Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 14 September
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १४ सप्टेंबर
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
दहा दिवसीय गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. राज्यासह
छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हाभरात गणेश चतुर्थी निमित्त बाजारपेठा गजबजल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर इथं विविध भागांमध्ये गणेश मूर्तींसह पूजा साहित्य आणि मखर
सजावटीची विक्री केंद्र सजली आहेत. यावेळी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती, आणि इतर साहित्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. पोलिस
दलाकडून गणेशोत्सवाच्या काळात चोख बंदोबस्त ठेवला जात असून, शहराच्या विविध भागातून पथसंचलन करण्यात येत आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी नागरिकांना आजपासून सुरू होत असलेल्या गणपती उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या
आहेत. राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारा हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात नवी ऊर्जा
आणि उत्साह देवो, असे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात
म्हटले आहे. श्री गणेशाच्या आशीर्वादाने आपणा सर्वांना यश मिळेल, आणि देशाची प्रगती अविरत सुरू रहावी, असे पंतप्रधान मोदी
यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
****
आज आणि उद्या १५
सप्टेंबर रोजी हिंदी दिवस २०२६ निमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा
विभागातर्फे नवी मुंबईतल्या वाशी इथल्या सिडको प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन केंद्रात
सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनाचं
उद्घाटन आज दुपारी १२ वाजता केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्या उपस्थित होणार आहेत. हिंदीचा प्रसार करण्याबरोबरच सर्व भारतीय भाषांमध्ये परस्पर
सन्मान,
सहकार्य आणि सहभागाची भावना मजबूत करणं हा या संमेलनाचा
प्रमुख उद्देश असल्याचं राजभाषा विभागाच्या सचिव अंशुली शर्मा यांनी मुंबईत
पत्रकार परिषदेत सांगितलं. दरम्यान, अमित शहा यांनी आज
देशवासियांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या
आदेशानुसार काल जिल्हाभरात पिकांच्या सद्यस्थितीची पाहणी करण्यात आली. यावेळी बीड
तालुक्यात तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल आणि कृषी
विभागाच्या पथकांनी शेतांमध्ये जाऊन पीक परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाचा खंड, त्याचा पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम, अपेक्षित
उत्पन्नातील घट आणि पाणीपातळीची स्थिती याची यावेळी नोंद करण्यात आली. केज, आष्टी,
बीड, अंबाजोगाई आणि माजलगाव
तालुक्यांतील विविध गावांत पाहणी आणि पंचनामे करण्यात आले. या संकलित माहितीचा
अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यातही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काल
लोहा तालुक्यात सोनखेड इथं सोनखेड-कलंबर रस्त्यालगतच्या शेतशिवारात सोयाबीन आणि
कापूस पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष
संवाद साधून पिकांची स्थिती आणि नुकसानीची माहिती जाणून घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी
पावसाअभावी पिकांचे मातेरे झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.
****
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन - एसटी महामंडळामार्फत
प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी, दर्जेदार आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा देण्याच्या उद्देशानं बस
ताफ्याच्या विस्तारासोबतच आधुनिकीकरणाला वेग दिला असल्याचं परिवहन मंत्री तथा एसटी
महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. यासाठी पाच हजार ‘लालपरी’
बसेसच्या खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं.
****
बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी काल शिरूर कासार
तालुक्यातील रायमोहा इथं तलाठी मंडळ अधिकारी कार्यालयाची पाहणी केली. यावेळी
कार्यालयातील दप्तर आणि अभिलेखांची तपासणी करून महसूल विषयक कामकाजाचा आढावा
घेण्यात आला. यावेळी नागरिकांची महसूल विषयक कामं गतीनं, वेळेत आणि कार्यक्षमतेने पूर्ण करण्याच्या सूचना
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या.
यावेळी त्यांनी सध्या सुरू असलेल्या पीक नुकसानीच्या पाहणी कामाचाही आढावा घेतला.
****
येत्या दोन दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर कोकण, आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही
ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, हवामान विभागानं व्यक्त
केली आहे. दरम्यान काल राज्यात काल मुंबई, नाशिकसह
अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी. पी.
राधाकृष्णन यांनी महिला टी-२० आशिया कप चॅम्पियनशिप २०२६ जिंकल्याबद्दल भारतीय
संघाच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले आहे. एका सामाजिक प्रसार माध्यमावरील
संदेशात राष्ट्रपती म्हणाल्या की, खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत
उत्कृष्ट कामगिरी केली. संघाने सर्व सामने जिंकून देशाला गौरव मिळवून दिला.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, या खेळाडू देशातील
तरुणांसाठी प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी विश्वास व्यक्त केला की,हा संघ यश आणि उत्कृष्टतेची अशी अनेक प्रेरणादायी प्रकरणे लिहील. याप्रसंगी
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, संघाची
संपूर्ण स्पर्धेतील अजिंक्य मोहीम, विलक्षण सांघिक कामगिरी आणि
अढळ निर्धाराने देशाला प्रचंड अभिमान मिळवून दिला आहे.
****
भारतीय तिरंदाज धीरज बोम्मादेवरा ने जागतिक तीरंदाजी
स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. काल मेक्सिकोमध्ये झालेल्या अंतिम
फेरीत धीरजने 'शूट-ऑफ'मध्ये जपानच्या नाकानिशी जुन्या याचा ६-५ अशा फरकाने पराभव केला.
****
No comments:
Post a Comment