Saturday, 26 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.09.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 26 September 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ सप्टेंबर २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

जपानमध्ये सुरू असलेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघानं इराणच्या संघाला पराभूत करीत सुवर्णपदक पटकावलं आहे. इराणच्या संघावर भारतीय महिला संघाने ३७-३४ अशी मात करत हे सुवर्णपदक देशासाठी जिंकलं. या पदानंतर भारताच्या खात्यात ३ सुवर्णपदाकांसह एकूण २७ पदके झाली आहेत. याआधी भारतीय संघाने नेपाळवर ४८-२४ असा विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली होती. पुरुष संघानंही थायलंडवर ६६-२८ अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

१० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीनं काल सुवर्णपदकावर नाव कोरलं. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स स्पर्धेत रुद्रांक्ष पाटील आणि संघाने रौप्यपदकाची कमाई केली. गुलबीरसिंह याने १० हजार मीटर स्पर्धेत, सावन बारवाल याने मॅराथॉन स्पर्धेत तर ४०० मीटर रिले प्रकारात भारतीय संघाने रौप्यपदक मिळवलं. बारानिका एलंगोवन हिनं महिलांच्या पोल व्हॉल्टमध्ये तर टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिव्या चितळे या जोडीनं कांस्यपदक पटकावलं.

बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत तनिषा क्रस्टो आणि ध्रुव कपिला या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

****

देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांची आज जयंती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना आदरांजली वाहीली आहे. डॉ. मनमोहन सिंह यांनी सार्वजनिक जीवनात पूर्ण निष्ठेने देशाची सेवा केली, असं पंतप्रधानांनी एका संदेशात म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवार सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करतील. हा या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा १३८ वा भाग असेल.

****

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आज न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८१ व्या उच्चस्तरीय सत्राला संबोधित करतील. विश्वास पुनर्स्थापित करणे, परिवर्तनाचे व्यवस्थापन करणे- सर्वांसाठी कार्य करणारी संयुक्त राष्ट्रसंघटना ही या सत्राची संकल्पना आहे. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान आणि वरिष्ठ प्रतिनिधी या सत्रात सहभागी झाले आहेत. प्रमुख आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर ते आपापल्या देशांची भूमिका आणि प्राधान्यक्रम मांडतील. जागतिक सहकार्याला नवसंजीवनी देणं, शाश्वत विकासाची उद्दिष्टे पुढे नेणं, तसच शांतता, प्रतिष्ठा आणि समानतेसाठी सामूहिक कृतीला चालना देणं, यावर या सत्रात भर दिला जाणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १२ वर्षांत शहरे आणि गावांमधील दरी कमी झाल्याचं म्हटलं आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्या असून, महिलांचं आत्मनिर्भरता आणि आर्थिक सक्षमीकरण वाढलं असल्याचं त्यांनी सांगितलं. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत काशीहून वडनगरच्या प्रवासाला निघालेल्या सेवा यात्रेकरूंशी पंतप्रधानांनी काल आभासी संवाद साधला. सामाजिक सेवा, सामाजिक सुधारणा आणि सकारात्मक बदलांचं महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. विकसित भारताचं उद्दिष्ट सर्वांच्या सहभागातून आणि योगदानातूनच साध्य होऊ शकतं, असं पंतप्रधानांनी सांगितलं. वडनगरमधील मूल्यांनी आपल्या जीवनाला आकार दिला, तर काशीतून आपल्याला सेवामूल्यांची प्रेरणा मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

मुंबईतील जुहू समुद्रकिनाऱ्यावर आज पहाटे सी, शोर, शाईन - २०२६ या विशेष स्वच्छता मोहिमेचा यशस्वी शुभारंभ झाला. दिव्याज फाउंडेशन, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस आणि मेघा श्रेय यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोहिमेत दिव्याज फाउंडेशनच्या संस्थापक अमृता फडणवीस, अभिनेते अजय देवगण, राज्याचे कौशल्य विकास आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह आमदार अमित साटम, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, आमदार राम कदम आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. विविध शाळांचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने पुढे येत या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मोहिमेदरम्यान किनाऱ्यावरून तब्बल ३४ टन कचरा संकलित करण्यात आला आहे.

****

बीड इथं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत १७ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या संकल्प सेवा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि सुविधा विहित वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी समन्वयानं काम करावं, असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी केलं आहे. जिल्हा परिषदेत काल रहमान यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.

****

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आज नांदेड, परभणी तसंच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्या लोहा तालुक्यात टंचाईसदृश परिस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर त्या परभणी जिल्ह्यातल्या टंचाईसदृश परिस्थितीच्या पाहणीसाठी त्या गंगाखेड तालुक्यातल्या मरडसगावकडे प्रयाण करतील. बीड जिल्ह्यात माजलगाव तसंच गेवराई तालुक्यातील गावांना भेट देत शेतकऱ्यांकडून पीक परिस्थिती आणि टंचाईसदृश स्थितीचा त्या आढावा घेणार आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...