Sunday, 20 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.09.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 20 September 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० सप्टेंबर २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      हवामान बदलाच्या परिणामांना सामोरं जाण्यासाठी ठोस हवामान कृती आवश्यक - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन

·      समृद्धी महामार्गामुळं अविकसित भागांमध्ये उद्योग आणि विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती सुरू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·      राज्यपरिवहन महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक २०० बसगाड्या सामील होणार- परिवहनमंत्री सरनाईक यांची माहिती

आणि

·      आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी जिंकली दोन रौप्य पदकं, इलावेनिल वलारिवनची सुरेख कामगिरी

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हवामान बदलाच्या परिणामांना सामोरं जाण्यासाठी ठोस हवामान कृती आवश्यक असल्याचं प्रतिपादन केलं आहे. नवी दिल्ली इथं ‘पर्यावरण आणि हवामान गतिशीलतेचं भविष्य’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्राला त्या आज संबोधित करत होत्या. अलीकडच्या काळात नैसर्गिक आपत्ती आणि हवामानातील बदलांमुळं हवामानविषयक धोके गंभीर झाले आहेत, असं राष्ट्रपतींनी सांगितलं. जैवविविधतेचा ऱ्हास, पाण्याची टंचाई आणि जमिनीची धूप ही हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या असमतोलाची उदाहरणं असल्याचं त्यांनी नमूद केलं. या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर सर्व संबंधित घटकांमध्ये सक्रिय सहकार्य वाढवण्याचं आवाहन त्यांनी केलं. पाण्याची टंचाई असलेल्या भागांमध्ये शेततळी स्थानिक समुदायासाठी उपयुक्त ठरू शकतात, असंही राष्ट्रपतींनी सांगितलं.पर्यावरणाशी संबंधित कायदेशीर बाबींमध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं नमुद करुन, नद्या, हवेची गुणवत्ता आणि कचरा व्यवस्थापनासंदर्भात न्यायाधिकरणानं प्रभावी कार्यवाहीची चौकट विकसित केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

नागपूर हे येत्या दहा वर्षांत देशातील सोलर इकोसिस्टीमचं प्रमुख केंद्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील अवादा समूहाला भेट देऊन त्यांनी आज सोलर मॉडेलच्या निर्मितीची पाहणी केली आणि उद्योजकांशी संवाद साधला. अवादा समूहाच्या प्रकल्पाच्या विस्तारासाठी २५० एकर जागा उपलब्ध करून देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. उद्योगांना स्वस्त वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, २०२९ पर्यंत स्वस्त वीज मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. समृद्धी महामार्गामुळं राज्यातल्या मागास भागांमध्ये उद्योग आणि विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत, असं त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले -

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली नवीन स्टील सिटी म्हणून विकसित होत असून, तीथं मोठ्या गुंतवणुकीला चालना मिळत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

राज्यपरिवहन महामंडळाच्या ताफ्यात व्होल्वो कंपनीच्या अत्याधुनिक आणि वातानुकूलित २०० बसगाड्या सामील होणार आहेत. यातल्या ३० गाड्या शयनयान पद्धतीच्या असतील. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. अडीचशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासाकरता या गाड्या उपलब्ध होणार असून डिजिटल आरक्षण सुविधाही मिळेल. या गाड्यांमधे प्रवासी सेवेबरोबरच आधुनिक आतिथ्यसेवाही खासगी संस्थांच्या मदतीनं पुरवण्यात येणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.

****

विकसित भारतासाठी नशामुक्त युवा या अभियानाअंतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात युवक मोठ्या संख्येनं सहभागी होत असून देशभर एक हजार ६७ ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे. युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयातर्फे या अंतर्गत युवकांना नशामुक्तीची शपथ दिली जाईल. तसंच स्वाक्षरी अभियान, पथनाट्यं, घोषवाक्य लेखन आणि युवकांच्या नेतृत्वाखाली चर्चासत्रांचं आयोजनही करण्यात आलं आहे.

****

इलावेनिल वलारिवनच्या उत्कृष्ट कामगिरीमुळं भारतानं जपानमध्ये सुरू आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये आज दुसऱ्या दिवशी नेमबाजीतली दोन रौप्य पदकं जिंकली.

इलावेनिलनं महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात वैयक्तिक रौप्य पदक जिंकण्यापुर्वी आजच्याच दिवशी सांघिक रौप्यपदकही पटकावलं. २०२५ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या इलावेनिलनं अंतिम फेरीत २५२ पूर्णांक ४ गुण मिळवून दुसरं स्थान पटकावलं.त्यापूर्वी, आशियाई क्रीडा स्पर्धेतलं भारताचं पहिलं पदक निश्चित करताना इलावेनिल, सोनम मसकर आणि विदर्सा विनोद यांनी महिलांच्या दहा मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकलं होतं. हॉकीमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघानं मोठे विजय नोंदवले.

पुरुष हॉकी संघानं इंडोनेशियाचा १३-१ असा धुव्वा उडवला आणि अ गटातील आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. या विजयात दिलप्रीत सिंगनं अप्रतिम खेळ करत चार गोल केले तर अभिषेक, राजिंदर सिंग, मनदीप सिंग, कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि जुगराज सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. आता मंगळवारी भारतीय संघाचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. भारतीय महिला हॉकी संघानं ब गटातल्या आपल्या पहिल्या सामन्यात उझबेकिस्तानचा १९-० असा एकतर्फी पराभव करत वर्चस्व गाजवलं. दीपिका सेहरावतनं आठ गोल केले तर इशिका चौधरीनं तीन गोल तर लालथांतलुअंगी आणि नेहा यांनी प्रत्येकी दोन गोल केले. भारतीय महिला संघाचा पुढचा सामना उद्या इंडोनेशियाविरुद्ध होईल. महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशाचा ११४ धावांनी मोठा पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत चार गडी गमावून १९५ धावा केल्या होत्या. यात शेफाली वर्मानं ४९ चेंडूत नाबाद शतक झळकावलं.

बॅडमिंटनमध्ये भारतानं महिला सांघिक गटात कझाकस्तानचा ३-० असा सहज पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अनुभवी बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, उन्नती हुड्डा आणि तन्वी शर्मा यांनी एकही गेम न गमावता लिलया विजयाची नोंद केली. त्यांचा पुढचा सामना यजमान जपान संघाशी होणार आहे. 'टेकबॉल' प्रकारात भारताचं आव्हान पदकाविना संपुष्टात आलं असून कांस्यपदकाच्या लढतीत भारताच्या मिश्र दुहेरी जोडीला व्हिएतनामविरुद्ध पराभव पत्करावा लागला.

****

भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण हवाई कसरत पथकानं उत्तर प्रदेशमधील मेरठच्या आकाशात काल आणि आज प्रथमच नेत्रदीपक आणि थरारक हवाई कसरतींचं प्रात्यक्षिक दिलं. दोन दिवसांत एक लाखाहून अधिक नागरिकांनी याला उपस्थिती लावली. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी आज कसरतींची पाहणी केली. सूर्यकिरण पथकानं आपल्या ३० वर्षांच्या गौरवशाली प्रवासात, भारतासह परदेशात ८०० हून अधिक हवाई प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला आहे.

****

नांदेड जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरच्या कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं समाजातील शेवटच्या घटकापर्यंत, विविध शासकीय सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज दिली. या संदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोत होते. ‘सेवा परमोधर्म’ या संकल्पनेनुसार नागरिकांना अधिक गतिमान, पारदर्शक आणि प्रभावी सेवा देण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं जिल्हाधिकारी कर्डिले यांनी यावेळी सांगितलं.

****

शासकीय योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या वतीनं राज्यभर गणेशोत्सवानिमित्त ‘लोकसंवाद’ अभियान सुरू आहे. या अंतर्गत मुंबईतल्या गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून नागरिकांना भेट देण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्तानं नागरिक मोठ्या संख्येनं एकत्र येत असल्यानं त्याच ठिकाणी शासकीय योजनांची माहिती थेट पोहोचवण्याचा हा उपक्रम नागरिकांसाठी उपयुक्त ठरत असून, त्यांच्या प्रश्नांना संबंधित अधिकाऱ्यांकडून तत्काळ मार्गदर्शन मिळत असल्यानं ‘लोकसंवाद’ उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

****

अंबाजोगाई तालुक्यातल्या दगडवाडी इथं आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. पावसाअभावी पिकांचं मोठं नुकसान झालं असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. शासनानं तातडीनं दुष्काळ जाहीर करून, पिकांचे पंचनामे करावेत, शेतमजूर कुटुंबांना २५ हजार रुपये मदत द्यावी. तसंच पाणीटंचाई आणि चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. पवार यांनी आज मराठवाडा दुष्काळ पाहणी दौऱ्यात धाराशीव, बीड, लातूर जिल्ह्यांची पाहणी केली. उद्या ते नांदेड, हिंगोली, परभणी जिल्हांचा दौरा करून दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार असल्याचं पक्षातर्फे कळवण्यात आलं आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...