Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 02 February 2026
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०२ फेब्रुवारी
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
संसदेच्या दोन्ही सभागृहात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या
ठरावावर चर्चा सुरु होणार आहे. लोकसभेत हा ठराव केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल मांडणार
असून, खासदार तेजस्वी सुर्या त्याला अनुमोदन
देणार आहेत. तर राज्यसभेत भाजपा खासदार सी. सदानंदन मास्टर हे आभारदर्शक ठराव सादर
करतील, आणि मेधा कुलकर्णी या ठरावाला अनुमोदन
देतील.
****
संसदेत काल अर्थसंकल्प सादर होताना
उपस्थित विद्यार्थ्यांशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संवाद साधला. विद्यार्थ्यांना
भविष्याचे नेते म्हणून संबोधित करत त्यांनी
अर्थसंकल्पातल्या महत्वाचे मुद्दे सोप्या भाषेत समजावून सांगितले. विद्यार्थ्यांच्या
प्रश्नांना सविस्तर उत्तरं देत त्यांनी अर्थसंकल्पातल्या विविध योजनांचा अर्थ, देशाच्या विकासावर त्यांचा परिणाम
आणि भविष्यातल्या संधी याबाबत मार्गदर्शन केलं.
यामुळे विद्यार्थ्यांना फक्त आर्थिक धोरणांची माहिती नाही, तर देशाच्या प्रगतीत त्यांचा सहभाग
कसा असू शकतो याची माहिती मिळाली.
****
२०२४७ पर्यंत विकसित भारताचं स्वप्न
साकार करण्याच्या मार्गावर देश अधिक वेगानं पुढं जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलं. पंजाबमधे जालंधर इथं एका जाहीर सभेत ते काल बोलत होते. संत
गुरु रविदासजी यांच्या जयंतीनिमित्त काल पंतप्रधानांनी डेरा सचखंड बल्लान इथं आयोजित
कार्यक्रमात भाग घेऊन आदरांजली वाहिली. आदमपूर विमानतळाचं नामकरण संत श्री गुरु रविदास
महाराज असं करण्याचा तसंच लुधियानाच्या हलवारा विमानतळाचा उद्घाटन सोहळा पंतप्रधानांच्या
हस्ते झाला.
****
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी
आज सातारा जिल्ह्यात कराड इथल्या माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगम
या समाधीस्थळी अभिवादन केलं. खासदार सुनील तटकरे, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यावेळी उपस्थित होते.
समाधीला अभिवादन केल्यानंतर पवार या फलटण तालुक्यातल्या तरडगाव इथं विदीप जाधव यांच्या
कुटुंबियांची भेट घेणार आहेत. विदीप जाधव यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला.
****
प्रजासत्ताक दिन शिबिर म्हणजे केवळ
संचलन नव्हे, तर मूल्यांची आणि शिस्तीची
शाळा आहे, असं प्रतिपादन राष्ट्रीय छात्र सेना महाराष्ट्र एनसीसीचे
अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी केलं आहे. प्रजासत्ताक दिन संचलनात
सहभागी झालेल्या राज्यातल्या एनसीसी छात्रांचा सत्कार करताना ते काल बोलत होते. एनसीसीचा
गणवेश परिधान करणं म्हणजे केवळ गणवेश घालणं नसून, मूल्य परिधान केल्यासारखं आहे, असं त्यांनी सांगितलं. विकसित भारतासाठी
युवा मनाची गरज असून, हे एनसीसी छात्र पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेला नक्कीच हातभार लावतील, असंही मेजर जनरल विवेक त्यागी यांनी
नमूद केलं. यावेळी प्रजासत्ताक दिन शिबिरात सहभागी झालेल्या छात्रांनी आपले अनुभवही
सांगितले.
****
जालना इथल्या जेईएस महाविद्यालयाचा पहिला 'जेईएस कलासाधना पुरस्कार' सुप्रसिद्ध ढोलकी सम्राट पांडुरंग घोटकर यांना काल प्रदान
करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं
स्वरूप आहे. लोककलेची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हेच आपल्या जीवनाचं ध्येय
असून हा पुरस्कार कलावंतांसाठी प्रेरणादायी ठरेल, असं मत घोटकर यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या भाषणात
केलं.
****
परभणी शहरातला प्रसिद्ध हजरत सय्यद
शाह तुराबुल हक साहेब यांचा वार्षिक उर्स कालपासून सुरू झाला. जिल्हाधिकारी संजयसिंह
चव्हाण यांनी तबक डोक्यावर घेऊन संदलला रीतसर सुरुवात केली. या ऊर्ससाठी मोठ्या प्रमाणावर
भाविकांची गर्दी होत असून, भाविकांसाठी सुविधा तसंच
सुरक्षेसाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्याच्या
मौजे ब्रह्मवाडीच्या ग्रामस्थांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक मतदानावर
बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. मोघा ते ब्रह्मवाडी दरम्यानचा दीड किलोमीटरच्या रस्त्याची
गेल्या वीस वर्षांपासून दुरावस्था आहे. अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्यानं
गावात एसटी बसही पोहोचत नसल्याने, संतप्त ग्रामस्थांनी
हा निर्णय घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त
छत्रपती संभाजीनगर इथं आज पहिलं बालकुमार साहित्य
संमेलन होत आहे. या संमेलनातल्या कवी संमेलनात, महापालिकेच्या हर्सूल शाळेचा इयत्ता नववीतला विद्यार्थी
आर्यन राजपुरे आणि आठवीतली विद्यार्थिनी आयेशा फिरोज शेख यांच्या कवितांची निवड झाली
आहे.
****
१९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत
भारताने पाकिस्तानवर ५८ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केलं
आहे. झिम्बाब्वेतील बुलावायो इथं काल झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत
४९ षटकांत २५२ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ १९४ धावांत सर्वबाद
झाला.
****
भारताची बॅडमिंटनपटू देविका सिहाग
हीनं थायलंड इथं झालेल्या जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या सूपर थ्री हंड्रेड स्पर्धेत
महिला एकेरीचं जेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात मलेशियाची प्रतिस्पर्धी गोह जीन वेई
हीनं दुखापतीमुळं अर्धवट सामन्यातून माघार घेतली. त्यावेळी देविकानं पहिला गेम जिंकला
होता.
****
No comments:
Post a Comment