Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 05 September
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०५ सप्टेंबर
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षकांना आपल्या
अध्यापनात नवतंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन केलं आहे. आज शिक्षक दिन साजरा होत
असून त्या अनुषंगाने राष्ट्रपतींनी सामाजिक प्रसार माध्यमाद्वारे शिक्षकांना शुभेच्छा
देत हा संदेश दिला आहे. माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ
हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या
हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या सोहळ्यात मराठवाड्यातल्या
अनेक शिक्षकांना गौरवण्यात येणार आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शाळांमधील १२ शिक्षकांची
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून येत्या १७ सप्टेंबर रोजी हैदराबाद
मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
****
दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी
काल सायंकाळी यंदाच्या 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' विजेत्यांशी संवाद साधला. २०४७ वर्षापर्यंत 'विकसित भारत' घडवण्यास मदत करण्यासाठी शिक्षकांनी मुलांना तयार केले
पाहिजे, असं ते यावेळी म्हणाले.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून त्यांना उत्तम व्यक्ती म्हणून घडवलं पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं.
****
राज्यात ठिकठिकाणी आज दहीहंडीचा सोहळा साजरा होत आहे.
विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी दहीहंड्या फोडण्यासाठी मोठ्या रकमांची बक्षिसं जाहीर
केली आहेत. काल श्रावण कृष्ण अष्टमी, अर्थात 'जन्माष्टमी' मोठ्या उत्साहात साजरी झाली. ठिकठिकाणच्या
कृष्ण मंदिरांमध्ये कृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा झाला.
****
आजच्या दहीहंडी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या
वतीने उत्सवादरम्यान रूग्णालयांना सज्ज राहण्यासाठी विशेष निर्देश दिले आहेत, तसंच
दुर्घटना घडल्यास जखमी गोविंदांवर मोफत उपचार करण्याचे निर्देशही अतिरिक्त महानगरपालिका
आयुक्त प्राजक्ता वर्मा - लवंगारे यांनी दिले आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात आज अनेक ठिकाणी दहिहंडीचं आयोजन
करण्यात आलं आहे. या ठिकाणी गोविंदा पथकं आणि नागरिकांची होणारी संभाव्य मोठी गर्दी
लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी सायंकाळी चार ते रात्री १० वाजेपर्यंत शहरातील प्रमुख
मार्गांवरील वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन सहायक पोलिस आयुक्त सुभाष
भुजंग यांनी केलं आहे.
****
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं
ओझं कमी करून शिक्षण प्रक्रिया अधिक आनंददायी, सुलभ आणि कृतीप्रधान करण्यासाठी केंद्र शासनाच्या २०२०
च्या ‘स्कूल बॅग’ योजनेची सर्व प्रकारच्या शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करावी असे
निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन त्यांच्या
शारीरिक वजनाच्या साधारणतः १० टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही, याची काटेकोर दक्षता शाळांनी घ्यावी
अशी सूचना प्राथमिक विभाग शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी केली आहे. यासाठी शाळांनी
वर्गनिहाय 'दप्तर वेळापत्रक' तयार करावं आणि शाळेतच लॉकरसारख्या
सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात असंही त्यांनी सूचित केलं आहे.
****
आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा
आरोप करत नाशिक इथं गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेलं बेमुदत उपोषण आदिवासी विद्यार्थ्यांनी
काल मागे घेतलं. आंदोलनकर्त्यांनी नाशिकमधलं उपोषण सोडून मुंबईत आंदोलन करावं, यासाठी सक्रीय सहभागाचं आश्वासन नाशिक
दौऱ्यात कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी, कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनी दिल्यानंतर हे
आंदोलन मागे घेण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय
जनता पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याविरोधात एमपीएससी प्रकरणात माध्यमांवर कथित
बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अॅडव्होकेट अशोक बेंद्रे यांच्याविरोधात औसा तालुक्यातील
किल्लारी पोलिस ठाण्यात काल गुन्हा दाखल करण्यात आला. आमदार अभिमन्यु पवार यांचा या
प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना, त्यांच्याविरोधात समाजमाध्यमांवर ही वक्तव्यं करण्यात आल्याचा दावा तक्रारीत
करण्यात आला आहे.
****
परभणी जिल्ह्यात जून-जुलै महिन्यातील पावसाची स्थिती, पावसाचे दिवस, प्रत्यक्ष पडलेला पाऊस आणि ऑगस्ट
महिन्यात पावसाचा पूर्णत: पडलेला खंड याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून अहवाल तयार
करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी
संजयसिंह चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत
काल ते बोलत होते. शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक माहिती संकलित करून
हा अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात येईल, असं जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संगितलं. सध्या खरिप पिकं
वाचवण्यास प्राधान्य राहणार असल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
****
No comments:
Post a Comment