Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 September 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ सप्टेंबर २०२६
सायंकाळी ६.१०
****
· येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करणार-मुख्यमंत्र्यांची
घोषणा
· दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा
निर्णय
· बँक कर्मचाऱ्यांनी चर्चेच्या माध्यमातून समस्या सोडवण्याचं सरकारकडून
आवाहन
· राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान-अभिनेते अनंत नाग यांचा दादासाहेब
फाळके पुरस्काराने गौरव
आणि
· आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक
****
राज्य सरकारकडे आलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी
दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी केली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी
ही माहिती दिली. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासंदर्भात उद्यापासून पंचनामे सुरू
करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ
बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात वेळोवेळी घ्याव्या लागणाऱ्या निर्णयासाठी
या मंत्रिमंडळ उपसमितीला सर्वाधिकार देण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची
माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती असल्याचा प्राथमिक
अंदाज असून पाण्याअभावी पिकं बाधित झाली आहेत. याशिवाय पिण्याचं पाणी आणि चाऱ्याचं
नियोजन करावं लागणार आहे. याबाबतही ही मंत्रिमंडळ उपसमिती काम करेल. दरम्यान, कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करून, वर्ष
२००९ चा मंजूर आकृतीबंध तात्पुरता कायम ठेवण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाने घेतला
आहे.
****
पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर
बीड जिल्ह्यात तातडीनं दुष्काळ जाहीर करावा, अशी
मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. धस यांनी आज बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबईत भेट घेऊन या मागणीचं निवेदन त्यांना दिलं.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई, तर
पशुपालकांना चारा आणि पाणी उपलब्ध करून द्यावं, असं
या निवेदनात म्हटलं आहे.
****
संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामं
हाती घ्यावीत,
असे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित
अधिकाऱ्यांना दिले असून, सेवा संकल्प अभियानांतर्गत नांदेड
जिल्ह्यात जलतारा, सिमेंट नाला बांध, विहिरी आणि बोअर वेल्सचं पुनर्भरण, ही कामं मोठ्या प्रमाणावर
सुरू करण्यात येत आहेत. शेतकरी आणि ग्रामस्थांनी आपल्या गावातल्या तसंच शेतजमिनीवरच्या
आवश्यक जलसंधारणाच्या कामांचे प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायतीकडे सादर करावेत, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
प्रसिद्ध साहित्यिक पु.ल. देशपांडे यांचा साहित्यिक आणि सांस्कृतिक
वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं राज्य शासनानं पु.लंच्या संग्रहित
पत्रांचं पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष
शेलार यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला असून, या
पुस्तकाच्या प्रकाशनासाठी दहा लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात
आली आहे.
****
राज्य विधान परिषदेच्या शिक्षक तसंच पदवीधर मतदारसंघाच्या पाच
जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद, पुणे
आणि नागपूर या तीन विभागीय पदवीधर मतदारसंघांसह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी
येत्या २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या कालावधीत मतदान होईल. तर, २७ ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. या पाच जागांसाठी ६ ऑक्टोबरपासून
उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
****
बँक कर्मचाऱ्यांनी संप न करता चर्चेच्या माध्यमातून समस्या सोडवण्याचं
आवाहन सरकारनं केलं आहे. बँक संघटनांनी येत्या २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान राष्ट्रव्यापी
संपाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हे आवाहन केलं आहे. आठवड्यातून पाच
दिवस कामकाज आणि परफॉर्मन्स आधारित प्रोत्साहन योजना परत घ्यावी, या दोन प्रमुख मागण्या बँक कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. विस्तृत चर्चेनंतर सरकारनं
परफॉर्मन्स आधारित प्रोत्साहन योजना तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचं अर्थ
मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
****
चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार
ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना आज प्रदान करण्यात आला. गुजरातमध्ये केवडिया इथं स्टॅच्यू
ऑफ युनिटी या सरदार पटेल यांच्या पुतळ्याच्या परिसरात आयोजित ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट
पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, अनंत नाग यांना, मानवस्त्र, सन्मानचिन्ह
आणि मानपत्र अशा स्वरुपातल्या या पुरस्काराने गौरवण्यात आलं. ‘श्रीकांत’ या हिंदी चित्रपटाला
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा रौप्य कमळ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामी गौतम हिला
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर कार्तिक आर्यन तसंच मामुटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराचं
रौप्यकमळ देऊन गौरवण्यात आलं. वीर सावरकर चित्रपटासाठी रणदीप हुडा यालाही राष्ट्रपतींच्या
हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्व विजेत्यांचं राष्ट्रपतींनी अभिनंदन केलं.
****
आशियायी क्रीडा स्पर्धेमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं
श्रीलंकेचा १४७ धावांनी पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. आज झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं
दिलेल्या २१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ सोळाव्या षटकात केवळ
६९ धावांमध्ये सर्वबाद झाला. या सामन्यात ७९ धावा करणारी भारताची स्मृती मंधाना ही, अकरा हजार धावा काढणारी जगातली पहिली महिला फलंदाज ठरली. तिने भारताच्याच मिताली
राजचा विक्रम मोडीत काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं अभिनंदन केलं
आहे.
दरम्यान, आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये
कबड्डीत आज भारतीय पुरुष संघानं दक्षिण कोरियाला ६३-३१ असं पराभूत केलं. टेबल टेनिसमध्ये
महिला संघानं थायलंड संघाचा पराभव करत उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जलतरणात १००
मीटर मेडले प्रकारात भारतीय पुरुष संघानं चौथं स्थान मिळवत अंतिम फेरीतलं स्थान निश्चित
केलं. तर बॅडमिंटनमध्ये भारतीय पुरुष संघाने यजमान संघाचा तीन शून्यने पराभव करत, उपांत्य फेरीत प्रवेश केला.
****
पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर राज्यात मुद्रांक शुल्क विभागाच्या
कार्यालयांचं आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात ६० कार्यालयांचं
आधुनिकीकरण करण्यात येईल. या कार्यालयांमधे शासकीय अधिकारी असतील, मात्र पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाच्या व्यवस्थेसाठी खासगी आस्थापनांचा सहभाग
घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
धाराशिवचा मानाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेलं श्री बाल हनुमान
गणेश मंडळ,
हे अवयवदान, देहदान, नेत्रदान,
अन्नदान यासाठी सातत्यानं जनजागृती आणि प्रयत्न करणारं मंडळ
आहे. यावर्षी या मंडळानं रक्तदान शिबिर घेतलं. या शिबिरात पंचेचाळीस युवक युवतींनी
रक्तदान केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाने मोठा खंड दिल्याने करपलेल्या
शेत पिकांची माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी पाहणी केली. वैजापूर तसंच
कन्नड तालुक्यांतील विविध गावांमध्ये प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन दानवे यांनी
पाहणी केली. यानंतर खंडाळा, शिऊर आणि कानडगाव इथं दानवे
यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली.
****
बीड जिल्ह्यात वडवणी इथे बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसाठी
आज आंदोलन करण्यात आलं. शहरातून निघालेल्या मोर्चाचं तहसील कार्यालय परिसरात ठिय्या
आंदोलनात रूपांतर झालं. या मागण्यांबाबत प्रशासनानं तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment