Tuesday, 4 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.08.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 04 August 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      नीट संदर्भात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेचं कामकाज तिसऱ्या आठवड्यातही बाधित

·      विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

·      प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करण्यास मंजुरी

आणि

·      राज्याच्या बहुतांश भागांत पावसाची उघडीप, जायकवाडी धरणाची पाणी पातळी ९० टक्के

****

नीट संदर्भात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत विरोधकांनी कालही गदारोळ केला, त्यामुळे वारंवारच्या स्थगितीनंतर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.

दरम्यान, विरोधकांच्या घोषणाबाजीतच, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी, भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक २०२६ तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक २०२६ लोकसभेत सादर केलं. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक, २०२६ लोकसभेत मंजूर करण्यात आलं. राज्यसभेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक, २०२६ मंजूर करण्यात आलं, त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.

****

नीट परीक्षेनंतर एमबीबीएस आणि इतर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशनाची पहिली फेरी आजपासून सुरू होत असून, यावर्षाचं शैक्षणिक सत्र आठ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या फेरीत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख २२ ऑगस्ट असेल. समुपदेशनाची दुसरी फेरी २४ ऑगस्ट ते दोन सप्टेंबर या कालावधीत तर तिसरी फेरी १० ते १८ सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

****

कॉकरोच जनता पार्टीच्या विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायचा निर्णय त्या-त्या राज्यांनी घ्यावा, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. ‘गुन्हेगारी पार्श्वभूमी’ नसलेल्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई न करायचे निर्देशही न्यायालयानं २८ जुलै रोजी दिले होते. फक्त गंभीर गुन्हे असलेल्यांनाच ‘गुन्हेगारी पार्श्वभूमी’ असलेले समजावं, असंही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. पेलेट गन्सचा वापर कधी आणि कसा करायचा, याबाबत एक सर्वसमावेशक नियमावली तयार करणार असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी १८ ऑगस्ट रोजी होणार आहे.

दरम्यान, पादचारी तसंच वाहनांसांठीचे मार्ग स्पष्टपणे वेगळे करून पादचाऱ्यांसाठी सीमांकित आणि अतिक्रमण मुक्त जागा निश्चित कराव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीशिवाय किंवा बांधकामाशिवाय हे साध्य करता येईल, असं न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि आलोक आराध्ये यांच्या पीठानं म्हटलं आहे.

****

अनुदानित खतांसोबत इतर उत्पादनांच्या खरेदीची सक्ती करण्याला राज्य शासनाने बंदी घातली असून, अशा प्रकरणी कठोर कारवाईचा इशारा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. खतांच्या खरेदी-विक्रीदरम्यान कोणत्याही प्रकारचे टॅगिंग किंवा लिंकिंग होत असल्यास शेतकऱ्यांनी टोल फ्री क्रमांक, १८००-२३३-४००० किंवा व्हॉट्सॲप क्रमांक, ९८ २२ ४४ ६६ ५५ या वर तात्काळ तक्रार नोंदवावी, असं आवाहन भरणे यांनी केलं.

****

महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार, १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची आणि शेती किंवा पूरक कृषी व्यवसायात कार्यरत असलेली महिला 'महिला शेतकरी' म्हणून पात्र ठरेल. ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतीमार्फत अर्ज करून पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाईल. या कायद्यांतर्गत महिला शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय डेटाबेस, महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी, महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद आणि राज्य समन्वय समिती स्थापन करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

****

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातल्या मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी ३९ कोटी ८६ लाख ७४ हजार रुपयांचा अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. ग्रामविकास विभागाने यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी केला. एक लाख ६१ हजार ३७३ मंजूर घरकुल लाभार्थ्यांना या अतिरिक्त राज्य हिस्स्याचा लाभ मिळणार आहे. यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये १९९ कोटी ३३ लाख ६९ हजार रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३९ कोटी ८६ लाख ७४ हजार रुपये वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

****

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना आदरांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी, तर नांदेड जिल्ह्यात भोकर इथल्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रताप चव्हाण यांनी नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता १० ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांना मुदतवाढीचा लाभ घेऊन वेळेत पीक विमा भरावा, असं आवाहन केलं आहे.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या एक लाख ६० हजार ७६९ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी ७९ हजार ८५५ पात्र शेतकऱ्यांना सुमारे ५८२ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांचा समावेश पुढील यादीमध्ये करण्यात येणार असून त्यांनाही योजनेचा लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यातल्या सर्व राष्ट्रीयकृत, खासगी, ग्रामीण तसंच सहकारी बँकांनी आपल्या पात्र खातेदार शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले आहेत.

****

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदींनुसार नियमित ग्रामसभा न घेतल्याप्रकरणी लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी किल्लारी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुलक्षणा बाबळसुरे यांना सरपंचपदासाठी अपात्र घोषित केलं आहे. तसंच किल्लारी ग्रामपंचायतीचं सरपंचपद तात्काळ रिक्त घोषित करण्यात आलं आहे. ग्रामपंचायत सदस्य गुंडप्पा बालकुंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेचा अर्ज दाखल केला होता.

****

लातूर जिल्ह्यात अहमदपूर नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘नमो उद्यान’ तसंच शहराच्या वाढीव वस्तीसाठीच्या पाणीपुरवठा पाईपलाईन योजनेचा शुभारंभ सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. नगरपालिकेने सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा तसंच उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन करून भविष्यातल्या गरजा लक्षात घेऊन काम करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित घोटाळ्याप्रकरणी ठेवीदारांनी, माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण पुकारलं आहे. ठेवीदारांच्या पैशांची तातडीने परतफेड, संस्थेच्या मालमत्ता ताब्यात घेऊन विक्री प्रक्रिया गतीने पूर्ण करणं आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

****

धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा द्यावा या आणि अन्य मागण्यांसाठी महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांच्या वतीने काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. समान परिस्थितीतही विमा कंपनीने वेगवेगळे निकष लावल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं.

****

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक ऑगस्टपासून जागतिक स्तनपान सप्ताह राबवण्यात येत आहे. आईचं दूध बाळासाठी सर्वोत्तम अन्न, हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांनी केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या भूमी अभिलेख विभागाच्या २० प्रकारच्या सेवा आता आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये जमिनीच्या मोजणीची नक्कल, शेतपुस्तक, मोजणी नकाशा, क्षेत्र बुक, मिळकत पत्रिका स्वतंत्र करणं, भूसंपादन मोजणी, स्टेट बँक, जमीनीवरील आरक्षण, टिपण आदी सेवांचा समावेश आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन भूमी अभिलेख विभागाने केलं आहे.

****

राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं उघडीप दिली आहे. हवामान विभागाने विदर्भात बहुतांश जिल्ह्यांना तसंच पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

जालना जिल्ह्यात काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. धाराशिव जिल्ह्यात भूम तालुक्यातल्या पाच पैकी चार महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. बेदरवाडी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरची तसंच याशिवाय वाशी - भूम मार्गावरची वाहतूक देखील काही काळ ठप्प झाली होती.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणात सध्या सुमारे २७ हजार ५०७ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरू असून, धरणाची पाणी पातळी सुमारे ९० टक्क्यावर पोहोचली आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून ११००, तर डाव्या कालव्यातून ७०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...