Saturday, 26 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.09.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 September 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची सांगता;ढोल ताशांच्या गजरात गणरायाला निरोप

·      गणेशमूर्ती दान संकल्पनेला गणेशभक्तांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद

·      ऐतिहासिक माथाडी कायदा कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडून ग्वाही

·      एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी आणखी चार जणांना अटक

·      उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आज मराठवाड्यात दुष्काळ पाहणी दौरा

आणि

·      आशियायी क्रीडा स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तुल नेमबाजीत भारताचा सुवर्णवेध

****

गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची काल सांगता झाली. सकाळच्या सत्रात घरगुती गणपतींना निरोप दिल्यानंतर दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ झाला. मुंबईत लालबागच्या राजासह, अनेक गणपतींच्या मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जन सोहळा अजूनही सुरू आहे.

पुण्यातही मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीपाठोपाठ इतर मंडळांच्या मिरवणुकांना प्रारंभ झाला. भाविकांनी ढोल ताशांच्या गजरात गणरायाला निरोप दिला.

मराठवाड्यातही विसर्जन सोहळा पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्साहात पार पडला. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून:

बाईट – प्रतिनिधी

‘‘छत्रपती संभाजीनगर इथं ग्रामदैवत संस्थान गणपतीपासून गणेश विसजर्नाची मिरवणूक काढण्यात आली. शहरातल्या पाच मोठ्या विसर्जन विहिरींवर सकाळपासून ढोल ताशांचा गजर आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आबालवृद्धांची गणरायाला निरोप देण्यासाठी गर्दी झाली होती. महापालिकेने शहरात ४७ ठिकाणी गणेश मूर्ती संकलन केंद्रं तसंच निर्माल्य संकलन केंद्र स्थापन केले होते, नागरिकांचा त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.

लातूर महानगरपालिकेनं शहरात १६ ठिकाणी संकलन केंद्रे उभारली होती महापालिकेच्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फुर्त्स्फुत प्रतिसाद दिला.

नांदेड इथं पारंपरिक वाद्याच्या घोषात श्री गणेश विसर्जन झालं. महापालिकेने शहरातील विविध भागात १७ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे आणि १० कृत्रिम तलाव तयार केले होते. त्याल्या चांगला प्रतिसाद मिळाला.

जालना इथं महापालिकेने शहरातल्या मोतीतलाव इथल्या कुंडात गणपती विसर्जनाची व्यवस्था केली होती. या ठिकाणी नागरिकांनी विसजर्जनासाठी मोठी गर्दी केली होती.’’

परभणी, हिंगोली, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातही गणेश विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला.

****

माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षण देणारा ऐतिहासिक माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपवला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. माथाडी चळवळीचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त वाशी इथं कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते. कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना सन्मानाचे जीवन मिळवून देण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचं,  मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाबद्दलचे अनेक निर्णय इतर दोन निवडणूक आयुक्तांच्या सहमतीशिवाय झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर, ही याचिका दाखल झाली आहे.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक गट ब मुख्य परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी आणखी चार आरोपींना अटक झाली आहे. आरोपींमध्ये दोन उमेदवारांचा समावेश आहे. साजिद सांडे आणि विजय किंगार अशी या दोन उमेदवारांची नावं आहेत. संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम या दोन अन्य आरोपींवर मध्यस्थी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण ११ जणांना अटक करण्यात आली आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवार सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करतील. हा या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा १३८ वा भाग असेल.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा २५ वर्षांचा प्रवास ‘जनसेवा से देशसेवा’ या मंत्राने प्रेरित असून, सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून २०४७ पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. याच उद्देशानं सरकारकडून जल जीवन मिशन राबवलं जात आहे. याबाबत आज जाणून घेऊ..

बाईट – जल जीवन मिशन

ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून जल जीवन मिशन राबविण्यात येतं. ‘हर घर जल’ मोहिमेच्या माध्यमातून ग्रामीण कुटुंबांचे जीवनमान सुधारण्यासह शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियानाच्या यशाविषयी सांगताना, यातील चार प्रमुख आधारस्तंभावर भर दिला. ते म्हणाले:

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

जनसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात यश मिळत आहे.’’

****

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातल्या टंचाईग्रस्त भागात प्रशासनानं ५०० हून जास्त विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. त्यातल्या ६७ विहिरीतून १४२ गावं आणि ९१ वाड्यांना २४६ टँकर्समार्फत पाणीपुरवठा सुरु केला आहे. इतर साडेतीनशे विहिरींमधून नळावाटे पाणीपुरवठा केला जात असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आज नांदेड, परभणी तसंच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्या लोहा तालुक्यात टंचाईसदृश परिस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर त्या परभणी जिल्ह्यातल्या टंचाईसदृश परिस्थितीच्या पाहणीसाठी त्या गंगाखेड तालुक्यातल्या मरडसगावकडे प्रयाण करतील. बीड जिल्ह्यात माजलगाव तसंच गेवराई तालुक्यातील गावांना भेट देत शेतकऱ्यांकडून पीक परिस्थिती आणि टंचाईसदृश स्थितीचा त्या आढावा घेणार आहेत.

****

बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी काल जिल्ह्यात पाटोदा, आष्टी आणि शिरूर कासार तालुक्यात पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. जॉन्सन यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेत आवश्यक उपाययोजनांबाबत प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राष्ट्रीय पोषण पंधरवड्या निमित्त धाराशिव जिल्ह्यात दोन हजार ४६ अंगणवाड्यांमध्ये सुमारे १३ हजारावर उपक्रम राबवले जात आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर:

बाईट – देविदास पाठक

****

लातूर जिल्ह्यातल्या विलास सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम काल पार पडला. या कारखान्यात गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये ५ लाख मेट्रीक टन गाळप झालं असून, गाळपास आलेल्या उसाला प्रति टन ३१३१ रुपये प्रमाणे ऊस बिल अदा करण्यात आलं आहे. यंदाचा हंगाम वेळेवर सुरू करण्यासाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

****

लातूर जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येत आहे. सन दोन हजार सव्वीस हे वर्ष महिला शेतकरी सशक्तीकरण वर्ष म्हणून घोषित करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर ‘महिला शेतकरी कायदा दोन हजार सव्वीस’ची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

****

जपानमध्ये सुरू असलेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीनं काल सुवर्णपदकावर नाव कोरलं. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स स्पर्धेत रुद्रांक्ष पाटील आणि संघाने रौप्यपदकाची कमाई केली. गुलबीरसिंह याने १० हजार मीटर स्पर्धेत, सावन बारवाल याने मॅराथॉन स्पर्धेत तर ४०० मीटर रिले प्रकारात भारतीय संघाने रौप्यपदक मिळवलं. बारानिका एलंगोवन हिनं महिलांच्या पोल व्हॉल्टमध्ये तर टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिव्या चितळे या जोडीनं कांस्यपदक पटकावलं.

महिला कबड्डी संघानं नेपाळवर ४८-२४ असा विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. पुरुष संघानंही थायलंडवर ६६-२८ अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत तनिषा क्रस्टो आणि ध्रुव कपिला या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

या स्पर्धेत २ सुवर्ण, १० रौप्य आणि १२ कांस्यपदकांसह भारतानं आतापर्यंत २४ पदकं पटकावली आहेत, पदकतालिकेत भारत १२ व्या स्थानावर आहे.

****

हवामान

विदर्भात अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली तसंच नांदेड जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...