Monday, 3 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.08.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 August 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      नशामुक्त युवा - विकसित भारत संकल्प या १०० आठवड्यांच्या राष्ट्रव्यापी जनसहभाग मोहिमेचा शुभारंभ

·      शैक्षणिक संस्थांनी तंत्रज्ञानाला आत्मसात करणं ही काळाची गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

·      जमिन व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हिवाळी अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणणार, महसूलमंत्र्यांची घोषणा

·      जायकवाडी धरणातून दोन्ही कालव्यातून पाण्याचा विसर्ग, गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन

आणि

·      ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा समारोप, २०३० चं यजमानपद भारताकडे

****

विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना देशातल्या तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या कणखर आणि अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहणं अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत 'नशामुक्त युवा - विकसित भारत संकल्प अभियान' तसंच अंमली पदार्थांविरोधातील १०० आठवड्यांच्या राष्ट्रव्यापी जनसहभाग मोहिमेचा शुभारंभ काल पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झाला, त्यावेळी ते बोलत होते. अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, कुटुंबाची भूमिका, शिक्षकांचं योगदान, युवकांची जबाबदारी आणि व्यसनमुक्त भारतासाठी लोकसहभागाचं महत्त्व पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केलं. तसंच, अंमली पदार्थ तस्करीविरोधात सरकार कठोर कारवाई करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यान साधना, या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला आंतरिक बळ देतात, असं सांगून प्रत्येक युवकानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील असं पंतप्रधान यावेळी म्हणाले:

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कार्यक्रमात ऑनलाइन सहभाग घेत युवकांना व्यसनमुक्त राहण्याचं आवाहन केलं.

आगामी शंभर आठवडे हा उपक्रम सुरू राहणार असून दर रविवारी देशभरात ठिकठिकाणी नशामुक्ती संदर्भात कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे.

**

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी नशामुक्तीची शपथ घेतली. विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या कोणत्याही प्रकारापासून दूर राहून निरोगी जीवनशैली, सकारात्मक विचार, चारित्र्यसंपन्नता, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी यांचा स्वीकार करावा, असं आवाहन कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी यावेळी केलं.

****

आपल्या शैक्षणिक संस्थांनी तंत्रज्ञानाला आत्मसात करणं ही काळाची गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं रामदेवबाबा विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता आता जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राला गवसणी घालत असून, भविष्यात अनेक नोकऱ्यांच्या कामाचं स्वरुप बदलणार आहे. जग आता सहाव्या औद्योगिक क्रांतीबद्दल बोलत असून रोबोटिक्स, डीप टेक, क्वांटम तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान यात प्रमुख भूमिका बजावतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी देखील केला जात असून आरोग्यसेवांवर त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे, त्याचप्रमाणे कृषी क्षेत्राला देखील ए आय संबंधित तंत्रज्ञानाचा लाभ झाला आहे, असं ते म्हणाले. आजच्या नोकऱ्यांच्या क्षेत्राला केवळ पदवीधरांची नव्हे, तर अर्थपूर्ण योगदान देणाऱ्या गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.

****

जमिनींच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी यंदाच्या हिवाळी अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणण्याची घोषणा, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. रत्नागिरी इथं काल छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरात ते बोलत होते. आधी मोजणी, त्यानंतर नोंदणी, त्यानंतर फेरफार हे कायद्याचं तत्त्व असेल, अशी माहिती त्यांनी दिली. समाजातल्या शेवटच्या घटकासाठी सरकारनं काम करायला हवं, लोकांनी सरकारी कार्यालयांमध्ये जाण्याऐवजी कार्यालयं लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत, हीच शासनाची भूमिका असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.

****

पूरग्रस्त राज्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत केंद्राच्या वाट्यातून दोन हजार ११७ कोटी रुपयांचा आगाऊ निधी मंजूर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. केंद्र सरकार पूरग्रस्त राज्यांना मदत, बचाव आणि पुनर्वसनासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवलं जात असल्याचं गृह मंत्रालयानं सांगितलं.

****

आषाढी वारीच्या काळात एस टी महामंडळानं सुमारे साडे पाच हजार बसेसमधून नऊ लाखांहून अधिक भाविकांना सुरक्षित प्रवास घडवला, अशी माहिती परिवहन मंत्री तसंच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. आषाढी यात्रेच्या काळात महामंडळानं एसटीच्या सुमारे २२ हजार फेऱ्या चालवल्या आणि यातून महामंडळाला ४१ कोटी १८ लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या उत्पन्नात पाच कोटी रुपयांची वाढ झाली, असं सांगून, लालपरीची लोकसेवेची परंपरा भविष्यातही अधिक सक्षमपणे सुरु राहील, अशी ग्वाही सरनाईक यांनी दिली.

****

नांदेडमध्ये जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित वेतन अदा करावं तसंच न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत त्यांच्या जागी कोणतीही नियुक्ती करू नये, असे निर्देश न्यायालयानं राज्य शासनाला दिले आहेत. याप्रकरणी नांदेड जिल्हा परिषद इथले जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन विभागातले डॉ. नंदलाल लोकडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १४१ प्राध्यापकांची भरती केली जाणार असून, त्यासाठी ४६८ उमेदवारांची आज आणि उद्या लेखी परीक्षा होत आहे. कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी ही माहिती दिली. विद्यापीठ परिसरातल्या संगणकशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र आणि ज्ञानस्रोत केंद्र या तीन केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं गारखेडा परिसरातल्या अश्मिरा गाझी कॉस्मेटिक शॉप मध्ये अन्न आणि औषधी विभागाने छापा टाकून विनापरवाना आणि संशयास्पद सौंदर्यप्रसाधने जप्त केली. ३ लाख ५५ हजार रुपयांची विविध प्रकारची ही सौदर्यप्रसाधने असून, याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या उत्पादनांवर उत्पादकाचं नाव, परवाना क्रमांक, आयात परवाना क्रमांक तसंच इतर आवश्यक माहिती नमूद नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

****

राज्यात विविध भागात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक धरणं भरली आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ८६ पूर्णांक ५५ टक्क्यापर्यंत पोहचला आहे. काही दिवसांपासून वरील धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. धरणात सध्या ३६ हजार १५७ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरु असून, उजव्या कालव्यातून १२००, तर डाव्या कालव्यातून ७०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश हासे यांनी गोदावरी नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

नांदेडनजिक विष्णुपुरी प्रकल्पात ९२ टक्के पाणीसाठा झाला असून, विसर्ग सुरु करण्याची शक्यता आहे.

**

सोलापूर जिल्ह्यातलं उजनी धरण शंभर टक्के भरलं असून, भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंढरपूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या सुमारे १०० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. वीर धरणातून नीरा नदीत सुमारे १४ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.

**

राज्यातल्या चारही विभागांमध्ये आज पावसाची शक्यता असून, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

****

ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा काल शानदार सोहळ्याने समारोप झाला. यावेळी २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद अधिकृतपणे भारताकडे सुपूर्द करण्यात आलं. ग्लासगोच्या प्रथम नागरिक जॅकलीन माकलारेन यांनी हस्तांतरणाचा झेंडा दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा, भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष पी टी उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सुपुर्द केला. या स्पर्धेत भारत १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि नऊ कांस्य पदकांसह एकूण ३९ पदकं जिंकून चौथ्या स्थानावर राहीला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...