Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 14
September 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ सप्टेंबर २०२६ दुपारी १.०० वा.
****
आजपासून १० दिवसांच्या गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात
झाली आहे. सकाळपासूनच नागरिकांनी आपापल्या घरी मनोभावे पूजा करून श्री गणरायाची स्थापना
केली आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाने नागरिकांचे चेहरे आनंदाने प्रफुल्लित झाले आहेत.
बालगोपालांचा तर बाप्पा हा सर्वात आवडता देव. त्यांचा हा लाडका गणपती बाप्पा घरी आल्याने
लहान मुलांच्या आनंदाला पारावर राहिलेला नाही. सार्वजनिक गणेश मंडळांनीही बाप्पाच्या
स्थापनेची तयारी सकाळपासूनच सुरू केली आहे. सायंकाळपर्यंत सर्व सार्वजनिक गणेश मंडळांमध्येही
गणपती मूर्तीची विधिवत स्थापना केली आहे. गणेशोत्सवामुळे बाजारामध्येही चैतन्याचे वातावरण
आहे. कालपासूनच गणेशाच्या पूजेसाठी, स्वागतासाठी सजावटीचे साहित्य, फुले आणि मोदक, मिठाई खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. आजही बाजारात सर्वत्र
मोठी गर्दी दिसून येत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने गर्दीच्या
ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
****
गणेश चतुर्थीनिमित्त आज भारतीय शेअर बाजार बंद राहणार
आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी आज व्यवहारांसाठी
बंद राहतील. दरम्यान, मल्टी कमोडिटी एक्सचेंज
ऑफ इंडियानुसार, कमोडिटी सेगमेंटमधील सकाळचा व्यवहार
बंद राहील.
****
बीड जिल्ह्यातील २८ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत यंदा संभाव्य
१ हजार ७३८ गणेशमूर्तींची स्थापना होणार आहे. मागील वर्षी ही संख्या १ हजार ५७७ होती.
यंदा अंदाजे २९२ ठिकाणी ‘एक गाव, एक गणपती’ची स्थापना होण्याची शक्यता आहे. पोलीस अधीक्षक नवनीत
काँवत यांनी ही माहिती दिली. बंदोबस्तासाठी बीड, माजलगाव आणि अंबाजोगाई इथं प्रत्येकी एक एसआरपीएफ प्लाटून, तर आष्टी आणि परळी इथं प्रत्येकी एक आरसीपी प्लाटून तैनात
करण्यात आली आहे. याशिवाय ७४६ पुरुष आणि १२० महिला होमगार्ड उपलब्ध करून देण्यात आले
आहेत. आतापर्यंत गणेश मंडळांच्या ऑनलाइन प्रक्रियेत १ हजार ३४ अर्ज प्राप्त झाले असून, यापैकी ६२५ अर्ज मंजूर झाले आहेत.
****
हिंदी दिवस २०२६ निमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा
विभागातर्फे नवी मुंबईतल्या वाशी इथल्या सिडको प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन केंद्रात सहाव्या
अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज आणि उद्या १५ सप्टेंबर रोजी
हा कार्यक्रम होत असून या संमेलनाचं उद्घाटन केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या
हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित होत आहे. हिंदीचा
प्रसार करण्याबरोबरच सर्व भारतीय भाषांमध्ये परस्पर सन्मान, सहकार्य आणि सहभागाची भावना मजबूत करणं हा या संमेलनाचा
प्रमुख उद्देश आहे. दरम्यान, अमित शहा यांनी आज देशवासियांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या
आहेत.
****
ठाणे इथं राष्ट्रीय लोक अदालतीत सात हजार खटले निकाली
काढण्यात आले. जवळपास ७ हजार खटले निकाली काढण्यात आले, यातून १ कोटी ५७ लाख ३३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
नियमांचं उल्लंघन करुन ई-चलनाचा दंड थकवणाऱ्या वाहनचालकांना या अदालतीच्या माध्यमातून
दिलासा मिळाल्याची माहिती वाहतूक शाखेनं दिली.
****
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या अनुषंगाने मनोज जरांगे
पाटील उद्या १५ सप्टेंबर रोजी मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. या प्रवासादरम्यान बीड
शहरातून त्यांचा ताफा जाणार असून, छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास
पुष्पवृष्टी करून ते समाजबांधवांना संबोधित करतील. दरम्यान, आयोजकांनी शांतता आणि वाहतूक
व्यवस्थेसाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.
****
बीड जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या
निर्देशानुसार शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यातील १ हजार ८२० प्रकरणे
तडजोडीनं निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमध्ये एकूण २१ कोटी ३६ लाख ९४ हजार रुपयांची
तडजोड करण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र
न्यायाधीश दिनेश सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतीचं आयोजन करण्यात आलं
होतं. प्रभारी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस. आर. शिंदे यांच्या हस्ते या लोकअदालतीचं
उद्घाटन झालं. यात दाखलपूर्व २४ हजार ३०३ प्रकरणांपैकी ४२३ प्रकरणं निकाली काढण्यात
आली. विशेष मोहिमेतील ५४७, तर न्यायालयात प्रलंबित १३ हजार ४ प्रकरणांपैकी ८५० प्रकरणांचा
यावेळी निपटारा करण्यात आला.
****
गृहमंत्री अमित शहा यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकिय प्रवासाला २५ वर्ष पूर्ण
झाल्यानिमित्त राष्ट्रव्यापी ‘सेवा संकल्प अभियाना’ची घोषणा केली आहे. १७ सप्टेंबर ते १७ आँक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या अभियानात
२०४७ पर्यंत ‘विकसित भारत’साठी लोकसहभागातून संकल्प करण्यात येणार आहे.शहा आज मुंबईत
वार्ताहर परिषदेत बोलत होते.या अभियानात भाजपा, एनडीए चे मित्र पक्ष, स्वयंसेवी संगठना आणि देशातील नागरिक सहभागी होणार असुन ते प्रत्येक
राज्य, केंद्र शासित प्रदेश, जिल्हा, लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांपर्यंत पोहचवणार असल्याचं ते
म्हणाले. या अभियानात ‘सेवा दिवस’ अंतर्गत रक्तदान, ‘मेरे सपनों का भारत’ विषयावर चित्रकला, भाषण स्पर्धा, अंगणवाडी आणि आशा कार्यकर्तींचा सम्मान तसंच सरकारी योजनेच्या
लाभार्थांच्या यशस्वीतेचं प्रदर्शन करण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment