Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 16 September
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.
****
· दुष्काळी स्थितीत राज्य सरकार पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याची
मुख्यमंत्र्यांची ग्वाही
· साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन अर्थात सवलतीच्या दरात कर्ज देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा
निर्णय
· सणाच्या काळात नागरिकांना त्रास होईल अशी भूमिका न घेण्याचं सरकारचं मनोज जरांगे
यांना आवाहन; मोजक्या सहकार्यांसह जरांगे यांचं मुंबईकडे प्रयाण
आणि
· अफगाणिस्तान विरुद्ध दुसर्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात सात गडी राखून विजय मिळवत
भारताचा मालिका विजय
****
दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर
राज्य सरकार पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी दिली आहे. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
अवर्षणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचं सर्वेक्षण लवकरच सुरू करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. ते म्हणाले...
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रायगड जिल्ह्यात दिघी इथं
देशातलं सर्वात मोठं जहाजबांधणी केंद्र उभं राहणार असून, यासाठी एकूण २७ हजार कोटी
रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी
ही माहिती दिली. या करारातून दिघी इथं युद्धनौकांसह, व्यापारी आणि व्यावसायिक जहाजांच्या
निर्मितीचं काम सुरू होणार असून, जहाज बांधणी, जहाज तोडणी, जहाज दुरुस्ती
आणि पुनर्वापर अशी सर्व कामंही याठिकाणी होणार असून, या प्रकल्पातून १५ हजार प्रत्यक्ष
आणि ७५ हजार अप्रत्यक्ष, रोजगार निर्माण होणार आहेत.
**
सहकारी साखर कारखान्यांची
२०२५-२६ च्या गाळप हंगामातली एफ आर पी ची थकबाकी देण्यासाठी आणि पुढच्या वर्षीच्या
गाळप हंगामासाठी, या कारखान्यांना सॉफ्ट लोन अर्थात सवलतीच्या दरात कर्ज
देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी सातशे अडोतीस
कोटी रुपयांच्या तरतुदीलाही मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकरी
आणि साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्य शासनाची पंचवीस प्रमुख
धोरणं आणि पंचवीस प्रमुख योजनांचं विश्लेषण आणि मूल्यांकन करण्यासाठी "महाराष्ट्र
तांत्रिक सहाय्यता कक्ष- अर्थात महा-टॅक" स्थापन करण्याला मंत्रिमंडळानं मान्यता
दिली. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती तसंच औद्योगिक नागरी अधिनियम, १९६५ मध्ये
सुधारणा करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली.
**
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी काल मंत्रालयात महसूल विभागाच्या 'महाखनिज दोन' या प्रणाली
आणि मोबाईल ॲपचं लोकार्पण केलं, तसंच राज्य महाखनिज नियंत्रण कक्षाचं उद्घाटन केलं. गौण
खनिज क्षेत्राचं सर्वेक्षण, वाहतुकीवर देखरेख आणि परवान्यांची डिजिटल पडताळणीसह अनियमितता
ओळखणं आणि महसुलातील तफावत आणि गळती कमी करण्यासाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.
****
मराठा आंदोलक मनोज जरांगे
यांनी सणाच्या काळात लोकांना कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीनं निर्णय घेणं अपेक्षित
असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. ते काल पत्रकारांशी बोलत होते. जरांगे यांनी केलेल्या
तेरा मागण्यांपैकी बारा मागण्या सरकारनं मान्य केल्या असून, राहिलेली
मागणी पूर्ण करण्यात असलेली कायदेशीर अडचण आणि न्यायालयाच्या विरोधात गेल्यास मराठा
समाजाचं संभाव्य नुकसान, याबाबत जरांगे यांना माहिती दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी
नमूद केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत बोलतांना, सरकार समाजाच्या
हिताची सकारात्मक भूमिका घेत असताना, आंदोलकांनी राजकीय भूमिका
घेऊ नये, असं म्हटलं आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासह
विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी इथून मोजक्या दहा सहकाऱ्यांसमवेत
काल उपोषणाच्या १८व्या दिवशी मुंबईकडे प्रयाण केलं. त्यांच्यासोबत दोन वाहनं आणि दोन
रुग्णवाहिका आहेत. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी त्यांच्या प्रकृतीची जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. राजेंद्र पाटील यांनी तपासणी करून त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा तसंच प्रवास
टाळण्याचा सल्ला दिला, मात्र जरांगे
यांनी त्यास संमती दिली नसल्याची माहिती, जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली
आहे.
****
राज्यभरात दीड दिवसाच्या गणपतींचं
काल भक्तिमय वातावरणात विसर्जन झालं. यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि
कोकणासह राज्यभरातल्या प्रमुख नद्या, नैसर्गिक तसंच कृत्रीम जलाशयात
विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
****
राज्यात १७ सप्टेंबर ते १७
ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे, याअंतर्गत
पात्र नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ तसंच आवश्यक सेवा थेट उपलब्ध करून देण्यात
येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातल्या आठही जिल्ह्यांत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी
करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली. या अभियानांतर्गत
प्रत्येक तालुक्यात सेवा सेतू शिबिर आयोजित करून आपले सरकार सेवा केंद्रामार्फत अर्ज
प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
परभणी जिल्ह्यात या अभियानाची
प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी योग्य समन्वय ठेवून उपक्रमांचं काटेकोर
नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले. या अभियानाच्या
माध्यमातून नागरिकांनी शासकीय योजना आणि सेवांचा अवश्य लाभ घ्यावा, असं आवाहनही
त्यांनी केलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या
पर्जन्यमानाच्या स्थितीत अपेक्षित बदल नसल्यानं, कृषी, महसूल, ग्रामविकास
तसंच अन्य सर्व यंत्रणांनी पर्यन्यमान आणि पीक स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश
जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहेत. यासंदर्भात काल झालेल्या आढावा बैठकीत
ते बोलत होते. गौडा यांनी काल गंगापूर तालुक्यात खडकनारळा इथं जाऊन प्रत्यक्ष पिकांची
पाहणीही केली.
****
जालना जिल्ह्यात खरीप हंगामातल्या
पिकांच्या सद्य:स्थितीचा संकलित प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाकडून शासनास सादर करण्यात
आला आहे. पावसाची अनिश्चितता आणि पावसाच्या खंडाचा पिकांवर परिणाम झाला असून, १४ सप्टेंबरअखेर
जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ८१ टक्के पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची सद्य:स्थिती
आणि उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार पुढील पीक व्यवस्थापनाचं
नियोजन करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र वितरणासाठी काल झालेल्या १५ विशेष मंडळस्तरीय शिबिरांमध्ये
एकूण ३१ अर्ज प्राप्त झाले. यामध्ये, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात
एक, पैठण तालुक्यात ११, वैजापूर तालुक्यात चार, गंगापूर तालुक्यात पाच आणि
खुलताबाद तालुक्यात १० अर्ज प्राप्त झाले आहेत.
****
जालना शहरातल्या शास्त्रीनगर
भागातला स्वस्त धान्य दुकानदार शैलेश कक्कड याला दोन हजार रुपये लाच घेताना काल लाचलुचपत
प्रतिबंधक विभागानं अटक केली. तक्रारदाराचं बंद असलेलं रेशनकार्ड सुरू करून त्यावर
धान्य देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण
टप्पा दोन अंतर्गत, येत्या १७ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता
ही सेवा २०२६’ अभियान राबवण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातल्या सर्व गावांमधल्या नागरिकांसह
शाळा-महाविद्यालयं, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट आणि विविध विभागांनी
यात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहन जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
डॉक्टर कृष्णकांत कनवारिया यांनी केलं. याशिवाय, येत्या एक ऑक्टोबरला ‘एक दिवस, एक तास, एक सोबत’
या संकल्पनेतून स्वच्छतेसाठी देशव्यापी श्रमदान करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं उमेद
स्वयं सहायता समूहातल्या महिलांनी गणेश मूर्तींच्या विक्रीतून सहा कोटी ३१ लाख ४३ हजार
रुपयांची उलाढाल केली. या महिलांनी जिल्हाभरात २५३ स्टॉल उभारले होते. या स्टॉलमधून
एक लाख १७ हजार १७० गणेश मूर्तीची विक्री झाल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून
देण्यात आली आहे.
****
उद्या १७ तारखेला मराठवाडा
मुक्तिसंग्राम दिनी, नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड तालुक्यातल्या बारड इथं प्रशासनातर्फे
विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामात बारड इथल्या तेहतीस
स्वातंत्र्यसैनिकांनी सहभाग घेऊन मोलाचं योगदान दिलं होतं, या शूर स्वातंत्र्यसैनिकांचं
स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम
होणार आहे.
****
अफगाणिस्तान विरुद्धच्या दुसर्या
टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताने सात गडी राखून विजय मिळवला. काल दिल्लीत झालेल्या
या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत १६० धावांचं लक्ष्य दिलं. भारतीय संघाने
१५व्या षटकात तीन गडी गमावत १६३ धावा केल्या. या विजयासोबतच भारतीय संघाने तीन सामन्यांच्या
मालिकेत दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
No comments:
Post a Comment