ती केली जाईल. या गाइड्सच्या कौशल्य वाढीवरही सरकार विशेष भर देणार आहे.

परदेश प्रवासाच्या पॅकेजवरच्या टीडीएसमध्ये कपात करून ती दोन टक्के प्रस्तावित करण्यात आली आहे.

अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीम, मणीपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये बौद्ध सर्कीट विकसित करण्यासाठी विशेष योजना या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे. यामध्ये मंदिरं तसंच मठांचं संवर्धन, भाषा अनुवाद केंद्र तसंच यात्रेकरूंसाठीच्या सुविधांचा समावेश असेल.’’

****

या वर्षात सरकारला साडे छत्तीस लाख कोटी रुपये एकूण महसूल प्राप्त होण्याचा अंदाज असून, त्यातले २८ लाख ७० हजार कोटी रुपये करवसुलीतून मिळतील. येत्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट चार पूर्णांक तीन दशांश टक्के राहील असा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षासाठीचा करसंकलनाचा सुधारित अंदाज ३४ लाख कोटी, तर खर्चाचा सुधारित अंदाज ४९ लाख ६० हजार कोटी रुपये असेल, अर्थसंकल्पात म्हटलं आहे.

**

सर्वसामान्य करदात्यांचं विशेष लक्ष असलेल्या आयकर संरचनेत या अर्थसंकल्पात कोणताही बदल प्रस्तावित करण्यात आलेला नाही, मात्र, कर विवरणपत्रात दुरुस्ती तसंच कर विवरण पत्र भरण्याची विलंबित मुदत वाढवण्यात आली आहे. याबाबत सनदी लेखापाल उमेश शर्मा यांनी माहिती दिली. ते म्हणाले…

बाईट- सनदी लेखापाल उमेश शर्मा

****

हा अर्थसंकल्प २०४७ च्या विकसित भारताच्या गरुडझेपेचा हा एक सशक्त आधार असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. सुधारणांच्या प्रक्रियेला उर्जा आणि गती देणारा हा युवा अर्थसंकल्प असल्याचं नमूद करतांना पंतप्रधान म्हणाले,

बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी

**

आत्मनिर्भर आणि विकसित भारत ही फक्त एक घोषणा नाही, तर सरकारचा संकल्प असल्याचं, या अर्थसंकल्पातून सिद्ध होतं, असं प्रतिपादन केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. हा अर्थसंकल्प प्रत्येक क्षेत्राला, प्रत्येक वर्गाला आणि प्रत्येक नागरीकाला सशक्त करण्यासाठी एक भक्कम आराखडा असल्याचं, शहा यांनी आपल्या ट्वीट संदेशात नमूद केलं.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा असल्याची प्रतिक्रिया नोंदवली. या अर्थसंकल्पातून राज्याला सुमारे एक लाख कोटी रुपये मिळणार असल्याचं ते म्हणाले. द्रुतगती रेल्वे मार्गिकांमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल, असं मुख्यमंत्रयांनी सांगितलं....

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

**

यंदाचा अर्थसंकल्प हा दलित आदिवासींच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून, ग्रामीण भागाचा विकास करणारा, लघु उद्योगांना चालना देणारा अर्थसंकल्प असल्याचं, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

****

माजी अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी या अर्थसंकल्पात शेती, सहकार, पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आल्याचं सांगितलं.

****

माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचं स्वागत करतांनाच, जिल्हा सामान्य रुग्णालयं अधिक उन्नत करून जास्तीत जास्त अतिदक्षता विभाग उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याचं नमूद केलं. तर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी, अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे छोट्या शहरांच्या विकासाच्या कार्यक्रमाला नवी गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

**

काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी घोर निराशादायी असल्याची टीका केली, तर, या अर्थसंकल्पात रोजगारनिर्मितीसाठी ठोस उपाययोजना नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी, हा अर्थसंकल्प म्हणजे वाटाण्याची अक्षता असल्याची टीका करत, या अर्थसंकल्पात सरकारने शेतकरी, युवक, मध्यमवर्ग आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.

****

छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या..

बाईट- पॅकेज

छत्रपती संभाजीनगर इथले सीआयआय आणि सीएमआयएचे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत करत, अर्थसंकल्पामुळे थेट परकीय गुंतवणूक वाढण्यात मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले..

बाईट- मुकुंद कुलकर्णी

**

बांधकाम व्यावसायिक विवेक देशपांडे यांनी या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना, मराठवाड्यात रोजगाराच्या संधी वाढणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले…

बाईट- विवेक देशपांडे

**

लातूरच्या जयक्रांती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत घर यांनी या अर्थसंकल्पातल्या शैक्षणिक तरतुदींचं स्वागत करत, संशोधन गुणवत्ता तसंच शिक्षक प्रशिक्षणाकडे भर देण्याची गरज व्यक्त केली.

बाईट- प्राचार्य प्रशांत घर

**

बचत गटांसाठी जाहीर झालेल्या शी मार्ट या योजनेचं परभणीच्या मानवत तालुक्यात कोल्हा इथल्या महिला बचत गटाच्या सदस्य वंदना भोसले यांनी आपली प्रक्रिया या शब्दांत व्यक्त केली.

बाईट- वंदना भोसले

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या अकराव्या अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल समारोप झाला. स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटासाठीचा सुवर्ण कैलाश पुरस्कार कन्नड चित्रपट परज्या या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, सुवर्ण कैलास स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. याच चित्रपटातल्या भूमिकेसाठी प्रज्वल कोल्लाळ याला, तर सॉंग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज या चित्रपटातल्या भूमिकेसाठी नाझ शेख याला रौप्य कैलास पारितोषिक प्रदान करण्यात आलं. मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धेत मुक्ता – आर्टिकल २१ ए हा सर्वोत्तम लघुपट ठरला, दिग्दर्शक सतीश धूताडमल यांना २५ हजार रुपये आणि रौप्य कैलास स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं.

****

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आपली निवड झाल्याचं वृत्त निराधार असल्याचं खासदार प्रफुल्ल पटेल यांनी काल सामाजिक माध्यमावरील संदेशातून स्पष्ट केलं आहे. राष्ट्रीय पक्षाध्यक्षपदाचा निर्णय विहित प्रक्रियेचं काटेकोर पालन आणि संबंधित सर्वांशी चर्चा करुनच घेण्यात येईल असं पटेल यांनी नमूद केलं. 

दरम्यान, राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएसोबत कायम राहण्याचा पक्षाचा निर्णय असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. काल अजित पवार यांच्या अस्थीकलश पूजनावेळी ही बाब स्पष्ट करून, तटकरे यांनी विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

****

छत्रपती संभाजीनगर इथं काल इंटॅक या संस्थेच्या वतीनं इतिहासकार रा श्री मोरवंचीकर यांना श्रद्धांजली सभा आणि त्यानिमित्त व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. राज्य पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले; जागतिक वारसा नामांकनाचा प्रवास, या विषयावर व्याख्यान झालं. आपल्या राज्याला जागतिक पातळीवर घेऊन जाण्यासाठी सर्वच यंत्रणांचं सहकार्य आवश्यक असल्याचं गर्गे यांनी यावेळी नमूद केलं. राज्यातल्या किल्ल्यांचा युनेस्को पर्यंतचा प्रवास त्यांनी सांगितला. मोरवंचीकर कुटुंबियांसह प्रसिद्ध नाणेतज्ज्ञ अशोक सिंह ठाकूर आणि इंटॅक या संस्थेचे समन्वयक मुकुंद भोगले यावेळी उपस्थित होते.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...