Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 20 September
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २० सप्टेंबर
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
जपानमध्ये काल प्रारंभ झालेल्या २० व्या आशियाई
क्रीडास्पर्धेत आज दुसऱ्या दिवशी भारतानं पदकं जिंकण्यास सुरुवात केली आहे. भारतीय
संघानं आज नेमबाजीचं रौप्य पदक पटकावलं. भारतीय महिला नेमबाजी संघानं दहा मीटर एयर
रायफलमध्ये हे पदक जिंकण्याची किमया साधली. इलावेनिल वलारिवन, सोनम मसकर आणि विदारसा विनोद या तिघींनी मिळून भारताला स्पर्धेतील पहिलं पदक
मिळवून दिलं. भारतीय संघानं एकूण १८९८ गुणांची नोंद करत चीननंतर दुसरं स्थान
मिळवलं. आशीयाई क्रीडा स्पर्धेत आज महिला क्रिकेट संघाचा बांग्लादेशबरोबर सामना
होणार आहे.
****
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ
महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येत्या ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या धर्मध्वजारोहण
सोहळ्याची पूर्वतयारी सूक्ष्म नियोजनातून करण्याचे आदेश राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन, कुंभमेळा तथा नाशिक
जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा
प्राधिकरणाच्या कार्यालयात आज दुपारी ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीबाबत आयोजित
आढावा बैठकीत ते बोलत होते.
****
उत्तर प्रदेशात
वाराणसीच्या रामनगर पोलिस स्थानक परसरात झालेल्या चकमकीत प्रतिबंधित नक्षलवादी
संघटना तृतीय प्रस्तुती समितीचा म्होरक्या बृजेश गंझू उर्फ गोपाल सिंह भोक्ता
मारला गेला आहे. त्याच्याविरुद्धच्या कारवाईसाठी ३० लाख रुपयांचं बक्षीस जाहीर
होतं. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकानं ही कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली
आहे.
****
लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील आंबेवाडी या छोट्याशा
गावानं गणेशोत्सवाला विधायक रुप कसं देता येते याचा चांगला पायंडा घालून दिला आहे.
सांस्कृतिक- सामाजिक उपक्रम राबवत इथल्या
नवयुवक गणेश मंडळांनं विधायकतेची वाट घालून दिली आहे. प्रसिद्ध कलावंत -
साहित्यिक धनंजय गुडसरकर यांच्या हॅलो मी
श्याम बोलतोय एकपात्री नाट्याचा शंभरावा
प्रयोग या मंडळातर्फे आयोजित करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार विलास बडे यांच्या
व्याख्यानाचे आयोजन ही मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. याचसोबत टाळ मृदंगाच्या जयघोषात बाप्पाची विसर्जन ही
आगळीवेगळी परंपरा या गणेश मंडळाने निर्माण केली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा गणेश महासंघ उत्सव समितीतर्फे
आज कुस्त्यांची दंगल घेण्यात येत आहे. शहरात, जिल्हा
परिषद मैदानावर दुपारी एक वाजेपासून कुस्त्या रंगणार आहेत. या स्पर्धेत जिल्ह्यातील
विविध कुस्त्यांच्या आखाड्यातल्या पैलवानांचा सहभाग असेल, असं
संयोजकांनी कळवलं आहे.
****
मुंबईत आज पहाटे अती वेगात असलेल्या मोटारीला झालेल्या
अपघातात तीन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. मुंबईच्या किनारीमार्गावर लोटस
जेट्टी परिसरात घडलेल्या या दुर्घटनेत १७
ते २१ वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. गंभीर जखमी युवकावर उपचार सुरु असून त्याची
प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
****
मुंबईमध्ये आज भल्या पहाटे विद्युत प्रवाहाच्या धक्क्यामुळं
दोघांचा मृत्यू झाला असून चौघं जखमी झाले आहेत. दत्तराम लाड मार्ग, महागणपती उत्सव मंडळ, काळा चौकी इथं उभारण्यात
आलेल्या तात्पुरत्या पाणपोयीमध्ये विद्युत प्रवाह उतरल्यामुळं ही दूर्घटना घडली.
यातल्या जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती
स्थीर असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
****
मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांसाठी २२ सप्टेंबरपर्यंत
पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार या
काळात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी वादळी, काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
अकोला जिल्ह्यात गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांची
संख्या मोठी असली तरी गावागावांत सामूहिक गणेशोत्सवाची संकल्पना रुजताना दिसत आहे.
यंदा जिल्ह्यात तब्बल ४ हजारांवर गणपतींची स्थापना झाली. त्यापैकी ५४५ ठिकाणी
सार्वजनिक गणपती, तर ४२१ ठिकाणी 'एक
गाव,
एक गणपती' उपक्रम
राबवण्यात येत आहे. आमच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार अनेक मंडळांमध्ये
सजावट,
रोषणाई, देखावे आणि ध्वनिव्यवस्थेवर
होणारी स्पर्धात्मक खर्चाची प्रवृत्ती कमी करण्यास या उपक्रमाची मदत होत आहे.
****
No comments:
Post a Comment