Friday, 18 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 18.09.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 18 September 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ सप्टेंबर २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.

यंदा राज्यातील बहुतांश भागात सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद ही सर्वच उभी पिकं पावसाअभावी करपली असून, कीड-रोगांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. शेती, पिण्याचं पाणी आणि जनावरांना चारा यासंदर्भात परिस्थिती अधिकच कठीण होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर, औपचारिक निकषांची प्रतीक्षा न करता तत्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावा. गंभीर परिस्थिती असलेल्या तालुक्यांना तातडीने दुष्काळसदृश परिस्थितीग्रस्त घोषित करून दुष्काळी सवलती लागू करण्यात याव्यात, शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत जाहीर करावी, शेतमजूर कुटुंबांना देखील प्रत्येकी २५ हजार रुपयांची विशेष मदत देण्यात यावी, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी योजनेची तातडीने अंमलबजावणी करून तत्काळ पीककर्ज उपलब्ध करून देण्यात यावं, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रोत्साहनपर अनुदान ५० हजारांवरून १ लाख रुपये करण्यात यावं, एक रुपयात पीकविमा योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करून शेतकरी हिताचे पूर्वी वगळलेले सर्व ट्रिगर पूर्वलक्षी प्रभावाने लागू करून शेतकऱ्यांना पीक विम्याचं संरक्षण द्यावं आदी मागण्या खासदार शरद पवार यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार, बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १ मार्च २०२७ या कालावधीत तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे. प्रश्नपत्रिकानिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

****

धाराशिव जिल्ह्यातील श्री तुळजाभवानी मातेचं तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशाशी जोडणाऱ्या सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्ग प्रकल्पाचं काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी महायुती सरकारने राज्याच्या हिश्श्याचे आणखी २४० कोटी रुपये वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. आमदर राणा जगजीतसिंह पाटील यांनी काल ही माहिती दिली. या  निर्णयामुळे प्रकल्पाच्या पुढील कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध झाला असून, डिसेंबर २०२९ पर्यंत संपूर्ण रेल्वेमार्ग पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाला आणखी गती मिळाली आहे.

****

महिला शेतकरी पोर्टल’चं उद्घाटन भरणेवाडी इथं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते काल आभासी पद्धतीने  करण्यात आलं. राज्यातील महिला शेतकऱ्यांना शासकीय योजना, कृषी कर्ज, विमा, कृषी निविष्ठा, विस्तार सेवा तसंच विविध कल्याणकारी योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महिला शेतकऱ्यांना मान्यता देणं, त्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देणं आणि अधिकृत डेटाबेस तयार करणं यासाठी हे पोर्टल तयार करण्यात आलं असून राज्यातील महिला शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

****

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते मुंबई, लोणावळा आणि पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. कैवल्यधामच्या गोवर्धनदास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी पुण्यातील नेहरू स्टेडियम इथं आयोजित पुणे फेस्टिव्हलला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहतील. संध्याकाळी उपराष्ट्रपती दिल्लीकडे रवाना होतील.

****

लातूर शहरातील उस्मानपुरा परिसरात बीड जिल्ह्यातील परळी इथल्या शेख मन्सूर अली या ३५ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत आणखी दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा परळी नगरपालिकेतील विद्यमान नगरसेवक अल्ताफ खान सरदार खान पठाण, खालेद हमीद शेख आणि उमर महेबूब शेख या तिघांविरुद्ध लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे तिन्ही आरोपी फरार असून त्यांच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...