Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 10
September 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० सप्टेंबर २०२६ दुपारी १.०० वा.
****
वैज्ञानिक संशोधन आणि नवोन्मेष
केवळ प्रयोगशाळा आणि शोधनिबंधांपुरते मर्यादित न राहता समाजासमोरील समस्या सोडवण्यासाठी
उपयोगी ठरले पाहिजेत, असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केलं.
मुंबईत माटूंगा इथल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेत झालेल्या हरित रसायनशास्त्र आणि शाश्वत
अभियांत्रिकी विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला ते काल संबोधित करत होते. ज्येष्ठ
वैज्ञानिक प्राध्यापक एम. लक्ष्मी कांतम यांच्या सन्मानार्थ मुंबईच्या रसायन तंत्रज्ञान
संस्था आणि इंडियन केमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद घेण्यात आली.
वैज्ञानिकांनी व्यवहार्य, परवडणारी आणि मोठ्या प्रमाणावर वापरता येतील अशी हरित
तंत्रज्ञाने विकसित करण्यावर भर द्यावा, असं आवाहन राज्यपालांनी केलं.
****
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि
महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल गोव्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील
पर्वरी इथं ६४१ कोटी रुपये खर्चाच्या पाच किलोमीटर लांबीच्या सहा-पदरी उन्नत मार्गाचं
उद्घाटन केलं. अत्यंत वर्दळीच्या शहरी भागातली वाहतूक कोंडी कमी करणं आणि पर्वरीमधून
वाहनांची अखंडित ये-जा सुलभ करणं हा या पायाभूत सुविधा प्रकल्पाचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे
मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि महाराष्ट्र यांच्याशी अखंडित रस्ते संपर्क सुनिश्चित
होईल, असं गडकरी यावेळी म्हणाले. महामार्गालगत पर्यटकांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध
करून देण्याचं आवाहन त्यांनी राज्य सरकारला केलं.
****
राज्यात विविध भागात बैल पोळ्याचा
सण आज उत्साहात साजरा होत आहे. बळीराजाला शेतीकामात मदत करणाऱ्या बैलांची खांदेमळणी
करुन त्यांना सजवलं जातं. आज पीठोरी अमावस्येला मातृदिनही साजरा केला जातो.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची
गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता तीन जानेवारी २०२७ रोजी होणार आहे. यापुर्वी ही
परिक्षा २५ ऑक्टोबर रोजी नियोजित होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीनं काल ही माहिती
देण्यात आली. गट क सेवेमध्ये लिपिक टंकलेखक, ग्राम महसूल अधिकारी, कर सहाय्यक
अशा विविध पदांसाठी एकंदर १२ लाख अर्ज दाखल झाले आहेत.
****
धाराशिव जिल्ह्यात मागील दीड
महिन्यापासून पावसाचा खंड पडल्याने शेतकरी चिंतेत असून, खरीप पिकांसह जनावरांच्या
चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात सर्वसामान्य
नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होऊ नये, यासाठी धाराशिव
शहरातल्या ईदगाह मैदानावर, पाऊस पडावा म्हणून विशेष नमाज पठण करण्यात आलं. ईदगाह
कमिटीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या विशेष नमाजसाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं
उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथं प्रधानमंत्री
आवास योजनेतल्या प्राधान्यक्रमाच्या तीन हजार ४०८ घरांपैकी दोन हजार ४० घरांकरता नागरिकांनी
१० टक्के रक्कम भरणा केलेली आहे. उर्वरित नागरिकांनी लवकरात लवकर भरणा करण्याचं आवाहन
महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी केलं आहे.
****
पेट्रोल पंपाचं आमिष दाखवून
लाखो रुपयांची फसवणूक करणार्या सायबर गुन्हेगारांना अहिल्यानगर इथल्या सायबर तपास पथकानं
उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतलं. जीओ कंपनीची पेट्रोल पंप डिलरशीप आणि परवाना मिळवून
देण्याचं आमिष दाखवून वेळोवेळी प्रोसेसिंग फी आणि इतर कारणांच्या नावाखाली आरोपींनी
तक्रारदाराकडून सुमारे ८४ लाख रुपये उकळून त्यांची आर्थिक फसवणूक केली. हे आरोपी अशा
प्रकारचे गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी पंजाब आणि गुजरात
राज्यात त्यांच्याविरुद्ध अशाच स्वरुपाचे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
****
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन
यंत्रणा - आत्मा अंतर्गत परभणी इथं शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवर राज्याबाहेरील, राज्यांतर्गत
आणि जिल्हांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणाचा
लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी २३ सप्टेंबरपर्यंत अर्ज करून नावनोंदणी करावी, असं आवाहन
‘आत्मा’चे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण यांनी केलं आहे. यामध्ये रेशीम उत्पादन तंत्रज्ञान
या विषयावर कर्नाटक राज्यातल्या केंद्रीय रेशीम बोर्ड इथं राज्याबाहेरील प्रशिक्षण, तसंच दूध उत्पादक
शेतकऱ्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या गोकुळ इथं प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात येणार
आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग तसंच
इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ११ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातल्या
कीर्तनकारांसाठी एक दिवसीय संत परिषदेचे आयोजन केलं आहे. भारतीय ज्ञान आणि समृद्ध कीर्तन
परंपरा या विषयावर होणार्या या संत परिषदेचं उद्घाटन डॉ. जनार्दन महाराज मेटे यांच्या
हस्ते होणार आहे.
****
महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या
पहिल्या उपान्त्य फेरीत आज भारताचा सामना बांगलादेश सोबत होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय
क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी आठ वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
दुसऱ्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात उद्या श्रीलंका आणि पाकिस्तान आमनेसामने येणार
आहेत.
****
माझं गाव, आरोग्यसंपन्न
गाव या अभियानाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून
आजपासून १७ सप्टेंबर पर्यंत मानसिक आरोग्य सप्ताह राबवण्यात येत आहे.
****
No comments:
Post a Comment