Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 August 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ ऑगस्ट २०२६ सायंकाळी
६.१०
****
· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा-विकसित
भारत संकल्प अभियाना’चा प्रारंभ
· पैठणच्या जायकवाडीत ८५ टक्के तर नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात
९२ टक्के पाणीसाठा, गोदावरी काठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा
· जमीन व्यवहारांत पारदर्शकतेसाठी हिवाळी अधिवेशनात लँड टायटलिंग
कायदा आणणार,
महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा
· भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं
विजेतेपद
आणि
· ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप, आगामी २०३० चं यजमानपद भारताकडे
****
भारताची वाटचाल विकसित राष्ट्राच्या दिशेने सुरू असताना आपल्या
देशातील युवक शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरीत्या कणखर आणि
आत्मविश्वासाने परिपूर्ण असणं आवश्यक आहे, असं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ‘नशामुक्त
युवा-विकसित भारत संकल्प अभियाना’चं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर रहावं, आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी, असं ते यावेळी म्हणाले.
समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यान साधना, या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला आंतरिक बळ देतात, असं सांगून प्रत्येक युवकानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील असं
पंतप्रधान यावेळी म्हणाले.
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आगामी शंभर आठवडे हा उपक्रम सुरू राहणार असून दर रविवारी देशभरात
ठिकठिकाणी नशामुक्ती संदर्भात कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. आजच्या कार्यक्रमात
देशभरातून सुमारे १ कोटी युवक सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला नागपूरच्या ‘रामगिरी’
इथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणाचा जलसाठा
८५ टक्क्यापर्यंत पोहोचला आहे. काही दिवसांपासून वरील धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची
आवक सुरू आहे. तसेच जायकवाडी धरण परिसरामध्ये देखील पावसाने जोर धरल्याने देखील पाण्याची
पातळी वेगाने वाढत आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश हासे यांनी
गोदावरी नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान उजव्या तसेच
डाव्या कालव्यातून विसर्ग केला जात आहे.
****
नांदेड शहरात विष्णुपुरी प्रकल्पात ९२ टक्के जलसाठा असून कोणत्याही
क्षणी आता प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागतील. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना
सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे खरीप
पिकांना दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे चंद्रपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली
असून जिल्ह्यातले काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा
विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरणे शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. यवतमाळमधलं
निळोणा धरणही ओसंडून वाहू लागलं आहे.
****
जमीन व्यवहारांत पारदर्शकता आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या
सोयीसाठी राज्य शासन येत्या डिसेंबरच्या अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणणार आहे. ‘आधी
मोजणी,
त्यानंतर नोंदणी आणि त्यानंतर फेरफार’ हे त्याचं तत्त्व असेल. तसंच, कूळ, वहिवाटदार आणि देवस्थानांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी देवस्थान जमीन इनाम कायदाही
लवकरच आणला जाईल, अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी आज केली. रत्नागिरीत आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान
शिबिरात ते बोलत होते. यावेळी जवळपास दोन हजार ३०० कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा
लाभ देण्यात आला. पुढील दोन वर्षांत राज्यातल्या सर्व जमिनींची सरकारी मोजणी करण्यात
येणार असून रत्नागिरी शहराचाही सिटी टायटल सर्व्हेत समावेश केला जाणार आहे. यात शेतकऱ्यांच्या
जमिनीच्या सीमा निश्चित केल्या जाणार असल्याचं मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं. तसंच
कोतवालांना तलाठी भरतीमध्ये २० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असंही
ते म्हणाले.
****
ज्या वेगानं तंत्रज्ञान बदलत आहे त्या वेगानं आपल्या शैक्षणिक
संस्थांनी तंत्रज्ञानाला आत्मसात करणं ही काळाची गरज आहे, असं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं रामदेवबाबा विद्यापीठाच्या
कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता आता
जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राला गवसणी घालत असून भविष्यात अनेक नोकऱ्यांच्या कामाचं
स्वरुप बदलणार आहे. जग आता सहाव्या औद्योगिक क्रांतीबद्दल बोलत असून रोबोटिक्स, डीप टेक,
क्वांटम तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान
यात प्रमुख भूमिका बजावतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. कृत्रिम
बुद्धिमत्तेचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी देखील केला जात असून आरोग्यसेवांवर त्याचा
सकारात्मक परिणाम झाला आहे, त्याचप्रमाणे कृषी क्षेत्राला
देखील ए आय संबंधित तंत्रज्ञानाचा लाभ झाला आहे, असं
ते म्हणाले.
****
नांदेडमध्ये जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कार्यरत
कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं
महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित वेतन अदा
करावे तसंच न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत त्यांच्या जागी कोणतीही नियुक्ती करू नये, असे निर्देश न्यायालयानं राज्य शासनाला दिले आहेत. याप्रकरणी नांदेड जिल्हा परिषद
इथले जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन विभागातील डॉ. नंदलाल लोकडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. यात झालेल्या
सुनावणीत याचिकाकर्त्यांच्या वतीनं विधीज्ञ गौतम कर्णे यांनी कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यांपासून
वेतन मिळत नसल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. तर शासनाच्या वतीनं विधीज्ञ
ए. बी. गिरसे यांनी बाजू मांडली. याप्रकरणी मुख्य सचिव, प्रकल्प
संचालक तसंच संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश
देण्यात आले आहेत.
****
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मरणोत्तर
भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करावं, अशी मागणी राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि माजी आमदार विधीज्ञ उषा दराडे यांनी केली.
साठे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत साहित्य, शाहिरी आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. क्रांतीसिंह
नाना पाटील यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी अन्यायाविरोधात आवाज उठविला असं
साठे यांच्या जयंतीनिमित्त बीड इथं बोलताना त्यांनी सांगितलं.
****
सांगली जिल्ह्यातील मिरज इथं दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार
यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त आज महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिराचं
उद्घाटन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आलं. या शिबिरात
विविध आरोग्य तपासण्या आणि आवश्यक तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाबरोबरच मोफत औषधांचे
वितरण करण्यात आले. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार
इद्रीस नायकवडी उपस्थित होते. या शिबिराचा हजारो रुग्णांनी लाभ घेतला.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात
१४१ प्राध्यापकांची भरती केली जाणार आहे. ४६८ उमेदवारांची सोमवार, मंगळवार असे दोन दिवस लेखी परीक्षा आयोजित केली असल्याची माहिती कुलसचिव डॉ.प्रशांत
अमृतकर यांनी दिली. विद्यापीठ परिसरातल्या संगणकशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र
आणि ज्ञानस्रोत केंद्र या तीन केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. विविध ५६ विभागांत
शिक्षकांची १४१ पदे भरण्यात येणार आहेत.
****
तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या
तन्वी शर्मा हिनं पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या सहाव्या
मानांकित थुय लिन एंगुयेनचा २१-१६, २१-१६ असा सरळ गेम मध्ये पराभव
करून आपल्या कारकीर्दीतलं पहिलं बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावलं. तन्वीनं
तैवानच्या ताई त्झू यिंगला मागे टाकत तैपेई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान
मिळवला. २००८ मध्ये सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर, ते जिंकणारी तन्वी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे.
****
ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धां २०२६ चा आज समारोप
समारोप होणार आहे. या समारोप समारंभात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमानपद
अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवले जाईल. २०३० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं
ते हे शताब्दी वर्ष असणार आहे. १९३० साली कॅनडामध्ये हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल
स्पर्धा पार पडली होती.
****
No comments:
Post a Comment