Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 18
September 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ सप्टेंबर २०२६ दुपारी १.०० वा.
****
लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रतीक्षेनंतर
पावसाने काल हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची रिपरिप
सुरू आहे. लातूर शहरासह जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असून अनेक भागांत हलका पाऊस सुरू
आहे. मात्र, खरीप पिकांना सध्या दमदार पावसाची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांची मोठ्या पावसाची
प्रतीक्षा कायम आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या
सुमारे ५० टक्के पाऊस झाला असून, आतापर्यंत सुमारे ३१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
काल झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी शेती आणि
पिण्याच्या पाण्याची परिस्थिती लक्षात घेता लातूरकरांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा
आहे.
दरम्यान बीड जिल्ह्यात आज
सलग दुसऱ्या दिवशी पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १३ पूर्णांक ९
मिलिमीटर पाऊस झाला तर परळी आणि अंबाजोगाई तालुक्यांतील पाच मंडळांत अतिवृष्टीची नोंद
झाली. सिरसाळा इथे सर्वाधिक ११२ पूर्णांक ५, पिंपळगाव गाढे १०७, परळी ८८, घाटनांदूर
७९ पूर्णांक ५ आणि बर्दापूर इथे ७७ पूर्णांक ८ मिलिमीटर पाऊस झाला. जून ते सप्टेंबर
कालावधीतील सरासरी ५६६ पूर्णांक़ १ मिलिमीटरच्या तुलनेत आतापर्यंत ३२३ पूर्णांक ९ मिलिमीटर
म्हणजे ५७ पूर्णांक़ २ टक्के इतका पाऊस झाला आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई, वडवणी शिरूर कासारमध्ये पाऊस झाला नाही.
****
अपुऱ्या पावसामुळे निर्माण
झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे
लक्ष वेधत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली
आहे.
****
येत्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि
विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर कोकणात काही ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा
वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन
यांचं आज महाराष्ट्र दौऱ्यासाठी सकाळी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय
विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी पुष्पगुच्छ देऊन उपराष्ट्रपतींचं
स्वागत केलं. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष
शेलार यांची यावेळी उपस्थिती होती. उपराष्ट्रपती राधाकृष्णन या दौऱ्यात मुंबई, लोणावळा आणि
पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. कैवल्यधामच्या गोवर्धनदास सेक्सारिया
कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून
उपराष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी पुण्यातील नेहरू स्टेडियम इथं
आयोजित पुणे फेस्टिव्हलला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहतील. त्यानंतर संध्याकाळी
उपराष्ट्रपती दिल्लीकडे रवाना होतील.
****
परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट
म्हणजेच परवाना संशोधन नियम २०२६ अधिसूचित केले आहेत. त्यानुसार १५ वर्षांपेक्षा कमी
वयाच्या बालकांना जारी करण्यात आलेला ३६ पानांचा सामान्य पासपोर्ट आता जारी झालेल्या
तारखेपासून ५ वर्ष किंवा संबंधित बालकांचं वय १८ वर्षांचं पूर्ण होईपर्यंत वैध राहणार
आहे. यापैकी जो कालावधी, आधी पूर्ण होत असेल त्याला मान्यता असणार आहे.
****
आयुर्वेद शिक्षण, संशोधन आणि
औषधांच्या गुणवत्तापूर्ण परीक्षणाला चालना देण्यासाठी देशात आयुष मंत्रालयाच्या वतीने
आयुर्वेद गुरुकुलम् महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय आयुष तथा
आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी काल बुलढाणा इथे केली. केंद्रीय
आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषदेच्या आठ परिघीय संस्थांमध्ये औषध परीक्षण प्रयोगशाळा सुविधा विकसित करण्यात येणार असल्याचंही त्यांनी
यावेळी घोषित केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
वाढदिवसानिमित्त आयोजित ‘शाश्वत विकासाची अविरत २५ वर्षे - सेवासंकल्प अभियान’अंतर्गत
बुलडाणा जिल्हा स्त्री रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आयुर्वेद आणि योगाला जागतिक
स्तरावर मान्यता मिळत असून अनेक देशांकडून या उपचार पद्धतींबाबत माहिती आणि प्रशिक्षणाची
मागणी होत असल्याचं मंत्री जाधव म्हणाले.
****
भारतीय रेल्वेने महाराष्ट्रातील
चौक-कर्जत रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण ४९७ कोटी रुपये खर्चाने करण्यास मंजुरी दिली आहे.
महाराष्ट्रातील रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी आणि रेल्वेच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी
हे पाऊल उचलण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, चौक-कर्जत
हा मार्ग पनवेल-चौक-कर्जत मार्गाचा एक भाग आहे; हा मार्ग प्रवासी आणि मालवाहतूक
या दोन्हीसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे.
या मार्गाच्या दुहेरीकरणामुळे
सध्याच्या एकेरी मार्गाची क्षमता वाढेल आणि रेल्वेच्या हालचालीत सुधारणा होण्यास मदत
होईल.
****
No comments:
Post a Comment