Wednesday, 9 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.09.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 09 September 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ सप्टेंबर २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे नवव्या राष्ट्रीय पोषण माह ला आज सुरुवात होत आहे. आपल्या अंगणवाड्या आपली जबाबदारी, ही राष्ट्रीय पोषण महिन्याची यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे. आहारातली विविधता, पुरेशी प्रथिनं, अंगणवाडी केंद्रांमधलं ताजं आणि गरम शिजवलेलं अन्न, सामुदायिक मालकी आणि उत्तरदायित्व, पोषण आणि बालवयातल्या विकासासाठी शिक्षण, तसंच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची दहा वर्ष या बाबींवर या उपक्रमात विशेष भर देण्यात येणार आहे. याच अनुषंगाने वाराणसीत तसंच महाराष्ट्रातल्या पालघर मध्ये विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

राज्य मंत्रिमंडळाने काल मंजुरी दिलेल्या प्रगती प्रकल्पामुळे आरोग्य सेवांचा विस्तार, गुणवत्तावाढ आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांना गती मिळणार आहे. पाच जिल्हा रुग्णालयांचं श्रेणीवर्धन होणार असल्यानं एक हजार ६०० खाटांची वाढ अपेक्षित असल्याचं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं. २०२६ ते २०३१ या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आशियाई विकास बँकेकडून ७० टक्के कर्ज मिळणार आहे. तर ३० टक्के राज्य शासनाचा हिस्सा राहणार आहे.

****

स्वातंत्र्याच्या लढ्यात कोवळ्या वयात आहुती देणाऱ्या नंदुरबारमधल्या बाल शहिदांना आज ८४ व्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. महात्मा गांधीजींच्या  चलेजाव च्या नाऱ्याने प्रेरीत होऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेणाऱ्या बाल हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्यासह त्यांचे मित्र लालदाद शहा, धनसुकलाल वाणी, शशीधर केतकर, घनश्यामदास शहा   यांच्यावर इंग्रजांनी बेछुट गोळीबार केला होता. या शहिदांना प्रशासनाच्या वतीने हुतात्मा चौकात पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी जेष्ठ नागरीक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****

दिवंगत पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सांगितिक प्रवासाचा आढावा घेणाऱ्या गीताचं काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झालं. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, संगीतकार ए. आर. रहमान यांच्यासह आशा भोसले यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. कृत्रिम बुद्धिमत्ता-एआयच्या सहाय्याने तयार करण्यात आलेलं हे गाणं ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलं आहे.

****

नाशिक जिल्ह्यातल्या येवला औद्योगिक क्षेत्रात ७६० कोटी रुपये गुंतवणुकीच्या माध्यमातून तीन हजार २०० रोजगार निर्मिती करणारा मेगा प्रोजेक्ट मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत उद्योग विभाग आणि सुखजीत स्टार्च अँड केमिकल्स यांच्यामध्ये या प्रकल्पाच्या उभारणीबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पात मका प्रक्रिया आणि त्यापासून विविध मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती होणार आहे.

****

अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबईतल्या जुहू इथल्या इस्कॉन मंदिरातल्या गोविंदा उपहारगृहासह एकूण ११ उपहारगृहांचा परवाना निलंबित केला आहे. त्यात इस्कॉन मंदिरातल्या गोविंदा उपहारगृहासह इतर दोन उपहारगृहांचा समावेश आहे. गेल्या आठवडाभरात अन्न आणि औषध प्रशाननानं केलेल्या तपासण्यांमध्ये या उपहारगृहांमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं गंभीर उल्लंघन आढळून आल्यानं ही कारवाई केली असल्याचं एफडीएच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. याशिवाय झेप्टोच्या मालाड आणि कळव्यातल्या केंद्रावरही एफडीएनं कारवाई केली आहे.

****

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ११ ते २७ सप्टेंबर या कालावधीत कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६, तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील कोकणाकडे जाणाऱ्या संबंधित मार्गांवरील पथकर नाक्यांवर ही टोलमाफी लागू राहणार आहे. तसंच अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांनाही टोलमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

****

गणपती आणि महालक्ष्मी उत्सवानिमित्त दक्षिण मध्य रेल्वे नांदेड-सावंतवाडी रोड-नांदेड ही विशेष रेल्वेगाडी चालवणार आहे. यामुळे मराठवाडा आणि कोकण हे दोन प्रदेश प्रथमच थेट रेल्वे सेवेने जोडले जाणार आहेत.  गणेशोत्सवानिमित्त नांदेड-हडपसर-नांदेड ही विशेष रेल्वेगाडीही चालवण्यात येणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत महामार्गालगतची व्यावसायिक अतिक्रमणं हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. धुळे-सोलापूर तसंच छत्रपती संभाजीनगर-पैठण मार्गालगत ही कारवाई करण्यात येत आहे. ही मोहीम पुढचे १५ दिवस सुरू राहणार असून, नागरिक तसंच व्यावसायिकांनी आपली अतिक्रमणं स्वतःहून काढून घेत सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...