Friday, 18 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 18.09.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 18 September 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन मराठवाड्यात उत्साहात साजरा-शेतकऱ्यांना सहकार्य आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार

·      बीड-पुणे थेट रेल्वेसेवेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत प्रारंभ

·      देशभरात कालपासून ‘सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

·      ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत-आज पूजनाचा सोहळा

·      छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाच जणांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू

आणि

·      अफगाणिस्तानविरुद्ध तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारताचा निर्भेळ विजय

****

७९ वा हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन काल उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, विभागीय आयुक्त जी श्रीकांत, तसंच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यंदा अवर्षणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासन पूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीच्या संकल्पाचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. कृष्णा खोऱ्यातल्या ३० टीएमसी पाण्यासोबतच कोकणातल्या उल्हास खोऱ्यातून ७० टीएमसी पाणी मराठवाड्यात आणून, पुढच्या काही वर्षातच मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी वर्तवला. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

बीड इथं पोलीस मुख्यालय मैदानावर उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. शहरातील हुतात्मा स्मारक परिसरामधील राजमाता जिजाऊ यांच्या अर्धाकृती पुतळ्यास सुनेत्रा पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते, लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, परभणी इथं पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक, हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवळ, तर जालन्यात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झालं. परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’ अभियानातील ग्रामसखींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

****

बीड-पुणे थेट रेल्वेसेवेला कालपासून प्रारंभ झाला. बीड रेल्वेस्थानकावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून या रेल्वेला पुण्याकडे रवाना केलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १७ सप्टेंबर २०२५ रोजी बीड-अहिल्यानगर रेल्वे सुरू करताना पुढील वर्षी पुण्यापर्यंत प्रवास करता येईल, असा शब्द दिला होता. तो पूर्ण करताना मराठवाड्याची कन्या म्हणून विशेष अभिमान वाटत असल्याची भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.

****

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून ‘लातूर भूषण पुरस्कार’ काल प्रदान करण्यात आले, मुंबईच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने घेतलेल्या या सोहळ्यात आकाशवाणीचे लातूर जिल्हा वार्ताहर शशिकांत मधुकरराव घोणसे पाटील यांना ‘लातूर भूषण’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

****

व्होकल फॉर लोकल म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रादेशिक विकासाला चालना देण्यासाठी 'एक जिल्हा - एक उत्पादन' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त देशभरात कालपासून सुरू झालेल्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत मराठवाड्यातील 'एक जिल्हा - एक उत्पादन योजनेबाबत आज माहिती घेऊया...

बाईट: ‘एक जिल्हा - एक उत्पादन’ योजनेबाबत माहिती

 

‘‘पैठणी आणि हिमरु शालींसाठी प्रसिद्ध असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने केशर आंबा उत्पादनात लक्षणीय झेप घेत, त्यासाठीचं भौगोलिक मानांकन मिळवलं आहेच, शिवाय, दुचाकी आणि तिचाकी वाहनांच्या सुट्या भागांचं प्रमुख उत्पादन केंद्र म्हणूनही छत्रपती संभाजीनगरकडे पाहिलं जातं. बीड जिल्ह्याने सीताफळ तर जालना जिल्ह्याने मोसंबी उत्पादनासाठी भौगोलिक मानांकन मिळवलं आहे. याशिवाय बांधकाम क्षेत्रासाठीच्या लोह उत्पादनांसाठी जालना जिल्हा ओळखला जातो. जालना जिल्ह्याने अलिकडच्या काही वर्षांत रेशीम उद्योगातही मोठी झेप घेतली असून, गेल्या महिन्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रेशीम बाजारपेठेचं उदघाटन करण्यात आलं.

लातूर आणि नांदेड जिल्हे प्रामुख्याने सोयाबीन आणि त्याच्या विविध उत्पादनांसाठी ओळखली जातात, या शिवाय लातूर जिल्हा कडधान्य आणि त्यावरील प्रक्रिया उद्योगाचं प्रमुख केंद्र आहे. हिंगोली जिल्ह्याची हळद, परभणी जिल्ह्यातला ऊस आणि त्यापासून तयार होणार गूळ, तर धाराशिव जिल्ह्याने कुंथलगिरीचा पेढा आणि खवा उत्पादनात मोठी ख्याती मिळवत, या पेढ्यासाठी भौगोलिक मानांकनही मिळवलं आहे.’’

·      हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर

****

सेवा संकल्प अभियानाचं औचित्य साधून नांदेड इथं महापौर कविता मुळे यांच्या संकल्पनेतून, 'स्वच्छ नांदेड, सुंदर नांदेड, या मोहिमेला पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते काल प्रारंभ करण्यात आला. स्वच्छता उपक्रमात एकजुटीनं सहभागी होण्याचं आवाहन सावे यांनी यावेळी केलं.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने "मराठवाड्याचा विकास, तुम से ना हो पायेगा!" या जनआंदोलनाचा काल छत्रपती संभाजीनगर इथं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. मराठवाड्याच्या विकासासाठी करण्यात आलेल्या घोषणा तसंच रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करणारं निवेदन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावतीनं आमदार अंबादास दानवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना सादर केलं. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

****

ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं काल घरोघरी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. तीन दिवसांच्या या उत्सवात आज गौरी पूजनाचा महत्त्वाचा सोहळा आहे. यासाठी लागणारी विविध फुलं आणि पत्री तसंच गौरींच्या महाप्रसादासाठी लागणाऱ्या भाज्या आणि पक्वान्नांसाठीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या आहेत. या साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला, या पावसात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाच जणांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. यामध्ये सिल्लोड तालुक्यातील दहिगाव शिवारात पती पत्नीचा तर कन्नड तालुक्यातील पिशोर शिवारातला तीन महिलांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई परिसरातही पाऊस झाल्याचं वृत्त आहे.

****

धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी काल खेड इथं पीक नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून सरनाईक यांनी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी तत्काळ संवाद साधत नुकसानाबाबत अवगत केलं.

****

बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणाची उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी धरणालगतच्या २२ गावांतल्या शेतकऱ्यांनी काल धरणाच्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केलं. धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक शेतकऱ्यांच्या मागण्या आणि आक्षेपांचा विचार करावा, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.

****

अफगाणिस्तानविरुद्ध तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांची मालिका भारताने ३-० अशा फरकाने जिंकली. काल दिल्लीत झालेल्या अंतिम सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा १२७ धावांनी पराभव केला. भारताने दिलेलं २२२ धावांचं आव्हान गाठतांना अफगाणिस्तानचा संघ १४ षटकात ९४ धावाच करु शकला. ३८ चेंडूत १०८ धावांची शानदार कामगिरी करणारा अभिषेक शर्मा सामनावीर तसंच मालिकावीर ठरला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...