Saturday, 26 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.09.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 September 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ सप्टेंबर २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      राज्यशासनाकडून दुष्काळाबाबतचा शासननिर्णय जारी;३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ

·      नांदेड जिल्ह्यातील मुदखेड आणि मुखेड वगळता संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त

·      दुष्काळ निवारण उपाययोजना तत्काळ लागू-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन

·      सरकार शेतकऱ्यांचं पाठीशी खंबीरपणे उभं असल्याची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही

·      परभणी जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान दोन तरुणांचा बुडून मृत्यू

आणि

·      आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला तसंच पुरुष कबड्डी संघांना सुवर्णपदक

****

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यमानात झालेली तूट आणि अन्य निकषांच्या आधारे दुष्काळाबाबतचा हा शासन आदेश आज जारी करण्यात आला.

 

छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात ९७ टक्के भागांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. आठ जिल्ह्यातील ७६ पैकी ७४ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये नांदेड वगळता इतर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड आणि मुखेड या दोनच तालुक्यांचा दुष्काळाच्या या पहिल्या यादीत समावेश झालेला नाही.

 

दुष्काळी उपाययोजनांनुसार शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी बारा उपाययोजना आणि सवलती सरकारनं लागू केल्या आहेत. यामध्ये टँकरद्वारे पेयजल पुरवठा, शेतकरी तसंच शेतमजूरांसाठी अन्न धान्याचा पुरेसा पुरवठा, जनावरांना चारा उपलब्धता यासारख्या उपाययोजनांचा समावेश असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली, मुंबईत माध्यमांशी बोलतांना शिंदे म्हणाले –

बाईट - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या १२ लाख ५८ हजार शेतकऱ्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत १० हजार ११५ कोटी रुपये वितरीत झाले असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

 

दरम्यान, दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारनं जाहीर केलेला शासन आदेश हा शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याचा आरोप काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदतीची अपेक्षा होती पण यात त्याचा काही उल्लेख नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तर राज्यातल्या शेतकऱ्यांना सरकारचा जीआर नव्हे प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

****

दुष्काळी परिस्थितीत आपण सरकार म्हणून शेतकऱ्यांचं पाठीशी खंबीरपणे उभं आहोत, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातल्या बारूळ फाटा, सोनखेड इथं सोयाबीन पिकाची पाहणी तसंच शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्या बोलत होत्या. शासकीय मदतीबाबत आश्वस्त करतांना उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या -

बाईट - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात मरडसगाव, परभणी तालुक्यातील दैठणा आणि पाथरी इथंही पवार यांनी पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. मराठवाड्याची लेक असल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या अडचणी आणि दुष्काळी परिस्थितीची आपल्याला जाणीव असल्याचं पवार यांनी सांगितलं.

बीड जिल्ह्यातही दुष्काळी परिस्थितीचीही उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पाहणी केली. माजलगाव आणि गेवराई तालुक्यात माळी पारगाव, वारोळा, धर्मेवाडी आणि सिरसदेवी इथं शेतांच्या बांधावर जाऊन पवार यांनी पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.

शेतकऱ्यांच्या नुकसानीची योग्य ती दखल घेऊन सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली.

****

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटीच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून NCMC कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. यासाठी एसटी महामंडळानं कार्ड नोंदणी आणि वितरणाची प्रक्रिया राज्यभरातील आगार आणि बसस्थानकांवर सुरू केली आहे. प्रवाशांना NCMC कार्ड नोंदणी केल्यानंतर मिळालेली QR कोडयुक्त पावती वाहकाच्या ईटीएम मशीनवर स्कॅन करून सवलतीचे तिकीट घेता येणार आहे. ही नोंदणी पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार असून, या कालावधीत प्रवाशांनी NCMC कार्ड Active करून त्यामध्ये Top-up करणे आवश्यक आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवार सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करतील. हा या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा १३८ वा भाग असेल.

****

परभणी जिल्ह्यात काल गणेश विसर्जनादरम्यान दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. धानोरा काळे इथं गोदावरी नदीच्या पुलावरून हे दोन तरुण गोदावरी नदी पात्रात बुडाले होते, तब्बल १६ तासानंतर या दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला आज यश आलं. गजानन घोरपडे आणि मुंजाजी घोरपडे अशी मयत तरुणांची नावं असून ते पालम तालुक्यातील रहिवाशी असल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.

दरम्यान नाशिकच्या विल्होळी शिवारातील गणरायाचं विसर्जन करताना एका युवकाचा बुडून मृत्यू झाला. संदीप शिवाजी खनपटे असं या युवकाचं नाव आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात उभारण्यात आलेल्या एकूण ४७ गणेश मूर्तीदान संकलन केंद्रांवर ४१ हजार ४८२ गणेशमूर्तींचं संकलन करण्यात आलं. मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेल्या या उपक्रमात १८ हजार ३५८ गणेशमूर्तींचं दान, तर २३ हजार १२४ गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात आलं.

****

सांगलीत अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीनंतर महानगरपालिका आणि आकाशवाणी सांगली यांच्या संयुक्त विद्यमानं ‘स्वच्छता हीच सेवा’ अंतर्गत महास्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.

****

बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी किल्ले धारूर तालुक्यातील घाट परिसरातील अपघातप्रवण जागेची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुधारणा, रस्त्याची दुरुस्ती तसंच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीनं करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

****

शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत वाहिनी विलगीकरण आणि यंत्रणा सक्षमीकरणाची इतर आवश्यक कामं मिशन मोडवर करा, असे निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक भुजंग खंदारे यांनी दिले आहेत. ते छत्रपती संभाजीनगर परिमंडल कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. सध्या मोठ्या संख्येनं कृषिपंपांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत वीज पुरवली जाते.

****

सोलापूर जिल्ह्यानं आयुष्मान कार्ड निर्मितीत राज्यात दुसऱ्या क्रमांक पटकावला आहे. आजअखेर जिल्ह्यातील ९ लाख ५२ हजार २३७ नागरिकांना आयुष्मान कार्डचं सुरक्षा कवच मिळालं आहे. आयुष्मान भारत योजनेंतर्गत गरजू रुग्णांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा मिळतात. त्यामुळे हजारो कुटुंबांना मोठा आर्थिक आणि आरोग्यविषयक दिलासा मिळणार असल्याचं, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी सांगितलं.

****

बीड शहरातील प्रवाशांना रेल्वेस्थानकापर्यंत वेळेत आणि सोयीस्करपणे पोहोचता यावं, यासाठी एसटी महामंडळाच्या माध्यमातून नियमित इलेक्ट्रिक शहर बस सेवा सुरू करावी, अशी मागणी स्वातंत्र्य सैनिक रेल्वे आंदोलन समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. याबाबत विभागीय नियंत्रक अनुजा संजय दुसाने यांना आज निवेदन देण्यात आलं. प्रवाशांच्या गरजेनुसार इतर मार्गांवरही शहर बस सेवा सुरू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

****

लातूर जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येत आहे. चालू  वर्ष ‘महिला शेतकरी सशक्तीकरण वर्ष’ म्हणून घोषित करण्यात आलं  असून, या पार्श्वभूमीवर शेती करणाऱ्या महिला, महिला शेतमजूर आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांना ‘महिला शेतकरी’ म्हणून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

****

अहिल्यानगर जिल्ह्यात मातोश्री वृद्धाश्रमात झालेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. विळद घाटात असलेल्या या आश्रमात एका व्यक्तीनं इतर वृद्धांवर हा हल्ला केला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

****

जपानमध्ये सुरू असलेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला तसंच पुरुष कबड्डी संघांनी आज सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यामुळे या स्पर्धेत भारताच्या सुवर्णपदकांची संख्या चार झाली आहे. या दोन्ही संघांनी आपापल्या गटात इराणच्या संघांना पराभूत केलं. महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझीशन सांघिक प्रकारात भारताच्या संघाने रौप्य पदक पटकावलं. स्क्वॅशच्या मिश्र दुहेरीत भारतीय जोडीला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं, दरम्यान या स्पर्धेत आता चार सुवर्ण, ११ रौप्य आणि २३ कांस्यपदकांसह भारत पदकतालिकेत दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

****

हवामान

राज्यात आज मुंबई आणि कोकणासह अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...