Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 19
September 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ सप्टेंबर २०२६ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून ५१ हजार तरुणांना नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात
आली. विविध सहकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेले हे तरुण आहेत. देशातल्या
विविध ४५ ठिकाणी २० वा रोजगार मेळावा आज आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामुळे विविध
विभाग आणि सरकारी संस्थांमध्ये नियुक्ती पत्रे मिळणाऱ्या तरुणांची एकूण संख्या १२ लाख
७५ हजारांवर पोहोचली आहे.
****
विकसनशील देशांना अनेकदा कार्बन
उत्सर्जनासाठी जबाबदार धरले जाते, जे पूर्णतः अयोग्य आहे. दरडोई कार्बन उत्सर्जनात भारताचे
योगदान जागतिक सरासरीच्या निम्म्याहूनही कमी आहे, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आज केले आहे. आज नवी दिल्लीत 'पर्यावरण आणि हवामान बदलाचे
भविष्य' या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी
ते बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत हा जी-२० मधील एकमेव
देश आहे ज्याने पॅरिस येथे झालेल्या कॉप-२१ शिखर परिषदेत दिलेली आश्वासने मुदतीपूर्वीच
यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. गेल्या बारा वर्षांत भारताने पर्यावरणाशी संबंधित प्रत्येक
क्षेत्रात असाधारण प्रगती केली आहे. भारत जगातील इतर देशांसोबत मिळून काम करत असून
आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, जागतिक जैवइंधन आघाडी, आंतरराष्ट्रीय बिग कॅट आघाडी
आणि मिशन लाईफ यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे नवे मानदंड
प्रस्थापित करत आहे. भारताचा मुख्य भर हा अक्षय ऊर्जेवर राहिला आहे आणि त्याने पर्यावरण
संरक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
१७ देशांतील न्यायिक प्रतिनिधी, सर्वोच्च व उच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती आणि पर्यावरण
तज्ज्ञांची या परिषदेत उपस्थिती आहे.
****
नांदेड जिल्ह्यात दुष्काळग्रस्त
गावांची यादी जाहीर झाल्याचा दावा करणारी प्रसार माध्यमावरील यादी अधिकृत नसून शेतकरी
तसंच नागरिकांनी त्यावर आणि या बनावट यादी संदर्भातल्या कुठल्याही अफवांवर विश्वास
ठेवू नये, असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. दुष्काळसदृश परिस्थितीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील
पिकांची आणि पर्जन्यमानाची वस्तुस्थिती तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुष्काळाबाबत
शासनस्तरावरून अधिकृत निर्णय झाल्यानंतर संबंधित यादी तसंच आदेश अधिकृत माध्यमातून
प्रसिद्ध करण्यात येतील, त्यामुळे प्रसार माध्यमावरील अशा प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित
याद्यांवर विश्वास ठेवू नये तसंच त्या पुढे प्रसारित करू नयेत, असं आवाहन
प्रशासनाने केलं आहे.
****
आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर
केंद्राचा आज सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्ताने आकाशवाणीच्या
कार्यक्रमांमध्ये आगामी काळात विविध बदल आणि नव्या उपक्रमांची भर पडणार आहे. छत्रपती
संभाजीनगर इथं नुकत्याच झालेल्या आकाशवाणी श्रोता संघाच्या राज्यस्तरीय संमेलनात, कार्यक्रम
प्रमुख सुजित बनसोडे यांनी, श्रोत्यांनी मागणी केलेले सर्व कार्यक्रम पुढच्या वर्षभरात
सुरू करण्यात येतील, अशी माहिती दिली. नव्याने निर्मिती करण्यात येणारे कार्यक्रम
युवा केंद्रित असतील, असंही त्यांनी सांगितलं.
****
धाराशिव जिल्ह्याच्या वैभवशाली
वारशाचं जतन करतानाच पर्यटक आणि भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी
जिल्ह्यातील संरक्षित स्मारकं आणि पर्यटनस्थळांच्या विकासाला आता नियोजनबद्ध चालना
दिली जात आहे.
जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटनस्थळांच्या
विकासासाठी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत गड-किल्ले, मंदिरं आणि महत्त्वाच्या संरक्षित
स्मारकांचं संवर्धन करण्यासाठी १४ कोटी ३४ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली
असून या निधीतून जिल्ह्यातील पाच पर्यटनस्थळांच्या विकासाची कामं सुरू आहेत. यामध्ये
तुळजापूर मधील घाटशीळ मंदिर,वडगाव मधील खंडोबा मंदिर,धाराशिव लेणी, चामर लेणी
आणि नळदुर्ग किल्ला या स्थळांचा समावेश असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाने दिली आहे.
****
केंद्र शासनाने शेतकऱ्यांना
अनुदानित रासायनिक खतांची खरेदी सुलभ, पारदर्शक आणि जलदगतीने करता
यावी, यासाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ एफएफएस ही मोबाईल आधारित प्रणाली विकसित
केली आहे. परभणी जिल्ह्यात २५ सप्टेंबर पासून खत विक्रीची अंमलबजावणी केवळ मोबाईल अँपव्दारे
करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सुमारे साडे आठशे खत विक्रेत्यांना आवश्यक सूचना
देण्यात येणार असून, सर्व शेतकऱ्यांनी या प्रणालीचा वापर करण्यासाठी पूर्वतयारी
करावी, असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.
या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना
घरबसल्या मोबाईलवरून खताची आवश्यकता नोंदवून पूर्व-नोंदणी करता येणार आहे.
****
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
डोनाल्ड ट्रम्प यांनी काल 'लिंडसे ओ. ग्रॅहम सँक्शनिंग रशिया अँड इराण ॲक्ट ऑफ २०२६' या कायद्यावर
स्वाक्षरी केली. हा कायदा रशियाचं ऊर्जा क्षेत्र, वित्तीय संस्था, संरक्षण जाळं
आणि निर्बंध टाळण्याच्या पद्धतींना लक्ष्य करतो. तसंच, रशियाकडून तेल आणि वायू खरेदी
करणाऱ्या देशांवर १०० टक्क्यां पर्यंत शुल्क आकारण्याची तरतूदही यात आहे.
****
No comments:
Post a Comment