Tuesday, 3 February 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.02.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 February 2026

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ फेब्रुवारी २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      विरोधी पक्षांकडून आजही लोकसभेत गदारोळ-आठ खासदार निलंबित

·      भारत – अमेरिका टॅरिफ कपातीबाबत व्यापारकराराचं विविध स्तरातून स्वागत

·      महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांवरची स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

आणि

·      उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री

****

भारत अमेरिका व्यापारी करारावरून संसदेत मोठा गदारोळ झाला. युरोपियन युनियन आणि अमेरिका यांच्यासोबतच्या व्यापार कराराचा मसुदा सभागृहाच्या पटलावर ठेवावा अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी दोन्ही सभागृहात केली.

लोकसभेचं आजचं कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माजी खासदार दिवंगत सुरुपसिंह नाईक यांना श्रद्धांजली वाहून, प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात केली. मात्र विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर जात घोषणाबाजी केली. त्यामुळे अध्यक्षांनी कामकाज आधी बारा आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर, अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर बोलण्याऐवजी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा संदर्भ देत बोलायला सुरुवात केली. मात्र पीठासीन अधिकारी कृष्णप्रसाद टेन्नेटी यांनी आक्षेप घेत, लोकसभा अध्यक्षांनी काल यावर निर्णय दिला असल्याचं सांगितलं. त्यावर विरोधकांनी गदारोळ करत, अध्यक्षांच्या दिशेने कागद भिरकावले. या गदारोळामुळे अध्यक्षांनी कामकाज तीन वाजेपर्यंत स्थगित केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही गदारोळ सुरूच राहिला, अध्यक्षांच्या आसनाच्या दिशेनं कागद फेकणाऱ्या आठ खासदारांना निलंबित करण्यात आलं. यामध्ये काँग्रेसच्या सात आणि कम्युनिस्ट पक्षाच्या एका खासदाराचा समावेश आहे.

****

राज्यसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अमेरिकेसोबतच्या कराराच्या मुद्द्यावरून सभात्याग केला. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. या कराराची विस्तृत माहिती सभागृहासमोर मांडली जाईल, असं सभागृह नेते जे पी नड्डा यांनी सांगितलं. कामकाज दुपारी सुरू झाल्यानंतर सदनात राष्ट्रपती अभिभाषणावरची चर्चा पार पडली. या चर्चेला पंतप्रधान उद्या उत्तर देणार आहेत.

****

भारत – अमेरिका परस्पर टॅरिफ कपातीबाबतच्या व्यापारकराराचं विविध स्तरातून, विशेषतः उद्योगजगताकडून स्वागत होत आहे. हा करार उभयपक्षी हित साधणारा असल्याची प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

महाराष्ट्र कायम निर्यातीत अग्रेसर असलेलं राज्य असून या करारामुळे राज्यातल्या व्यवसायासाठी नवं क्षितिज खुलं होईल, आणि राज्यात मोठी गुंतवणूक होईल, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

विविध उद्योजक आणि व्यापारी संघटनांनी या कराराबद्दल आनंद व्यक्त केला असून यामुळे भारतीय उत्पादनांना अमेरिकेत उठाव मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

शेअरबाजारातही या कराराचे सकारात्मक पडसाद दिसून आले.

****

मुंबई-अहमदाबाद बुलेट रेल्वे प्रकल्पासाठीच्या दुसऱ्या बोगद्याचं खोदकाम पूर्ण झाल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केली. महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातला हा दुसरा बोगदा असून बुलेट ट्रेन प्रकल्पाचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रकल्पात आतापर्यंत ३३४ किलोमीटरचा लोहमार्ग आणि ४१७ किलोमीटर लांबीचं घाट आणि पुलांचं बांधकाम पूर्ण झाल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.

****

परदेशी तंत्रज्ञान कंपन्या भारतीय संविधानाचं पालन करू शकत नसतील तर त्यांनी देश सोडून जावं, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानं मेटा प्लॅटफॉर्म्स, या अमेरिकन कंपनीला फटकारलं आहे. व्हॉट्सअप, या समाजमाध्यमाच्या २०२१च्या गोपनीयता धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. डेटा शेअरिंगच्या नावाखाली तंत्रज्ञान कंपन्या भारतीय नागरिकांच्या गोपनीयता अधिकारांचं उल्लंघन करू शकत नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय येत्या नऊ तारखेला अंतरिम आदेश देणार आहे.

****

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन –एमसीए च्या सर्वोच्च परिषदेच्या निवडणुकांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलेली स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. निवडणुकांच्या अगदी दोन महिने आधी, एमसीएच्या सर्वसाधारण सभेत चारशे नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आल्यानं कायदेशीरपणा, निष्पक्षता आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण होतात, असं नमूद करत मुंबई उच्च न्यायालयानं सहा जानेवारीला या निवडणुकांना स्थगिती दिली होती. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि विपुल एम. पंचोली यांच्या पीठानं एमसीएवर कठोर टिपणी करत, स्थगिती योग्य असल्याचं सांगितलं आणि एमसीएनं उच्च न्यायालयातच आपली बाजू मांडावी, असे निर्देश दिले.

****

शेती आणि पूरक उद्योगांसाठी भारतानं इस्राईलच्या धर्तीवर शाश्वत पर्यावरणस्नेही मॉडेल’ विकसित करण्याची गरज, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.दिनेश कुमार अस्वाल यांनी व्यक्त केली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या पदार्थविज्ञान विभागात इनोव्हेशन इन मटेरियल्स सायन्स फॉर सस्टेनेबल फ्युचरया विषयावरच्या परिषदेचं उदघाटन आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. या विभागातले वरिष्ठ प्राध्यापक तथा विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र शिरसाट यांच्या गौरवार्थ ही तीन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या परिषदेत देश विदेशातले चारशे पंचाहत्तर संशोधक सहभागी झाले आहेत.

****

पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. सामान्य प्रशासन विभागानं आज यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला. यापूर्वी या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे होतं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठीचे आपण दावेदार नाही, असं वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.

****

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थिकलश आज नांदेड जिल्ह्यात आणण्यात आला. विविध ठिकाणी या अस्थिकलशाला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. आज रात्री काळेश्वर मंदिर परिसरातील गोदावरी पात्रात अस्थी विसर्जन केलं जाणार आहे.

****

भविष्यातला पुणे शहराचा विकास लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विमानतळ विकासासाठीच्या निधीचा प्रस्ताव पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

****

पायाभूत सुविधा तसंच औद्योगिक विकासासाठी राज्यात राबवण्यात येत असलेली भूसंपादन प्रक्रिया गतीनं आणि पारदर्शक पद्धतीनं राबवावी, प्रकल्पांसाठी जमीन देणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते आज मुंबईत बोलत होते. राज्यात सुरू असलेले सगळे प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण होतील, असं नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

****

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरण, यासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्वपूर्ण असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे. गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान–उमेद, यांच्यात हा सामंजस्य करार करण्यात आला असून, या करारामुळे राज्यातल्या नऊ कापूस उत्पादक जिल्ह्यांतल्या पाच हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत आणि आधुनिक शेती पद्धतींचं प्रशिक्षण मिळणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात परभणी, बीड, नांदेडसह नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे.

****

महिला व बाल विकास मंत्रालय आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या आशा मोहिमेअंतर्गत लातूर इथल्या संत नामदेव विद्यालयात, एक विशेष जनजागृती कार्यक्रम झाला. यावेळी विद्यार्थ्यांना बाल विवाहाचे दुष्परिणाम, बाल विवाह प्रतिबंधक कायदा, बाल संरक्षणाशी संबंधित विविध कायदे याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी, उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी बालविवाह मुक्त भारत निर्माण करण्यासाठी सामूहिक शपथ घेतली.

****

हरियाणा इथं सुरु असलेल्या ३५व्या किशोर आणि किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात किशोर गटात महाराष्ट्र संघाने हरयाणाचा, एक डाव १८ गुणांनी तर किशोरी गटात मणिपूरचा, एक डाव ३३ गुणांनी पराभव केला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 16 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...