Thursday, 10 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.09.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 10 September 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० सप्टेंबर २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत राज्य शासनाचा ऊर्जा विभाग आणि जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड तसंच टोरेंट पॉवर लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड रत्नागिरी जिल्ह्यात भिवबंदर इथं अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. दोन हजार ८०० मेगावॅट क्षमतेच्या या  प्रकल्पासाठी ४४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून, यातून आठ ते दहा हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. टोरेंट पॉवर लिमिटेड ही कंपनी रत्नागिरी जिल्हा किंवा राज्यातल्या अन्य योग्य ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहे.

****

राज्यात विविध भागात बैल पोळ्याचा सण आज उत्साहात साजरा होत आहे. बळीराजाला शेतीकामात मदत करणाऱ्या बैलांची खांदेमळणी करुन त्यांना सजवलं जातं. आज पीठोरी अमावस्येला मातृदिनही साजरा केला जातो.

****

आशय, वैविध्य आणि प्रयोगशीलता ही मराठी चित्रपटांची वैशिष्ट्ये असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत ६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पं. हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, अभिनेता प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार, सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार आणि राणी मुखर्जी यांना राजकपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

****

अमरावती अग्निकांड प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. जिल्हा स्त्री रुग्णालयातल्या नवजात शिशू विशेष काळजी कक्षात २४ ऑगस्ट रोजी लागलेल्या आगीत तीन बालकांचा मृत्यू झाला होता; या घटनेची चौकशी पूर्ण होऊन उच्चस्तरीय चौकशी अहवाल आला आहे. अकोला परिमंडळ आरोग्य सेवा उपसंचालक, अमरावतीच्या स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, प्रशासकीय अधिकारी आणि वीजतंत्री यांच्या निलंबनाचे आदेश शासनाने दिले आहेत. एओव्ही इंटरनॅशनल आणि शिलार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता तीन जानेवारी २०२७ रोजी होणार आहे. यापुर्वी ही परिक्षा २५ ऑक्टोबर रोजी नियोजित होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीनं काल ही माहिती देण्यात आली. गट क सेवेमध्ये लिपिक टंकलेखक, ग्राम महसूल अधिकारी, कर सहाय्यक अशा विविध पदांसाठी एकंदर १२ लाख अर्ज दाखल झाले आहेत.

दरम्यान, एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेतल्या कथित गैरप्रकाराविरोधात काल नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आलं. यावेळी विविध १८ मागण्यांचं निवेदन विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं.

****

मराठवाड्यात कुणबी, मराठा - कुणबी आणि कुणबी - मराठा प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी शासनाकडून सातत्याने कार्यवाही करण्यात येत आहे. आतापर्यंत प्राप्त झालेल्या तीन लाख १७ हजार ५६९ अर्जांपैकी तीन लाख १६ हजार ९७७ नागरिकांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आलं आहे.

****

राज्यातल्या ३०० कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध शासकीय विभागांना दिलेल्या वृक्षलागवड उद्दिष्टाच्या पूर्ततेत पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाला २० हजार वृक्षलागवडीचं उद्दिष्ट होतं, या उद्दिष्टापेक्षा अधिक २४ हजार २०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून पावसाचा खंड पडल्याने शेतकरी चिंतेत असून, खरीप पिकांसह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात सर्वसामान्य नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होऊ नये, यासाठी धाराशिव शहरातल्या ईदगाह मैदानावर, पाऊस पडावा म्हणून विशेष नमाज पठण करण्यात आलं. ईदगाह कमिटीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या विशेष नमाजसाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

****

गुजरातमध्ये अहमदाबाद इथं आयोजित जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या तिसऱ्या स्तराच्या स्पर्धेत भारतानं दोन सुवर्ण आणि चार कांस्य पदकांसह सहा पदकं जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. काल स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी, जगातली अव्वल क्रमांकाची भारतीय तिरंदाज शीतल देवीनं महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात, तर हरविंदर सिंग भावना यांनी रिकर्व्ह मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकलं.

शीतल देवीनं तोमन कुमारसह मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदकही मिळवलं आहे. याशिवाय महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्हमध्ये भावना, महिला वैयक्तिक कंपाऊंडमध्ये सरिता आणि पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंडमध्ये तोमन कुमारने भारतासाठी कांस्यपदकांची कमाई केली.

****

चीनमध्ये मोची इथं सुरू कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघाने चायनीज तैपेईचा १५-० असा पराभव करत उपांन्त्य फेरीत प्रवेश केला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...